30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
घरविशेषवज्रसूची उपनिषद – प्राचीन ग्रंथ, आधुनिक आशय !

वज्रसूची उपनिषद – प्राचीन ग्रंथ, आधुनिक आशय !

Google News Follow

Related

विदर्भ संशोधन मंडळाच्या वतीने ‘वज्रसूची –टंक’ या डॉ. मदन कुलकर्णी व डॉ. रेणुका बोकारे यांच्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा नागपूरला अलीकडेच पार पडला. या प्रकाशन प्रसंगी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या भाषणामुळे, त्या भाषणातील काही विवाद्य विधानांमुळे हे ‘वज्रसूची- टंक’ / ‘वज्रसूची उपनिषद’ चर्चेत आले. त्या निमित्ताने या उत्कृष्ट
ग्रंथाचा सामान्य वाचकांना परिचय करून देण्याचा हा प्रयत्न : हिंदू धर्मात जवळ जवळ शंभरहून अधिक उपनिषदे असून त्यांत दहा मुख्य उपनिषदे आहेत, ज्यावर आद्य शंकराचार्यांनी भाष्य केले आहे. ह्या उपनिषदांत वेदांताचे सार असल्याचे मानले जाते. उपनिषदांना “श्रुति” म्हटले जाते. ज्ञानेश्वरांसारख्या सर्व संतांनी उपनिषदांचा “श्रुति माउली” म्हणून गौरव केलेला आहे. ‘वज्रसूची उपनिषद’ ‘सामवेदा’ अंतर्गत असून, ‘सामान्य’ म्हणून वर्गीकृत केलेल्या बावीस उपनिषदांत येते.
ह्यांत मुख्य विषय ‘वर्णव्यवस्था’ (चातुर्वर्ण्य – ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, आणि शुद्र अशा चार वर्णांमध्ये माणसांची विभागणी) हा असून इतक्या प्राचीन काळी, वर्ण व्यवस्थेचा केला गेलेला अत्यंत तर्कशुद्ध , तात्त्विक प्रतिवाद, असे त्याचे वर्णन करावे लागेल.

या उपनिषदाचा निश्चित कालखंड, तसेच त्याचा रचयिता हे जरी अज्ञात असले, तरी त्याचा‘शोध’ एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी लागला असून त्याच्या हस्तलिखिताच्या आठ प्रति उत्तर भारतात, तर पाच दक्षिण भारतात उपलब्ध आहेत. त्यातील बहुतांश संस्कृतमध्ये देवनागरीत तर दोन तालपत्रावर तेलुगुमध्ये लिहिलेल्या आढळल्या आहेत. त्याचा रचयिता जरी निश्चितपणे माहिती नसला, तरी बहुतेक विद्वानांकडून त्याचे श्रेय शंकराचार्य (आद्य शंकराचार्य, आठव्या शतकात होऊन गेलेले) यांनाच दिले जाते.

विशेष म्हणजे, गहन सैद्धांतिक आशय, अर्थगर्भ असलेले हे उपनिषद आकाराने मात्र अत्यंत लहान, आटोपशीर आहे. त्यात केवळ एकच प्रकरण आणि फक्त नऊ ऋचा (श्लोक) आहेत. आपण इथे त्याचा थोडक्यात आढावा घेऊ. पहिल्या श्लोकात ‘वज्रसूची सिद्धांत’ थोडक्यात प्रतिपादन करून, तो अज्ञान दूर करतो, अज्ञानी लोकांचा धिक्कार करतो, आणि दैवी ज्ञान असलेल्यांचा सन्मान, आदर करतो, असे म्हटले आहे. दुसऱ्या श्लोकात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, आणि शुद्र असे चार वर्ण असून, “स्मृति”नी ‘ब्राह्मण’ हा त्यातील मुख्य / श्रेष्ठ म्हटला असल्याचे प्रतिपादन केले आहे. पण पुढे लगेच याच्या
सत्यतेविषयी प्रश्न उपस्थित करून, ही ‘सामाजिक विभागणी’ – जीव, देह, (शरीर), जाती (जन्म), ज्ञान, कर्म, (कृती, कामे) आणि धर्म (धार्मिक किंवा विहित कृत्ये, वगैरे) – या निकषांवर टिकते का ? याकडे लक्ष वेधून, ती तशी टिकत नसल्याचे ठाम प्रतिपादन केले आहे.

