भारताचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा आपल्या तडाखेबाज खेळामुळे चर्चेत आला आहे. केवळ १४ वर्षांच्या वयात या फलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या १९ वर्षांखालील सामन्यात जबरदस्त आत्मविश्वास आणि ताकद दाखवत झंझावाती खेळ केला. ब्रिस्बेनमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या युवा वनडे सामन्यात वैभवने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मैदानात चौकार- षटकारांचा पाऊस पाडत त्याने केवळ भारतीय डावाला भक्कम सुरुवात दिली नाही, तर एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला.
विक्रमी खेळी
भारताकडून सलामीला उतरलेल्या बिहारच्या वैभव सूर्यवंशीने कर्णधार आयुष म्हात्रे खाते न उघडताच बाद झाल्यानंतर दबावाखाली असतानाही किल्ला लढवला. त्याने विहान मल्होत्रासोबत दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. ६८ चेंडूत ७० धावा करताना त्याने १०.२.९४ चा स्ट्राइक रेट राखला.
त्याच्या खेळीतून ५ चौकार आणि तब्बल ६ षटकार निघाले. एवढेच नव्हे, तर या खेळीच्या जोरावर तो १९ वर्षांखालील क्रिकेटमधील सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय ठरला. १० सामन्यांत ४१ षटकार ठोकून त्याने माजी कर्णधार उन्मुक्त चंदचा विक्रम मोडला. उन्मुक्त चंदने २१ सामन्यांत ३८ षटकार मारले होते.
हे ही वाचा:
छत्तीसगड: एकाच वेळी ७१ नक्षलवाद्यांनी सोडली हिंसेची वाट!
वैद्यकीय शिक्षणामुळे कंटाळलेल्या विद्यार्थ्याने संपवले जीवन
भविष्यात जनएआय कार खरेदी करण्याच्या पद्धतीत बदल घडवेल
वैभव सूर्यवंशीची आकडेवारी
आत्तापर्यंत वैभव सूर्यवंशीने युवा वनडेमध्ये ५४० धावा जमवल्या आहेत. विशेष म्हणजे त्याच्या एकूण धावसंख्येपैकी तब्बल २६% धावा चौकार-षटकारांतून आल्या आहेत. या यादीत उन्मुक्त चंद, यशस्वी जयस्वाल यांचीही नावे आहेत. जयस्वालने २०१८ ते २०२० दरम्यान २७ सामन्यांत ३० षटकार ठोकले होते.
केवळ १४ व्या वर्षी वैभव सूर्यवंशीने क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम केले आहेत. तो स्पर्धात्मक क्रिकेटच्या १७० वर्षांच्या इतिहासात सर्वात कमी वयात शतक ठोकणारा खेळाडू ठरला आहे. ही कामगिरी त्याने फक्त १३ वर्षे आणि १८८ दिवसांच्या वयात केली होती. याशिवाय, एका डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीयाचा विक्रमही त्याच्या नावे आहे.
विहान मल्होत्रासोबत शतकी भागीदारी
भारताची सुरुवात खराब झाली असली तरी वैभव सूर्यवंशी आणि विहान मल्होत्राने दुसऱ्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी केली. विहान मल्होत्रानेही ७० धावांची खेळी केली. या जोडीमुळे भारतीय संघाने मोठ्या धावसंख्येची पायाभरणी केली. वैभव अखेरीस विल बायरमच्या गोलंदाजीवर ली यंगकडे झेलबाद झाला, पण त्यावेळी तो संघाला मजबूत स्थितीत घेऊन गेला होता.
भारताचा ३०० धावांचा डोंगर
या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी धमाकेदार प्रदर्शन केले. वैभव सूर्यवंशी (७०), विहान मल्होत्रा (७०) यांच्यासह अभिज्ञान कुंडुने ७१ धावांची खेळी केली. या तिघांच्या जोरावर भारताने ४९.४ षटकांत तब्बल ३०० धावांचा डोंगर उभारला. ऑस्ट्रेलियाकडून विल बायरमने ३ बळी घेतले. परंतु भारतीय फलंदाजांच्या आक्रमक शैलीपुढे त्यांचे गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले.
मालिकेत भारताची पकड मजबूत
भारत आणि ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील संघांमध्ये तीन युवा वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. भारताने पहिला सामना जिंकून १-० अशी आघाडी घेतली होती. आता दुसऱ्या सामन्यातही भारताचे वर्चस्व दिसून आले. ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ३०१ धावांचे लक्ष्य होते.







