अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल या सोशल मीडियावर आज सकाळी इस्त्रायल-इराणच्या युद्धबंदीची ब्रेकींग न्यूज झळकवली आहे. श्रेय अर्थातच स्वत:ला घेतले. ही बातमी आल्यानंतर सगळ्या जगाने सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यात अर्थातच भारताचाही समावेश आहे. इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला खोमेनी यांना संपवल्याशिवाय युद्ध संपणार नाही, असे इस्त्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतन्याहू यांनी जाहीर केले होते. तसे काही न होता, युद्ध थांबलेले आहे. परंतु अजूनही गायब झालेल्या ४०० किलो युरेनियमचे त्रांगडे कायम आहे. जोपर्यंत ते नष्ट केले जात नाही. तो पर्यंत इस्त्रायलच्या डोक्यावर असलेली टांगती तलवार दूर होत नाही.
इराणच्या संसदेने होर्मुझची सामुद्रधनी बंद करण्याचा प्रस्ताव काल मंजूर केला होता. त्यानंतर जगात चिंतेचे वातावरण होते. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केले होते, की होर्मुझच्या मार्गाने भारतात आयात केल्या जाणाऱ्या तेलाचे प्रमाण फार नाही, तरीही उद्योग जगतावर काही प्रमाणात दडपण होतेच. ते आज संपले आहे. अर्थात ही शांतता किती काळ टिकणार? हा सवाल आहेच. परंतु आज जगाला काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. अमेरिकेने इराणच्या फोर्डोव्ह, नतांझ आणि इस्फहान या आण्विक आस्थापनांना लक्ष्य केल्यानंतर खोमेनी यांनी धमकी दिली होती. ‘तुम्ही सुरुवात केली आणि परंतु अखेर आम्ही करू.’ अमेरिकेचे काही वाकडे करण्याची क्षमता इराणकडे असती, तर अमेरिकेने हल्ला करण्याचे धाडस कधी दाखवले असते का? परंतु न करून इराण सांगणार कोणाला? काही तरी केले आहे, असे किमान देशवासियांना तरी दाखवावे लागते. त्यामुळे इराणने अमेरिकेच्या कतारमधील लष्करी तळावर क्षेपणास्त्र डागली आणि वचपा काढल्याचे जाहीर केले.
मुळात हे युद्ध सुरू का झाले हे लक्षात घ्या. ‘डेथ टू इस्त्रायल’ ही घोषणा इस्त्रायलने गंभीरपणे घेतली होती. इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम त्याच उद्दीष्ठासाठी वाहिलेला असल्याचा त्यांचा संशय होता. म्हणूनच इस्त्रायलला इराणमधल्या आण्विक आस्थापना नष्ट करायच्या होत्या. अण्वस्त्रांसाठी वापरता येईल असे युरेनियम समृद्ध कऱण्याची इराणची क्षमता संपुष्टात आणायची होती. अमेरिकेला इराणमध्ये खांदेपालट करायचा होता. अयातुल्ला खोमेनी यांना सत्तेवरून खाली खेचायचे होते. हे लक्ष्य पूर्ण करण्यात अमेरिकेला यश आलेले नाही हे लक्षात घ्या. खोमेनी जिवंत आहेत. मोसादने एखादे ऑपरेशन राबवून त्यांचा काटा काढेपर्यंत ते इराणचे नेतृत्व करतील हे स्पष्ट आहे.
युद्ध बंद झाले. पडद्यामागे घडलेल्या काही घडामोडी त्याला निश्चितपणे कारणीभूत आहेत. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागाछी हे रशियामध्ये गेले होते. त्यांनी ब्लादमीर पुतीन यांची भेट घेतली. पुतीन यांनी अमेरिकेवर तिखट टीका केली. इराणवर केलेल्या हल्ल्याचे समर्थन करणारे कोणतेही ठोस कारण अमेरिकेकडे नाही, असे पुतीन म्हणाले.
एखाद्या देशाचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि अखंडता संकटात आणणाऱ्या कोणत्याही कृतीचे आम्ही विरोध करतो. हे आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हिताचे नाही, अशी भूमिका चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी घेतली होती. रशिया, चीनच्या सर्वोच्च नेत्यांनी अमेरिकेला सुनावले. परंतु खरी मात्रा लागू पडली एका माजी नेत्याची.
रशियाचे माजी अध्यक्ष आणि पुतीन यांचे खंदे समर्थक ड्रीमिटी मेदव्हेदेव यांनी दिलेल्या एका प्रतिक्रियेमुळे अमेरिकेची दातखीळ बसली. अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यानंतर जगातील अनेक देशांनी इराणला अण्वस्त्र देण्याची तयारी दाखवली असल्याचे ते म्हणाले. हे देश कोणते हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवले. हे विधान अमेरिकी नेत्यांची कानशीले गरम करून गेले. असे घडले तर फक्त इस्त्रायल नाही, अमेरिकेलाही लक्ष्य करण्यात येऊ शकते हे ट्रम्प यांना ठाऊक आहे. अमेरिका जर रशियाच्या विरोधात युक्रेनच्या पाठीशी उभी राहू शकते तर चीन आणि रशियाही इराणच्या पाठीशी उभे राहू शकता, यांची जाणीव अमेरिकेला झाली.
हे ही वाचा:
राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे आमंत्रण, पण उत्तर नाही
माजी फिरकीपटू दिलीप दोशी यांचे निधन
कुणालाही जमले नाही, पण आम्ही अमेरिकन तळांना केले लक्ष्य!