हे ही वाचा:

इराणमधील महसा अमिनी प्रकरण जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराला अटक

ठाकरे गटाच्या मशालीवर ‘या’ पक्षाने केला दावा

उद्धव ठाकरेंच्या तीन नेत्यांवर गुन्हा दाखल

उद्धव ठाकरे ‘स्वबळ’ दाखवा !

 

पुढे श्लोक ३ ते ८ मध्ये, वरील पैकी एकेका निकषावर ही विभागणी कशी टिकत नाही, याचा मुद्देसूद परामर्श घेतलेला आहे. ‘जीव’ हा मृत्युनंतर पुनर्जन्माच्या द्वारे वेगवेगळ्या शरीरांत जात असल्याने – मुळात ‘जीव’ एक, पण शरीरे अनेक, – असे असल्याने, ‘जीवा’ने कोणी ‘ब्राह्मण’ ठरू शकत नाही, असे तर्कशुद्ध प्रतिपादन तिसऱ्या श्लोकात आहे. ‘देह’ पाहिला, तर कुठल्याही मानवी शरीरात अगदी तीच पंचमहाभूते असतात, सर्वाना जन्म, वाढ, झीज, आणि मृत्यू सारखाच असतो, अंगकांती (वर्ण / रंग) सर्व प्रकारची सर्वांमध्ये दिसून येते, धर्म / अधर्माने वागण्याची प्रवृत्ती ही सर्वांच्यात सर्व तऱ्हेची आढळून येते, त्यामुळे देह /शरीर यावरूनही कोणी ‘ब्राह्मण’ ठरू शकत नाही, असे आग्रही प्रतिपादन चौथ्या श्लोकात
आहे.

‘जन्म’ – कुठल्या जातीत जन्म झाला, यावरूनही कोणी ‘ब्राह्मण’ ठरू शकत नाही, हे सांगण्यासाठी अनेक प्राचीन ऋषींच्या जन्मकथांचा आधार घेतला आहे. व्यासांचा जन्म कोळ्याच्या मुलीच्या (मत्स्यगंधा, सत्यवती) पोटी, अगस्तीचा जन्म मातीच्या मडक्यात (कुंभात), कौशिक ऋषीचा जन्म ‘कुश’ नामक गवतात, तर वसिष्ठाचा जन्म एका स्वर्गीय अप्सरेच्या पोटी झाल्याचे सांगून, ब्रह्मज्ञान होणे (अर्थात ब्राह्मण होणे) हे जन्मावर कसे अवलंबून नाही, ते पाचव्या श्लोकात दाखवून दिले आहे.
सहाव्या श्लोकात, लौकिक ज्ञानावरही एखाद्याला ब्राह्मण ठरवणे शक्य नसल्याचे सांगताना, हे दाखवून दिलेय, की अनेक क्षत्रियांनी अत्यंत उच्च प्रतीचे ज्ञान प्राप्त करून घेतले, सत्याचा शोध घेतला, पण म्हणून तेव्हढ्याने ते ब्राह्मण ठरत नाहीत. अर्थात नुसत्या (लौकिक) ज्ञानाने ‘ब्राह्मण’ ठरत नाही. ‘कर्मा’नेही कोणी ब्राह्मण ठरत नाही, हे सांगताना सातव्या श्लोकात हे दाखवून दिलेय, की सगळ्या जिवंत व्यक्ती पूर्वकर्मावर आधारित अगदी सारख्याच कृती करतात, आधीचे जन्म आणि होणारे पुढचे जन्म सारखेच असतात, आणि जो तो पूर्वकर्मा ने बांधलेला असतो.

