इराणच्या मुद्द्यावर पाकिस्तानने अमेरिकेचा स्पष्ट विरोध करत डोनाल्ड ट्रंपना मोठा झटका दिला आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे लष्करी प्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली होती. पाकिस्तानमध्ये प्रत्यक्ष सत्ता लष्कराकडे असल्याचे मानले जाते, त्यामुळे या भेटीमुळे वॉशिंग्टन आणि इस्लामाबादमधील संबंध नव्या उंचीवर जातील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये पाकिस्तानने चीन आणि रशियासोबत मिळून अमेरिकेच्या विरोधात उभं राहत वेगळाच संदेश दिला आहे.
संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानचे कायमस्वरूपी प्रतिनिधी असीम इफ्तिखार अहमद यांनी रविवारी इराणवर बोलावण्यात आलेल्या आपत्कालीन बैठकीत सांगितले की, “इस्लामाबाद अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांवर केलेल्या हल्ल्यांची तीव्र शब्दांत निंदा करतो.” अहमद यांनी स्पष्ट केलं की, पाकिस्तान चीन आणि रशियासोबत मिळून एक प्रस्ताव तयार करत आहे, जो सुरक्षा परिषदेसमोर मांडण्यात येईल.
ही आपत्कालीन बैठक इराणच्या विनंतीवरून घेण्यात आली होती. अमेरिकेने १३ जून रोजी इराणच्या तीन प्रमुख अणुऊर्जा प्रकल्पांवर बॉम्बहल्ला केल्यानंतर ही बैठक बोलावण्यात आली.
हे ही वाचा:
महिलांच्या हक्कांवर गदा आणणारी ‘खुत्बा शादी’
अभिनंदन वर्धमानला पकडणाऱ्या, पाक अधिकाऱ्याचा चकमकीत मृत्यू!
राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प!
पत्नीच्या हत्येप्रकरणी आरोपी पतीला अवघ्या २ तासांत अटक!
अहमद म्हणाले, “सुरक्षा परिषदेला या हल्ल्यांची स्पष्ट निंदा करावी लागेल. हे हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि संयुक्त राष्ट्रांच्या तत्वांचे उल्लंघन आहेत.” त्यांनी फोर्डो, नतांज आणि इस्फाहान येथील इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांचा उल्लेख केला.
अहमद पुढे म्हणाले, “सुरक्षा परिषदेने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) देखरेखीखाली असलेल्या अणुस्थळांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध करायला हवा. हे हल्ले IAEA च्या प्रस्तावांबरोबरच आंतरराष्ट्रीय मानवी कायद्याचाही भंग करतात. ते म्हणाले, “आम्ही इस्रायलच्या कारवायांचीही तीव्र निंदा करतो. चीन आणि रशियासोबत मिळून आम्ही इराणच्या आत्मसंरक्षणाच्या हक्काला पाठिंबा देतो.”