अबू आझमींनी घासले नाक, म्हणाले “…तो हेतू नव्हता! “
२००३ मध्ये अमेरिकेने इराकवर आक्रमण केले होते. इराकचे सर्वेसर्वा सद्दाम हुसेन यांना अटक केली होती. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोषी ठरवले. २००६ मध्ये त्यांना फासावर चढवण्यात आले. तब्बल १९ वर्षांनी अमेरिकेला हेच इराणच्या खोमेनी यांच्याबाबत करायचे होते, परंतु करता आले नाही. इराक आक्रमणाच्या काळात रशिया आणि चीन अमेरिकेला आव्हान देण्याच्या मानसिकतेत नव्हते. त्यांची तेवढी ताकद नव्हती. खरे तर आजही रशिया युक्रेन युद्धात अडकलेला आहे. चीन आर्थिक आघाडीवर फार मजबूत नाही. तरीही केवळ एका विधानाच्या आधारावर ड्रिमिटी मेदव्हेदेव यांनी अमेरिकेला हे प्रकरण कुठवर जाऊ शकते याची जाणीव करून दिली.
उत्तर कोरीयाचा हुकूमशहा किम जोंग याच्या नादाला अमेरिका लागत नाही, तिथे सत्तापालट करण्याच्या भानगडीतही पडत नाही, त्याचे एकमेव कारण म्हणजे त्याच्याकडे अण्वस्त्र आहेत. इराणला जर रशिया किंवा चीनने चोरट्या मार्गाने अण्वस्त्र पुरवली तर काय परिणाम होतील, हे अमेरिकेच्या लक्षात आले. त्यामुळे बहुधा त्यांनी खोमेनी यांच्याशी पडद्याआड डील करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही युद्ध थांबवा, आम्ही तुमच्या सत्तेला हात लावत नाही, असे डील बहुधा झाले असावे.
या सगळ्या प्रकरणात गोम अशी आहे, की या युद्धबंदी नंतर इस्त्रायलला शांतता लाभण्याची शक्यता कमी आहे. अमेरिकेने ऑपरेशन मिडनाईट हॅमर राबवले. बी-२ बॉम्बरचा वापर करून फोर्डोव्हाचा निकाल लावला. स्वत: ट्रम्प यांनी हे जाहीर केले होते. इराणने मात्र हा दावा फेटाळला आहे. परंतु इराणी संसदच्या अध्यक्षांचे सल्लागार मेहदी मोहमदी यांनी दिलेली प्रतिक्रिया महत्वाची आहे. ‘अमेरिकेचा हल्ला अनपेक्षित नव्हता, त्यामुळे आम्ही फोर्डोव्ह आधीच रिकामे केले होते’, असे मेहदी यांनी स्पष्ट केले आहे. इराण एटॉमिक एनर्जी ऑर्गनायझेशनने अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोव्ह, नतांझ, इस्फहान या अणु संशोधन केंद्राच्या आसपासच्या लोकांना किरणोत्सर्गाचा कोणताही धोका नसल्याचे जाहीर केले आहे. फोर्डोव्हच्या अणुसंशोधन केंद्रातून आम्ही ६० टक्क्यांपर्यंत समृद्ध केलेले ४०० किलो युरेनियम आधीच हलवले असल्याचे, इराणचे नेते सांगतायत. ही बाब इस्त्रायलचा ताप वाढवणारी आहे.
एक बाब स्पष्ट होते. ही शांतता तात्पुरती आहे. इस्त्रायलचे परराष्ट्र मंत्री गिडन सार म्हणाले आहेत, की आम्ही इराणचा आण्विक कार्यक्रम २ वर्षे मागे ढकलला. याचा अर्थ दोन वर्षांनी पुन्हा इस्त्रायलवर हीच वेळ येणार आहे. कारण इराण थांबणार नाही, इराणचे राष्ट्रपती मसूद पजशिकीयान इराण आपला अणुसंशोधन कार्यक्रम सोडून देणार नाहीत, नागरी हितासाठी आम्ही आमचा अणुकार्यक्रम जारी ठेवू, असे स्पष्ट सांगितले आहे.
इराण जेव्हा नव्याने अणुकार्यक्रम सुरू करेल तेव्हा त्यांची पाटी कोरी नसेल. त्यांना शून्यापासून सुरूवात करावी लागणार नाही. त्यांच्याकडे पुर्वानुभवाचे गाठोडे असेल. इराणच्या अणुकार्यक्रमासाठी राबणारे बरेच शास्त्रज्ञ इस्त्रायलने ठार केले असले तरी पैसा फेकल्यावर असे आणखी बरेच मिळू शकतील.
इराणने अखेरचा हल्ला पहाटे चार वाजता केला. त्यानंतर इराण शांत आहे. इराणचे नेते अजूनही युद्ध थांबले आहे, ही बाब उघडपणे मान्य करत नाहीत. तसे ते मान्य करायचेही नसते. एक गोष्ट मात्र निश्चित १२ दिवसांच्या या युद्धात इराणने इस्त्रायलचेही मोठे नुकसान केलेले आहे. इराण पराभूत झाला असला तरी संपलेला नाही. डेथ टू इस्त्रायल ही घोषणा त्यांनी सोडलेली नाही किंवा बदललेलीही नाही. इस्त्रायलला गायब झालेल्या ४०० किलो युरेनियमचे गौडबंगाल छळत राहणार. ड्रिमिटी मेदव्हेदेव यांचे विधानही छळत राहाणार. इस्त्रायला यापुढेही सतर्क रहावे लागणार आहे. ऑपरेशन रायझिंग लायनचा सिझन-२ राबवावा लागेल.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
