जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात संशयित दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. राजौरीतील सुंदरबनी भागात संशयित दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या वाहनावर गोळीबार केला. हा हल्ला घनदाट जंगलातून करण्यात आला, त्यानंतर भारतीय सैन्याने लगेचच प्रत्युत्तर दिले. हल्लेखोरांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पेली फॉल सुंदरबनी परिसरात दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर अंदाधुंद गोळीबार केला. हा हल्ला अखनूरच्या मलाला आणि राजौरीच्या सुंदरबनीजवळील भागात झाला. गोळीबारानंतर संशयित दहशतवादी पळून गेले. दहशतवादी जवळच्या जंगलात लपले असण्याची शक्यता आहे. गोळीबारानंतर, परिसरातून जाणाऱ्या वाहनांना थांबवून त्यांची तपासणी केली जात आहे.
सुंदरबनी सेक्टरमधील फाल गावाजवळ झालेल्या या गोळीबारात कोणत्याही जीवितहानी नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांनी त्या भागातून जाणाऱ्या लष्कराच्या वाहनावर काही राउंड गोळीबार केला. हा परिसर दहशतवाद्यांसाठी पारंपारिक घुसखोरीचा मार्ग मानला जातो. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेनंतर लष्कराने परिसरात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली आहे.