27.8 C
Mumbai
Monday, July 20, 2026
घरविशेषहरित ट्रॅकवर वेगात; हायड्रोजन ट्रेन झोकात

हरित ट्रॅकवर वेगात; हायड्रोजन ट्रेन झोकात

Google News Follow

Related

भारताची पायाभूत विकासयात्रा आता केवळ रस्ते, पूल, मेट्रो, बुलेट ट्रेन, बंदरे किंवा विमानतळांपुरती मर्यादित राहिलेली नाही. देशाची विकासगाथा आता स्वच्छ ऊर्जा, हरित तंत्रज्ञान आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेकडे वेगाने वाटचाल करतेय. कार्बन उत्सर्जन कमी करणं, स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढवणं आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणं हे आज जगातील विकसित देशांचं प्रमुख ध्येय बनलय. भारतही या दिशेने वेगाने पावलं टाकत असून, विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत स्थान मिळवण्याच्या प्रयत्नांना नवे बळ देतोय.

या परिवर्तनात भारतीय रेल्वेची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची ठरतेय. देशातील बहुतांश रेल्वे मार्गांचं विद्युतीकरण वेगाने पूर्ण होत असतानाच, ज्या मार्गांवर विद्युतीकरण करणं तांत्रिक किंवा आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे, त्या मार्गांसाठी स्वच्छ आणि पर्यावरणपूरक इंधनावर चालणाऱ्या रेल्वेगाड्यांचा पर्याय विकसित केला जातोय. याच दिशेने भारतीय रेल्वेने आता हायड्रोजन इंधनावर धावणाऱ्या रेल्वेच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकलं असून, काही दिवसांपूर्वीच भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन रेल्वे रुळांवर धावताना दिसली.

जर्मनी, चीन आणि काही मोजक्या देशांनी हायड्रोजन रेल्वे तंत्रज्ञानात आघाडी घेतल्यानंतर आता भारतानेही या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात दमदार प्रवेश केलाय. भारतीय रेल्वेच्या इतिहासात नवं पर्व सुरू करणारी देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन आता वास्तवात आलीये. ही केवळ एक नवीन ट्रेन नाहीये, तर भारताच्या हरित पायाभूत सुविधांची, स्वदेशी अभियांत्रिकी क्षमतेची आणि भविष्यकालीन ऊर्जा तंत्रज्ञानाची ताकद दाखवणारा महत्त्वाचा टप्पा आहे.

पण ही हायड्रोजन ट्रेन नेमकी कशी चालते? ती डिझेल आणि इलेक्ट्रिक ट्रेनपेक्षा कशी वेगळी आहे? जगाच्या तुलनेत भारताची ही झेप किती महत्त्वाची आहे? आणि या एका प्रकल्पामुळे भारतीय रेल्वेच्या भविष्यात कोणते मोठे बदल घडू शकतात?

हायड्रोजन ट्रेन म्हटलं की अनेकांच्या मनात पहिला प्रश्न पडतो… ही ट्रेन नेमकी हायड्रोजन जाळून चालते का? तर उत्तर आहे – नाही. हायड्रोजन ट्रेनमध्ये हायड्रोजन फ्युएल सेल (Hydrogen Fuel Cell) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या फ्युएल सेलमध्ये साठवलेला हायड्रोजन आणि हवेतला ऑक्सिजन एकत्र येऊन वीज निर्माण करतात. याच विजेवर ट्रेनची इलेक्ट्रिक मोटर चालते. या संपूर्ण प्रक्रियेत धूर, कार्बन डायऑक्साइड किंवा इतर प्रदूषक वायू बाहेर पडत नाहीत. या अभिक्रियेचे उपउत्पादन म्हणजे पाण्याची वाफ आणि उष्णता. त्यामुळे हायड्रोजन ट्रेनला जगभरात ‘झिरो-एमिशन ट्रेन’ म्हणून ओळखलं जातं. यामुळेच भविष्यातील स्वच्छ आणि हरित सार्वजनिक वाहतुकीसाठी हायड्रोजन रेल्वेकडे एक प्रभावी पर्याय म्हणून पाहिलं जातय.

