पाकिस्तानने लक्ष्य केल्याचा दावा केलेले ‘भारतीय एअरबेस’ अस्तित्वातच नाहीत

पाक अधिकाऱ्याच्या वक्तव्याची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली

पाकिस्तानने लक्ष्य केल्याचा दावा केलेले ‘भारतीय एअरबेस’ अस्तित्वातच नाहीत

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या वर्षी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेल्या लष्करी तणावादरम्यान पाकिस्तानने केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांवरून आता सोशल मीडियावर पाकिस्तानची खिल्ली उडवली जात आहे. पाकिस्तानच्या एका लष्करी अधिकाऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये तो पाकिस्तानी फतह-1 क्षेपणास्त्रांनी भारतातील दोन एअरबेस- “राजौरी एअरबेस” आणि “मामून एअरबेस” यांना यशस्वीपणे लक्ष्य केल्याचा दावा करताना दिसत आहे. मात्र भारतात “राजौरी एअरबेस” आणि “मामून एअरबेस” नावाचे कोणतेही अधिकृत हवाईदल तळ अस्तित्वातच नाहीत.

पाकिस्तानच्या “ऑपरेशन बुनयान-उल-मरसूस”शी संबंधित एका अधिकाऱ्याने स्थानिक पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला. हे ऑपरेशन भारताच्या “ऑपरेशन सिंदूर”ला प्रत्युत्तर म्हणून सुरू करण्यात आले होते. त्या काळात पाकिस्तानने जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमधील अनेक भागांना लक्ष्य करत ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले होते.

पाकिस्तानी सैन्याने गेल्या वर्षी १० मे रोजी फतह-1 गाइडेड आर्टिलरी रॉकेटचा वापर केला होता. मुलाखतीदरम्यान अधिकारी कॅप्टन मुनीब जमाल म्हणाले, “आम्हाला दोन लक्ष्य देण्यात आले होते — राजौरी एअरबेस आणि मामून एअरबेस — आणि आम्ही दोन्ही लक्ष्यांवर यशस्वीपणे हल्ला केला.” मात्र वास्तव असे आहे की, राजौरी हा जम्मू-काश्मीरमधील एक जिल्हा आहे, जिथे भारतीय हवाई दलाचा कोणताही कार्यरत एअरबेस नाही. तर मामून हे पंजाबमधील पठाणकोटजवळील एक लष्करी छावणी क्षेत्र आहे, परंतु तिथेही “मामून एअरबेस” नावाचा कोणताही हवाईदल तळ अस्तित्वात नाही.

मुलाखतीत अँकरने फतह-1 क्षेपणास्त्र प्रक्षेपणादरम्यान नागरिकांच्या उपस्थितीबाबत प्रश्न विचारला असता, अधिकाऱ्याने दावा केला की स्थानिक नागरिकांची उपस्थिती सैनिकांसाठी आत्मविश्वास वाढवणारी ठरली. हे वक्तव्य समोर आल्यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानच्या दाव्यांची जोरदार खिल्ली उडवली जात आहे. एका युजरने एक्सवर लिहिले, “पुरातत्त्वज्ञ, नकाशाकार, गुगल मॅप्स आणि भारतीय हवाई दल मिळून ‘राजौरी एअरबेस’ आणि ‘मामून एअरबेस’ शोधत आहेत. कुणाला लोकेशन सापडल्यास कृपया सरकारला कळवा.”

दुसऱ्या एका पोस्टमध्ये लिहिले होते, “फतह-1 ने राजौरी आणि मामून एअरबेसवर इतका जोरदार हल्ला केला की ते अस्तित्वातूनच गायब झाले. पुढचे लक्ष्य: अटलांटिस?” विशेष म्हणजे, ऑपरेशन बुनयान-उल-मरसूसदरम्यान पाकिस्तानने भारतातील उधमपूर, पठाणकोट आणि आदमपूर एअरबेसला लक्ष्य केल्याचाही दावा केला होता. त्यानंतर हरियाणातील सिरसा, राजस्थानातील बाडमेर आणि पंजाबमधील जालंधर येथे शेतांमधून क्षेपणास्त्रांचे अवशेष सापडले होते.

हे ही वाचा:

न्यायालयाच्या अवमान प्रकरणी केजरीवालांसह ‘आप’च्या सहा नेत्यांना नोटीस

वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेरील ‘गरीब नगर’च्या बेकायदा झोपड्या जमीनदोस्त

सार्वजनिक ठिकाणांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा!

“अमेरिकेकडून सूट मिळो अथवा न मिळो, भारत रशियन तेल खरेदी करणार”

सप्टेंबर २०२५ मध्ये श्रीनगरच्या डल तलावातूनही एका क्षेपणास्त्राचा अवशेष सापडला होता, जो फतह-1 क्षेपणास्त्राचा भाग असल्याचे मानले गेले. याशिवाय पाकिस्तानने फतह-II पृष्ठभाग ते पृष्ठभाग क्षेपणास्त्र डागल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या, ज्याला भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने सिरसाजवळ अडवले होते. पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या या मुलाखतीमुळे पाकिस्तानच्या संपूर्ण लष्करी मोहिमेतील दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सोशल मीडियावर विमान पाडल्याच्या आकडेवारीवरून डींगे मारणाऱ्या पाकिस्तानची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली जात आहे.

Exit mobile version