राष्ट्रीय जनता दलचे (राजद) राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची एकमुखाने निवड झाल्यानंतर, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)चे खासदार अरुण भारती यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी याला “वैयक्तिक हुकुमशाही” म्हणत राजदवर वादाचा बाण सोडला आहे.
अरुण भारती म्हणाले, “राजदमध्ये सर्व निर्णय एकाच माणसाच्या मनाने घेतले जातात. इतर कोणालाही अध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्याची संधी नाही. जर पक्षात लोकशाही असती, तर किमान एकाला तरी प्रतीकात्मक उमेदवारी दिली असती.”
अरुण भारती यांनी लालूप्रसाद यांच्या तब्येतीवर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, “बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्यांच्या पायाशी ठेवला गेला आणि सांगितलं गेलं की त्यांची तब्येत खराब आहे. पण अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज सादर करताना ते एकदम ठणठणीत होतात. याचा अर्थ त्यांच्या दृष्टीने ‘पदच सर्वकाही’ आहे.”
मतदारांच्या पडताळणीचा निर्णय योग्य
मतदारांची घरपोच पडताळणी करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत करत खासदार म्हणाले की, “जे वैध मतदार आहेत, त्यांचाच समावेश व्हायला हवा. एकाहून अधिक मतदार ओळखपत्र असणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.”
हे ही वाचा:
भाजपा आज देशभरात ‘संविधान हत्या दिन’ साजरा करणार
कसली युद्धबंदी? इस्रायल-इराणचे एकमेकांवर बॉम्बहल्ले!
महिलांच्या हक्कांवर गदा आणणारी ‘खुत्बा शादी’
हे भय ट्रम्प यांना छळत राहणार!
आणीबाणीच्या ५०व्या वर्षी काँग्रेसवर घणाघात
आणीबाणीच्या ५०व्या वर्षपूर्तीनिमित्त, अरुण भारती यांनी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, “सत्तेत राहून काँग्रेसने स्वतःच्या फायद्यासाठी संविधानाची चिरफाड केली. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान केला गेला. आता या चुका न विसरता, दुरुपयोग करणाऱ्यांना त्याचा परिणाम भोगावा लागेल.”
बहुजन भीम संकल्प समागम – २९ जूनला राजगीरमध्ये
पक्षाच्यावतीने २९ जून २०२५ रोजी बिहारच्या राजगीरमध्ये होणाऱ्या “बहुजन भीम संकल्प समागम” या विशेष कार्यक्रमाबाबतही त्यांनी माहिती दिली. या संमेलनाचा उद्देश रामविलास पासवान यांचे विचार पुढे नेणे आणि त्यांच्या सर्वसमावेशक राजकारणाचा प्रसार करणे आहे.
चिराग पासवान यांचा “बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट” विजन
अरुण भारती यांनी सांगितले की, “चिराग पासवान सर्व समाजाला सोबत घेऊन चालतात. ते त्यांच्या वडिलांच्या शिकवणीप्रमाणे सर्व जाती, धर्म, आणि वर्गांशी संपर्क ठेवत आहेत. या समागमातून ते लोकांचे विचार ऐकतील आणि संवाद साधतील.”
