एशिया कप २०२५ ची ट्रॉफी भारताला न मिळाल्यामुळे बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ) नाराज आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितले की, या प्रकरणावर बीसीसीआय ४ ते ७ नोव्हेंबर दरम्यान दुबईत होणाऱ्या आयसीसीच्या तिमाही बैठकीत औपचारिक तक्रार नोंदवणार आहे.
सैकिया म्हणाले,
“आम्ही अजून दोन-तीन दिवस वाट पाहणार आहोत. जर ट्रॉफी परत आली नाही, तर ४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या आयसीसी बैठकीत आम्ही हा मुद्दा मांडू. आम्ही १० दिवसांपूर्वी एसीसीला पत्र पाठवले आहे. जर ट्रॉफी न आल्यास, क्रिकेटची सर्वोच्च संस्था म्हणून आम्ही आयसीसीसमोर ही बाब ठेवू.”
२८ सप्टेंबर रोजी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव करत एशिया कप २०२५ चे विजेतेपद पटकावले.
मात्र, भारतीय संघाने एसीसी अध्यक्ष व पाकिस्तानचे गृह मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, आणि त्यानंतर ट्रॉफी पुन्हा अधिकाऱ्यांनी परत नेली.
भारताने ९वा एशिया कप खिताब जिंकला असला तरी, विजयानंतर भारतीय खेळाडूंनी ट्रॉफीशिवायच आनंद साजरा केला.
मोहसिन नकवी यांनी अलीकडेच १० नोव्हेंबर रोजी ट्रॉफी सुपूर्द करण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच, या महिन्यात दुबईत ट्रॉफी हस्तांतरणासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना करण्यात आली आहे.
मात्र, बीसीसीआय आणि एसीसी यांच्यातील पत्रव्यवहारानंतरही हा वाद अद्याप सुटलेला नाही.
रिपोर्टनुसार, मोहसिन नकवी यांनी ट्रॉफी एसीसीच्या मुख्यालयातून अज्ञात ठिकाणी हलवली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.







