मुंबई : देशाच्या सुरक्षेला आव्हान देणारे धक्कादायक पासपोर्ट फसवणुकीचे प्रकरण मुंबईत उघडकीस आले असून एका महिलेने बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल चार वेगवेगळे पासपोर्ट मिळवून मागील २६ वर्षांपासून विविध देशांमध्ये प्रवास केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी माहिम पोलिसांनी हमीदा उंद्रे उर्फ हमीदा मोतीवाला हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, डोंगरी येथील नाझिया इरफान गिगानी (३७) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघड झाला. संशयित महिलेने १९९६ ते २०२२ दरम्यान वेगवेगळ्या नाव, पत्ता आणि ओळखीचा वापर करून चार पासपोर्ट मिळवले. सुरुवातीच्या दोन पासपोर्टमध्ये तिने स्वतःचे नाव हमीदा अब्दुल कादर मोतीवाला असे नमूद केले होते, तर नंतरच्या दोन पासपोर्टमध्ये नाव बदलून हमीदा अब्दुल रहीम उंद्रे असे केले.
हे ही वाचा:
अब्रु वाचवण्यासाठी ६४ वर्षांनी पुन्हा क्युबा आठवला…
सुनेत्रा पवार होणार राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री
पाकिस्तानी कनेक्शन असलेल्या नार्को-नेटवर्कचा भांडाफोड
हिंदुस्तान एरोनॉटिक्स Dhruv-NG हेलिकॉप्टर्सची करणार निर्मिती; १,८०० कोटींची ऑर्डर
याशिवाय जन्मतारखेतही विसंगती आढळून आली. दोन पासपोर्टमध्ये ३० जून १९७१ तर इतर दोनमध्ये १३ सप्टेंबर १९६६ अशी जन्मतारीख नोंदवण्यात आली होती. काही दस्तावेजांत वडिलांचे नाव अब्दुल रहीम मेमन तर काही ठिकाणी अब्दुल कादर मिथू असे नमूद आढळले.
तपासात डोंगरी येथील शाळेचे बनावट शाळा सोडल्याचा दाखला वापरण्यात आल्याचे समोर आले. तसेच बीएमसीच्या नावाने सादर करण्यात आलेले जन्म प्रमाणपत्रही खोटे असल्याचे निष्पन्न झाले. रुग्णालय आणि ट्रस्टच्या नोंदीनुसार आरोपीची खरी जन्मतारीख २३ सप्टेंबर १९६६ असल्याचे स्पष्ट झाले असून ती पासपोर्टवरील माहितीसोबत जुळत नाही.
आणखी गंभीर बाब म्हणजे, एक पासपोर्ट २०१६ पर्यंत वैध असतानाही आरोपीने २०१४ मध्ये नवीन अर्ज करून तिसरा पासपोर्ट मिळवला व त्यानंतर चौथाही पासपोर्ट नूतनीकरणाद्वारे मिळवला. सध्या तिच्याकडे दोन सक्रिय पासपोर्ट असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
दरम्यान, याच कुटुंबाशी संबंधित मोहसीन उंद्रे याच्याविरुद्ध बलात्कार, फसवणूक, खंडणी आणि आयटी कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल असून त्याच तपासादरम्यान हा पासपोर्ट घोटाळा उघड झाला.
या प्रकरणी पार्कसाईट पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०,४६७, ४६८, ४७१ तसेच पासपोर्ट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी लवकरच आरोपीला अटक करून चार वेगवेगळे पासपोर्ट मिळवण्यामागील उद्देश आणि त्या आधारे केलेल्या परदेश प्रवासाची माहिती उघड करण्याचे संकेत दिले आहेत.
तज्ज्ञांच्या मते, बनावट ओळख वापरून आंतरराष्ट्रीय प्रवास करणे ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब असून या प्रकरणामुळे पासपोर्ट पडताळणी प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता तपास यंत्रणा या प्रकरणात पुढे काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







