उद्धव ठाकरे काही झाले तरी राज ठाकरेंना पक्षात स्थान देणार नाहीत, जर तसे झाले असते तर उद्धव ठाकरेंचे अस्तित्व धोक्यात येईल, अशी प्रतिक्रिया भाजपा खासदार नारायण राणे यांनी दिली. आज ते विधान भवनात बोलत होते. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे मातोश्री निवासस्थानाचा हिस्सा राज ठाकरेंना देणार का?, असा खोचक सवालही नारायण राणे यांनी विचारला.
राज ठाकरे शिवसेनेत आले तर ते पक्षाचे प्रमुख होतील, उद्धव ठाकरे नगण्य. त्यामुळे उद्धव ठाकरे स्वतःहून त्यांना बोलावणार नाहीत, तसे झाले तर त्यांचे अस्तित्व धोक्यात येईल. बाळासाहेब ठाकरे यांनी जवळपास ४८ वर्षात जे मिळविले ते उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात शिवसेना साफ करून टाकली.
कोणाला काही पडलेले नाहीये, दोनही भावांनी एकत्र या नाहीतर आणखी काही करा. उद्धव ठाकरेंचे एवढे प्रेम ओतू जातंय तर ते मातोश्रीचा एक भाग राज ठाकरेंना देणार का?, असा सवाल राणेंनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, कर्तुत्व शून्य असलेला व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे.
हे ही वाचा :
शेख हसीना यांना ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा, प्रकरण काय?
स्टारलिंकची श्रीलंकेत उपग्रह इंटरनेट सेवा सुरू
बनावट गुणपत्रिका रॅकेटचा भंडाफोड
दरम्यान, ५ जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे ‘विजयी मेळावा’ साजरा करणार आहेत. मुंबईतील वरळी डोम येथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा भव्य एकत्रित मेळावा होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत, अनिल परब, वरूण सरदेसाई तर मनसेकडून बाळा नांदगावकर, अभिजीत पानसे, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