पण इथे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. भारताने हायड्रोजन ट्रेनचाच पर्याय का निवडला? देशात रेल्वेचं जवळपास संपूर्ण विद्युतीकरण झालेलं असताना या नव्या तंत्रज्ञानाची गरज नेमकी काय होती?

यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत. भारतीय रेल्वेने देशातील सुमारे ९९ टक्क्यांहून अधिक ब्रॉडगेज नेटवर्कचं विद्युतीकरण पूर्ण केलं असलं, तरी काही वारसा मार्ग (Heritage Routes), डोंगराळ भाग, वनक्षेत्र आणि कमी वाहतूक असलेले काही रेल्वे मार्ग अशा ठिकाणी पारंपरिक विद्युतीकरण करणं तांत्रिकदृष्ट्या अवघड किंवा आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरत नाही. अशा मार्गांवर आजही डिझेल इंजिनांचा वापर करावा लागतो. याच डिझेल इंजिनांना पर्यावरणपूरक पर्याय देण्यासाठी भारतीय रेल्वेने हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानाची निवड केली आहे. यामुळे डिझेलवरील अवलंबित्व कमी होईल, कार्बन उत्सर्जनात मोठी घट होईल आणि भारतीय रेल्वेच्या हरित परिवर्तनाला नवी गती मिळेल.

आता जाणून घेऊया भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत. माहितीनुसार, ही रेल्वे जगातील सर्वात लांब आणि सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेनसेट्सपैकी एक मानली जाते. या ट्रेनमध्ये आठ प्रवासी डबे आणि दोन ड्रायव्हिंग पॉवर कार, म्हणजेच दोन इंजिन असतील. दोन्ही इंजिन मिळून २४०० किलोवॅट (सुमारे ३२०० हॉर्सपॉवर) इतकी शक्ती निर्माण करतील.

भारतातील पहिली हायड्रोजन रेल्वे हरियाणातील जींद ते सोनीपत या मार्गावर धावणार आहे. या ट्रेनचा कमाल वेग ७५ किलोमीटर प्रतितास असेल. एका वेळी ६८२ प्रवासी या ट्रेनमधून प्रवास करू शकतील. दररोज दोन राउंड ट्रिप्स करत ही ट्रेन एकूण ३५६ किलोमीटरचा प्रवास करणार असून, त्यासाठी सुमारे ३०० किलो हायड्रोजनचा वापर केला जाणार आहे.

पण एवढी शक्तिशाली आणि पर्यावरणपूरक ट्रेन प्रत्यक्षात काम कशी करते? सामान्य इलेक्ट्रिक रेल्वेला धावण्यासाठी ओव्हरहेड विजेच्या तारांमधून वीज पुरवली जाते. मात्र, हायड्रोजन ट्रेनला अशा बाह्य वीजपुरवठ्याची गरज नसते. या ट्रेनमध्ये साठवलेला हायड्रोजन आणि हवेतला ऑक्सिजन यांच्या रासायनिक अभिक्रियेतून फ्युएल सेल वीज निर्माण करतो. या विजेची साथ लिथियम फेरो फॉस्फेट बॅटरी देते. त्यामुळे ट्रेनला सातत्याने आणि गरजेनुसार ऊर्जा मिळत राहते.

भारतातील या हायड्रोजन ट्रेनमध्ये दोन पॉवर कार म्हणजेच दोन इंजिन असून, प्रत्येक इंजिनमध्ये चार इंटिग्रेटेड पॉवर पॅक बसवण्यात आले आहेत. या पॉवर पॅकमध्ये हायड्रोजन फ्युएल सेल आणि लिथियम फेरो फॉस्फेट बॅटरीचा समावेश आहे. या सर्व पॉवर पॅकच्या मदतीने ट्रेनला आवश्यक ती उच्च क्षमता आणि सातत्यपूर्ण ऊर्जा मिळते. त्यामुळे ही ट्रेन स्वच्छ ऊर्जा-आधारित असण्याबरोबरच कार्यक्षमतेच्या बाबतीतही अत्यंत सक्षम ठरते.

