सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असताना एका वकिलाने सरन्यायाधीश बी आर गवई यांच्या दिशेने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. सरन्यायाधीशांवरील संताप व्यक्त करण्यासाठी ही कृती केल्याचे उघड झाले. यानंतर आता सरन्यायाधीश बीआर गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारे वकील राकेश किशोर यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आल्याचे वृत्त आहे. शिवाय, सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने (एससीबीए) त्यांचे तात्पुरते सदस्यत्व देखील रद्द केले आहे. तर, बंगळूरूमध्ये त्यांच्याविरुद्ध एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे.
एससीबीएने एक ठराव जारी केला असून ज्यामध्ये म्हटले आहे की, असोसिएशनने वकील राकेश किशोर यांचा २७.०७.२०११ चा तात्पुरता सदस्यता क्रमांक K-01029/RES तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे. त्यांचे नाव असोसिएशनच्या यादीतून काढून टाकले जाईल. या आठवड्याच्या सुरुवातीला, बार कौन्सिल ऑफ इंडियानेही त्यांचा परवाना निलंबित केला होता.
जारी केलेल्या निलंबनाच्या सूचनेमध्ये, बार असोसिएशनने म्हटले आहे की, असे निंदनीय आणि असंयमी वर्तन पूर्णपणे अयोग्य आहे आणि व्यावसायिक नीतिमत्ता, शिष्टाचार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठेचे गंभीर उल्लंघन आहे. एससीबीएने पुढे म्हटले आहे की, किशोर यांनी हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न हा न्यायालयीन स्वातंत्र्यावर, न्यायालयीन कामकाजाच्या पावित्र्यावर थेट केलेला हल्ला आहे. दरम्यान, वकील किशोर यांनी म्हटले आहे की, त्यांना त्यांच्या कृतीचा पश्चाताप नाही.
हे ही वाचा:
पुण्यातील कोंढवामध्ये एटीएसकडून सर्च ऑपरेशन; चौकशीसाठी संशयित ताब्यात
भारतासोबतचे संबंध त्वरित सुधारा!
शांतता प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्यावर इस्रायल- हमास सहमत; काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
दोन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धाला पूर्णविराम; इस्रायल- हमास शांततेसाठी सहमत
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात वकील किशोर यांनी सुनावणीदरम्यान भारताचे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान साधत त्यांना अडवलं. किशोर यांना कोर्टरूममधून बाहेर काढले जात असताना, ते म्हणाले की, भारत सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही. घटनेनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले, तर मुख्य न्यायाधीश गवई शांत राहिले आणि त्यांनी आपले कामकाज सुरू ठेवले. या घटनेनंतर, त्यांनी टिप्पणी केली की, या सर्व गोष्टींमुळे विचलित होऊ नका. या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही. सुनावणी सुरू ठेवा.