‘धर्म’ (किंवा धार्मिक कृत्ये) हा ही ब्राह्मणत्वाचा निकष ठरू शकत नाही, हे सांगताना आठव्या श्लोकात म्हटलेय की पूर्वी अनेक क्षत्रियांनी सुवर्णदान, यज्ञ, वगैरे मोठीमोठी धार्मिक सत्कृत्ये केली, पण केवळ अशा धार्मिक सत्कृत्यांनी कोणी ब्राह्मण ठरत नाही. यानंतर शेवटी नवव्या श्लोकात – “तर मग कोण असतो खरा ‘ब्राह्मण’ ?” असा मूळ प्रश्न पुन्हा उपस्थित करून, त्याचे ठाम उत्तर देऊन टाकले आहे. “वज्रसूची” अत्यंत तेजस्वीपणे ठाम प्रतिपादन करते, की व्यक्ती (वर्णव्यवस्थेनुसार) कोणीही का असेना, खरा ब्राह्मण तोच की ज्याने “आत्म्याला प्रत्यक्ष जाणले आहे”. ब्राह्मण तोच, जो जाणतो, की त्याचा आत्मा हा एकमेव अद्वैत असतो, ज्याला ‘वर्ग’ नाही, ज्याला ‘कर्म’ स्पर्श करत नाही, ज्याला ‘दोष’ बधत
नाहीत. तो हे जाणतो, की आत्मा हेच सत्य, ज्ञान, अनंत, आणि आनंद (सत्चिदानंद) आहे. तो हे जाणतो, की जो आत्मा त्याच्यात आहे, तो च सर्वांमध्ये, सर्व चराचरात , सर्व अंतर्बाह्य व्यापून आहे. तो असा आहे, जो केवळ जाणता येतो, तर्काने समजावून देता येत नाही.

आत्म्याला असे जाणणारा मनुष्य, द्वेषमत्सर रहित, वासना / कामनारहित, दम्भदर्परहित, सर्वांवर निःस्वार्थ प्रेम करीत, निष्कपट जीवन जगतो. शेवटी वज्रसूची उपनिषद सांगते, की इथे सांगितलेले मत (प्रतिपादन) हेच श्रुति, स्मृति, इतिहास, पुराणे यांना संमत असून, सत्चिदानंद अद्वैत आत्म्यावर ध्यान, मनन, चिंतन करून त्याला जाणून घेणे, हाच ‘ब्राह्मणत्व’ मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे. अलीकडच्या काळात, मारीओला ओफ्रेद्दी नावाच्या (वेनिस विद्यापीठातील) इटालियन
प्राध्यापकाने या ग्रंथाकडे प्रथम लक्ष वेधले. जन्माधारित जातिव्यवस्थेवर करण्यात आलेला अत्यंत प्राचीन तर्कशुद्ध प्रतिवाद / हल्ला असे या उपनिषदाचे स्वरूप थोडक्यात सांगता येईल, हे त्याने दाखवून दिले. जेव्हा भगवद्गीतेसारखे बरेच स्मृतिग्रंथ, व पुराणे वर्णव्यवस्थेचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, कळत नकळत समर्थन करत होते, तेव्हा हा प्राचीन श्रुतिग्रंथ (उपनिषद) त्या
व्यवस्थेवर तर्कशुद्ध प्रश्न उपस्थित करून, ती प्रभावीपणे नाकारत होता, हे विशेष आहे.

हिंदुत्वावर, हिंदू धर्मावर, तथाकथित पुरोगाम्यांकडून वेळोवेळी जे वैचारिक हल्ले होत असतात, त्यांचा प्रभावीपणे समाचार घेण्यासाठी आजच्या तरुण पिढीला अशा ग्रंथांची ओळख करून देणे गरजेचे आहे.

– श्रीकांत पटवर्धन

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा