इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये जल्लोष साजरा केला जातो आहे. इराणी महीला यात आघाडीवर आहेत. भारतात मात्र उर बडवले जात आहेत. काँग्रेस पक्ष प्रचंड शोकमग्न झालेला आहे. बहुधा काँग्रेस कार्यालयांमध्ये पक्षाचे झेंडे अर्ध्यावर खाली आणून ३ दिवसांचा दुखवटा पाळण्याचेही आदेश देण्यात आले असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खामेनी यांना श्रद्धांजली अर्पण केली नाही, म्हणून काँग्रेसने मोदीवर टीका केली आहे. मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर काँग्रेसने कोरडे ओढले आहेत. त्यांच्या हे लक्षातच येत नाही, इथे प्रश्न श्रद्धांजलीचा नसून निवडीचा आहे.
पश्चिम आशियात मोठे युद्ध पेटले आहे. इस्त्रायने आधी हल्ल्याची सुरूवात केली. अमेरिकेने इस्त्रायलची साथ दिली. पहील्या फटक्यात खामेनी यांचा त्यांचे टॉप कमांडर्स आणि परीवारासह खात्मा करण्यात आला. खामेनी हे इराणचे सर्वेसर्वा होते. भारताचे इराणशी मैत्रीपूर्ण संबंध होते. तरीही त्यांच्या हत्येनंतर मोदींनी खोमेनई यांना श्रदधांजली अर्पण केली नाही. काँग्रेस पक्षाला याची भयंकर चीड आलेली आहे. मोदींनी केलेल्या या पापाचा हिशोब काँग्रेस पक्ष मागतो आहे.
खामेनी हे धर्मगुरु होते, ते कोणत्याही सरकारी पदावर नव्हते, त्यामुळे मोदींनी त्यांना श्रद्धांजली वाहीली नाही, असे कारण काही भाजपा समर्थकांनी व्यक्त केले आहे. ते तकलादू आहे. जर रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादमीर पुतीन आणि चीन सरकार अयातुल्ला यांच्या हत्येचा निषेध करू शकतात, अमेरिकेवर आग पाखड करू शकतात, तर मोदीही करू शकले असते. पंतप्रधानाला एखाद्याबाबत शोक व्यक्त करण्यासाठी त्यांना शोक होणे पुरेसे आहे. ती व्यक्ति सरकारी पदावरच हवी, असा काही नियम नाही. शिष्टाचार मोडून जर पंतप्रधान विदेशी पाहुण्यांचे विमानतळावर स्वागत करू शकतात, तर शोक व्यक्त करण्यासाठी ते शिष्टाचाराला फाटा देऊ शकत नाही, असा तर्क करणे म्हणजे भाबडेपणा आहे. मोदींनी शोक व्यक्त केला नाही, कारण त्यांना शोक व्यक्त करायचा नव्हता.
मोदींना परराष्ट्र धोरण काय कळणार, असा सूर काँग्रेस पक्षाने त्यांच्या पहील्या टर्मपासून लावला आहे. पहील्या टर्मपासून मोदींनी नेहरु प्रणित नैतिकतेचा मुलामा चढवलेल्या, गडबड गोंधळ परराष्ट्र धोरणाचे विसर्जन केले. त्याचाही काँग्रेसला राग आहे. भारताचे धोरण आता गट निरपेक्ष राहीलेले नाही. मोदींनी या निरपेक्षतेचे कधीच हिंदी महासागरात विसर्जन केले आहे. जो मला मदत करेल तो माझा, जे देशहिताला अनुकूल आहे तेच धोरण, देशाच्या पथ्यावर पडेल तीच भूमिका, हे मोदी सरकारचे सरळ सरळ सूत्र आहे.
मोदींनी खामेनी यांना श्रद्धांजली अर्पण केली नाही, त्यांनी इस्त्रायल अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध केला नाही. त्यामुळे काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांना प्रश्न पडलाय. कुठे गेली नैतिकता, कुठे गेली सभ्यतेची मूल्य? भारताच्या नेतृत्वाची कमजोरी इतिहासात नोंदली गेली आहे, असा दाव त्यांना एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये केला. भारत मंडपममध्ये अलिकडे ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कपडे उतरवून नंगा नाच केला, पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी या नागवे पणाचे समर्थन केले, ते आता नैतिकता आणि सभ्यतेच्या गोष्टी बोलतायत. फोरास रोडवर पोटासाठी देहविक्रय करणाऱ्या दुर्दैवी महिलांकडे काँग्रेसच्या नेत्यांपेक्षा जास्त नैतिकता असते.
सामनाच्या कार्यकारींना खामेनींचे मोठे दु:ख झाले आहे. काही वर्षांपूर्वी एका थोर समाजवादी नेत्याचे निधन झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अग्रलेख लिहीला होता, ढोंग्याला श्रद्धांजली नाही. शिवसेनाप्रमुखांसोबत त्यांचे ज्वलंत हिंदुत्वही स्वर्गस्थ झाले. मोदी लिहीत नाहीत, बोलतही नाही, ते फक्त कृतीतून व्यक्त होतात. कट्टरवाद्याला श्रद्धांजली नाही, हे मोदींनी व्यक्त केलेले भाव आहेत.
खामेनींचा पंगा फक्त इस्त्रायल अमेरिकेशी नव्हता. डेथ टू इस्त्रायल, डेथ टू अमेरिका हे त्यांचे जाहीर धोरण होते. परंतु शेजारी मुस्लीम राष्ट्रांशी तरी त्यांचे संबंध कुठे चांगले होते? खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे समर्थक यूएई, ओमान, कतार, बहरीन, अबूधाबीवर हल्ले करतायत. त्यातून मुस्लीम देशांचे आपसात किती सौहार्दपूर्ण संबंध आहे, ही बाब पुरेशी अधोरेखित होते आहे. यातल्या किती राष्ट्रांनी खामेनी यांना श्रद्धांजली अर्पण केली? किंवा इस्त्रायल-अमेरिकेचा निषेध केला. उलट सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहमद बिन सलमान याने इराणवर हल्ला करावा म्हणून ट्रम्प यांना सतत फोन करून लकडा लावला होता, असे वृत्त वॉशिंग्टन पोस्टने दिले आहे. एमबीएसने याचे खंडन केलेले नाही. परंतु देशातील मुस्लीमांमध्ये पसरलेली शोककळा पाहून काँग्रेसलाही दु:खाचे उमाळे येत आहेत.
दक्षिण पूर्व आशियात फक्त पाकिस्तान आणि पश्चिम आशियामध्ये इराक असे फक्त दोनच देश अयातुल्ला यांच्या हत्येनंतर कळवळले आहेत. पाकिस्तानला दु:ख होते, तेव्हा भारत दु:खी होत नाही, फक्त काँग्रेस पक्ष व्यथित होतो. कारण दोघांचा डीएनए एकच आहे.
हे ही वाचा:
इराणी महिला संघाने राष्ट्रगीत गाण्यास दिला नकार; इस्लामी राजवटीच्या गीताला विरोध?
थंडाई म्हणजे केवळ चविष्ट पेय नाही तर… ‘हे’ आरोग्यदायी फायदे माहिती आहेत का?
खामेनीनंतर आता इस्रायलचे पुढचे लक्ष्य हिजबुल्लाह प्रमुख?
शेअर बाजारात भीषण घसरण! सेन्सेक्स १,०४८ अंकांनी कोसळला
इराण आणि भारताचे सामरिक संबंध होते. भारताने इराणमध्ये चाबहार बंदर विकसित केले होते. कारण भारताला चाबहार बंदरातून अफगाणिस्तानमार्गे मध्य आशियामध्ये शिरकाव हवा होता. भारत इराणकडून तेल विकत घ्यायचा. २०१८ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या तेलावर निर्बंध लादले. त्यानंतर भारताने ही तेल खरेदी बंद केली. गेली अनेक वर्षे पाकिस्तान आणि भारतात समतोल साधण्याची इराणची भूमिका होती. परंतु खामेनी यांच्या अंतरंगात भारताबाबत खरोखरच ममत्व होते का ?
भारत आणि इराणमध्ये निव्वळ देवाण घेवाण होते. दोघांचे संबंध सुखदु:खाचे कधीच नव्हते. पाकिस्तानशी भारताचा संघर्ष होत असताना इराणने भारताची मदत केली होती का? या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे. इराणला भारतासोबत संबंध हवे होते. परंतु त्यांचा कल मात्र मुस्लीम राष्ट्र म्हणून पाकिस्तानकडेच होता. पाकिस्तान हा विश्वासघाती देश आहे, हे ठाऊक असताना इराण पाकिस्तानबाबत सहानुभूती बाळगून होता. पाकिस्तानने भारताला रक्तबंबाळ करण्यासाठी वापरलेले शस्त्र आणि इराणने इस्त्रायलला जखमी करण्यासाठी वापरलेले शस्त्र एकच होते. दहशतवाद. इस्त्रायलला भारताबाबत किंवा भारतीयांना इस्त्रायलबाबत असलेल्या सहानुभूतीचे एकच कारण आहे, ते म्हणजे हे दोन्ही देश समदु:खी आहेत. दहशतवादाची धग आणि वेदना दोन्ही देशांना ठाऊक आहेत. भारत आणि इस्त्रायलचा लढा दहशतवादाशी आहे, जो पाकिस्तान आणि इराणच्या परराष्ट्र धोरणाचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील.
२०२४ मध्ये अयातुल्ला यांनी गाझा, म्यानमार आणि भारतात मुस्लीमांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता. जगातील कोणत्याही देशापैकी भारतातला मुस्लीम सुखी आणि सुरक्षित आहे, अशी पोस्ट टीव्ही एंकर रुबिया लियाकतने एक्सवर केलेली आहे. जे कायद्याच्या चौकटीत राहू इच्छितात अशा सगळ्याच मुस्लीमांची ही भावना आहे. ज्यांना या देशात शरीया आणायचा आहे, ज्यांना गझ्वा ए हिंद हवा आहे, ते मात्र देश घटनेनुसार चालतोय त्यामुळे तळमळतायत, दु:खी आहेत. त्यांना या देशात दंगली घडवायच्या आहेत, चिकन नेक तोडून इशान्य भारत वेगळा करायचा आहे आणि हे सगळे करून सुरक्षितही राहायचे आहे. अयातुल्लांची आवई त्याच मुस्लीमांबाबत होती. यावरून त्यांची मानसिकता लक्षात यावी.
बांगलादेशात हिंदूंच्या विरोधात होणाऱ्या अत्याचाराचा बाबत अयातुल्ला यांनी कधी आवाज उठवला नाही. कारण हे अत्याचार तिथल्या मुस्लीमांकडून हिंदूंवर होत होते. आणि त्यांच्या संवेदना फक्त मुस्लीमांसाठी राखीव होत्या. म्हणजे भारतातील मुस्लीमांसारखेच. पहेलगाममध्ये हिंदू मारले गेले, बांगलादेशमध्ये हिंदू मारले गेले की यांचा कंठ दाटून येत नाही. खामेनी ठार झाले, गाझामध्ये लोक मेले की हे लगच उर बडवायला लागतात. एका बाजूला इस्त्रायल जो प्रत्येक संकटात भारताला मदत करायला धावतो, दुसऱ्या बाजूला इराणचे नेतृत्व ज्यांना भारतातील मुस्लीमां पलिकडे कोणाची फार चिंता नाही. मोदींनी इस्त्रायलची निवड करणे स्वाभाविक नाही का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायल दौऱ्यात अगदी स्पष्ट शब्दात सांगितले होते की, कोणत्याही कारणासाठी, उद्द्दीष्टासाठी केलेला दहशतवादाचे समर्थन करता येत नाही. अशा दहशतवादाचा प्रणेता अशाच दहशतीच्या प्रयोगात ठार झाला, तर मोदींनी त्याचे दु:ख बाळगण्याचे कारण काय?
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







