मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा काल (१५ डिसेंबर) नागपुरात मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी महायुतीच्या ३९ आमदारांना मंत्री पदाची शपथ दिली. विशेष म्हणजे, या मंत्रिमंडळामध्ये २० नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली तर काही अनुभवी चेहऱ्यांना डच्चू देण्यात आला. यावरून महायुतीच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरु आहे. यामध्ये भाजपाचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याही नावाची चर्चा आहे. दरम्यान, नाराजीच्या वृत्तावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री मंडळात नाव नसल्याने नाराज नसल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, पक्ष जे पद देईल त्यासाठी काम करू. मंत्री मंडळात माझे नाव आहे असे काल सांगण्यात आले मात्र ते नव्हते, एवढाच मुद्दा आहे. मी नाराज असल्याचे काही कारण नाही. मंत्री म्हणून गोरगरिबांचे प्रश्न मांडत आलो, आता आमदार म्हणून विधानसभेत मांडेन.
ते पुढे म्हणाले, माझ्यासाठी संघटनेचे पद ठेवले असल्याची माहिती प्रसार माध्यमांमधून मिळाली आहे. आज नितीन गडकरी यांची भेट घेतली, जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती होते तेव्हा त्यांची भेट घेतो आणि ते उचित मार्गदर्शन करतात, असे मुनगंटीवार म्हणाले. मी नाराज नाही, काल जे आपल्यापाशी होते ते उद्या जाणार आहे आणि उद्या जे आपल्यापाशी नाही ते परवा येणार आहे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
हे ही वाचा :
महाविकास आघाडीसाठी संतोष देशमुख हत्या प्रकरण ‘झणझणीत’
पॅलेस्टाईनचा उल्लेख असलेली पिशवी घेऊन प्रियांका गांधी संसदेत
विजय दिवसानिमित्त माणेकशॉ सेंटरमध्ये आत्मसमर्पण पेंटिंग स्थापित
४६ वर्षांनंतर उघडण्यात आलेल्या संभलमधील मंदिराजवळील विहिरीतून सापडल्या तीन मूर्ती
दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांच्यावर पक्षातील मोठे पद देण्याची चर्चा आहे. त्यांच्यावर भाजपा प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्री पदावर वर्णी लागल्यानंतर ते प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहेत. यानंतर ही जबाबदारी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सोपवण्यात येणार आहे.