या प्रकल्पातील आणखी एक लक्षणीय बाब म्हणजे ही ट्रेन पूर्णपणे नव्याने तयार करण्यात आलेली नाहीये. उत्तर रेल्वेने जुन्या डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (DEMU) रेकमधील डिझेल इंजिन काढून त्याजागी अत्याधुनिक हायड्रोजन-इलेक्ट्रिक प्रोपल्शन प्रणाली बसवून त्याचे रूपांतर हायड्रोजन ट्रेनमध्ये केले आहे. त्यामुळे विद्यमान रेल्वेचे हरित तंत्रज्ञानात रूपांतरही शक्य असल्याचे भारतीय रेल्वेने दाखवून दिले आहे.

या संपूर्ण तंत्रज्ञानाचा कणा म्हणजे हायड्रोजन फ्युएल सेल. हे फ्युएल सेल कॅनडातील बलार्ड (Ballard) या जगप्रसिद्ध कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत, तर हायड्रोजन प्रोपल्शन प्रणालीचे एकत्रीकरण आणि तांत्रिक रूपांतरणाचे काम हैदराबादस्थित मेधा सर्वो ड्राइव्ह्ज या भारतीय कंपनीने केले आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात २०२०-२१ मध्ये उत्तर रेल्वेने केली होती. सुमारे १३६ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम एप्रिल २०२२ मध्ये सुरू झाले. हायड्रोजन प्रोपल्शन प्रणाली विकसित करण्याची जबाबदारी हैदराबादस्थित मेधा सर्वो ड्राइव्ह्ज या कंपनीकडे सोपवण्यात आली. आवश्यक तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर २२ मे रोजी रेल्वे मंत्रालयाने या ट्रेनला मंजुरी दिली.

विशेष म्हणजे, ही भारतातील पहिलीच हायड्रोजन ट्रेन असणार आहे. त्यामुळे तिच्या कार्यक्षमतेची आणि प्रत्यक्ष कामगिरीची भारतीय रेल्वेकडून बारकाईने चाचणी घेतली जाणार आहे. या प्रकल्पाचे परिणाम समाधानकारक ठरल्यास भविष्यात देशातील इतर मार्गांवरही हायड्रोजन ट्रेन सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

हायड्रोजन ट्रेन सुरू करणं म्हणजे केवळ नवीन रेल्वे रुळांवर आणणं नाही. त्यासाठी संपूर्ण नवीन पायाभूत व्यवस्था उभी करावी लागते. हायड्रोजनची सुरक्षित साठवणूक, ट्रेनमध्ये इंधन भरण्यासाठी रिफ्युलिंग स्टेशन, उच्च दाबाच्या साठवणूक टाक्या, गळती शोधणारी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, अग्निसुरक्षा व्यवस्था आणि विशेष देखभाल सुविधा अशा अनेक घटकांची उभारणी आवश्यक असते.

याचाच एक भाग म्हणून भारतीय रेल्वेने हरियाणातील जींद येथे देशातील पहिले विशेष हायड्रोजन फिलिंग स्टेशन उभारले आहे. या केंद्रामध्ये सुमारे ३,००० किलो हायड्रोजन साठवण्याची क्षमता असून, अत्यंत सुरक्षित पद्धतीने साठवलेला हायड्रोजन येथून थेट ट्रेनच्या इंधन टाक्यांमध्ये भरला जाणार आहे. याशिवाय, दिल्लीतील शकूरबस्ती येथे या ट्रेनच्या देखभाल आणि तांत्रिक सेवेसाठी विशेष सुविधा उभारण्यात आली आहे. म्हणजेच, भारत केवळ एक ट्रेन तयार करत नाही, तर भविष्यातील हायड्रोजन-आधारित रेल्वे परिसंस्थेची पायाभरणी करत आहे.

