गणेशोत्सवाच्या भव्य उत्सवासाठी मुंबई शहर सज्ज होत असताना, मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेची जोरदार तयारी सुरू केली आहे. नुकत्याच झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती आणि इतर प्रमुख मंडळांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. या बैठकीत गुप्तचर विभागाच्या सहआयुक्त आरती सिंह, कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत अनेक महत्त्वाच्या सूचना आणि सुरक्षा निर्देश देण्यात आले. प्रत्येक मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि सुरक्षा रक्षक नेमावेत, असे सांगण्यात आले. विशेषतः महिलांच्या सुरक्षेवर भर देण्याबाबत चर्चा झाली. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अपघात होऊ नये यासाठी मिरवणूक आयोजकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
याशिवाय, मुंबई पोलिसांकडून समुद्राच्या वाढत्या पातळीची शक्यता लक्षात घेता अतिरिक्त खबरदारी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. विसर्जनाच्या दिवशी समुद्राची पातळी ४.५ मीटरपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने समुद्रकिनाऱ्यांवर अतिरिक्त पोलिस दल तैनात केले जाईल. वाहतूक आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मंडळांना प्रशिक्षित स्वयंसेवक नेमण्यास सांगितले आहे.
हे ही वाचा:
स्नेहभोजनातील खिचडी अर्धी कच्ची…
“अमेरिकेने चुकीचे लक्ष्य निवडले”
प्राप्तिकर विधेयक २०२५ मागे घेतले!
पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी या वर्षीचा गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी पोलिस आणि गणेश मंडळे एकत्र काम करतील, असे सांगितले. त्याचसोबत, त्यांनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांना सणासुदीच्या काळात रस्त्यावर आपली उपस्थिती स्पष्टपणे दाखवण्याचे आणि नागरिकांशी सौजन्याने वागण्याचे निर्देश दिले, पण त्याच वेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कडक भूमिका घेण्यासही सांगितले. सर्व मंडळांनी सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आश्वासन दिले आहे.







