झिम्बाब्वेत सुरू असलेल्या त्रिकोणीय टी२० मालिकेतील एका सामन्यात न्यूझीलंडने दमदार खेळ करत दक्षिण आफ्रिकेचा २५ चेंडू राखून ७ विकेट्सनी पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने अंतिम फेरीत आपले स्थान बळकट केले आहे.
दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १३४ धावा केल्या. रेजा हेंड्रिक्सने सर्वाधिक ४१ धावा केल्या तर जॉर्ज लिंडेने २३ धावांची भर घातली. न्यूझीलंडकडून सॅंटनर, मिल्ने आणि डफी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
१५.५ षटकांत १३५ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने केवळ ३ विकेट्सच्या मोबदल्यात गाठले. टिम सिफर्टने शानदार खेळ करत ४८ चेंडूंमध्ये २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ६६ धावा केल्या. डॅरिल मिचेलही २० धावा करून नाबाद राहिला.
दक्षिण आफ्रिकेसाठी मुथुसामीने २ आणि सिमेलेनने १ गडी बाद केला. शानदार अर्धशतकासाठी टिम सिफर्टला ‘प्लेयअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
दरम्यान, यजमान झिम्बाब्वे संघ या मालिकेत सलग तीन सामने गमावत अंतिम फेरीच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडला आहे. झिम्बाब्वेला मोठ्या संघांवर मात करण्याची संधी होती, पण ती गमावल्याने त्यांच्या कामगिरीवर निराशा व्यक्त होत आहे.
या मालिकेचा अंतिम सामना २६ जुलै रोजी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला जाणार आहे.