हायड्रोजन हा अत्यंत ज्वलनशील वायू असल्यामुळे सुरक्षेलाही सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. ट्रेनची रचना, इंधन प्रणाली आणि संपूर्ण कार्यप्रणाली आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांनुसार विकसित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जर्मनीतील TÜV SÜD या जागतिक स्तरावरील स्वतंत्र प्रमाणन संस्थेने या प्रकल्पाच्या सुरक्षा आणि तांत्रिक मानकांचे मूल्यांकन केले आहे. त्यामुळे हायड्रोजन तंत्रज्ञानाचा वापर करतानाही सुरक्षिततेची उच्च पातळी सुनिश्चित करण्याचा भारतीय रेल्वेचा प्रयत्न दिसून येतो.

आता पाहूया, या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या शर्यतीत भारताची जागतिक स्तरावर नेमकी स्थिती काय आहे. हायड्रोजन रेल्वे तंत्रज्ञानात सर्वात आधी मोठी झेप घेतली ती जर्मनीने. २०२२ मध्ये जर्मनीने जगातील पहिली व्यावसायिक हायड्रोजन प्रवासी रेल्वे सेवा सुरू करत वाहतूक क्षेत्रातील हरित क्रांतीला नवी दिशा दिली. त्यानंतर चीननेही स्वतःची हायड्रोजन ट्रेन विकसित केली. फ्रान्स, इटली, ऑस्ट्रिया, जपान आणि दक्षिण कोरिया यांसारखे अनेक देशही या तंत्रज्ञानाच्या विकास, चाचण्या आणि विस्तारावर मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत.

अशा वेळी भारताने या शर्यतीत तुलनेने उशिरा प्रवेश केला असला, तरी त्याची रणनीती वेगळी आहे. भारतीय रेल्वेच्या माहितीनुसार, भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन ही जगातील सर्वात शक्तिशाली म्हणजे २४०० किलोवॅट क्षमतेच्या आणि सर्वात लांब हायड्रोजन ट्रेनसेट्सपैकी एक असेल. यावरून स्पष्ट होते की, भारत केवळ जगाच्या पावलावर पाऊल ठेवत नाही, तर आपल्या गरजांनुसार अधिक शक्तिशाली, अधिक क्षमतेची आणि मोठ्या प्रवासी वहनासाठी सक्षम अशी हायड्रोजन ट्रेन विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे, भारत हा हायड्रोजन ट्रेन विकसित करणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीत सामील होत आहे. यामुळे भविष्यात हायड्रोजन रेल्वे तंत्रज्ञानाच्या संशोधन, उत्पादन आणि स्वदेशी उत्पादनक्षमतेला चालना मिळण्याची, तसेच भारताला या क्षेत्रात जागतिक स्तरावर महत्त्वाचे स्थान मिळवण्याची संधी निर्माण होऊ शकते.

हे ही वाचा:

अंडी-चिकन महागले; सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका!

मोदींच्या आवाहनालाही छेद! सोन्याचे दर घसरताच खरेदी पुन्हा वाढली

‘विक्रम-1’ झेपावले; भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्राचे नवे पर्व

लॉर्ड्समधील सामना रोहितचा अखेरचा नाही!

या प्रकल्पामागील उद्दिष्ट केवळ एक ट्रेन सुरू करण्यापुरते मर्यादित नाही. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन, २०७० पर्यंतचे ‘नेट-झिरो’ कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य आणि भारतीय रेल्वेला अधिक स्वच्छ, आधुनिक व भविष्योन्मुख बनवण्याची दीर्घकालीन रणनीती यामागे आहे. भविष्यात हायड्रोजन उत्पादनाचा खर्च कमी झाला, इंधनाची उपलब्धता वाढली आणि या तंत्रज्ञानाची विश्वासार्हता सिद्ध झाली, तर भारतीय रेल्वेत त्याचा वापर अधिक व्यापक प्रमाणावर होऊ शकतो. मात्र, हायड्रोजन तंत्रज्ञान अजूनही तुलनेने महाग असून, त्याचे उत्पादन, साठवणूक आणि वाहतूक यासाठी मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे. त्यामुळे त्याचा विस्तार टप्प्याटप्प्यानेच होण्याची शक्यता आहे.

पण या संपूर्ण प्रकल्पाचा भारताला नेमका फायदा काय? सर्वात मोठा फायदा म्हणजे डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्याची संधी. त्यामुळे दीर्घकालीन दृष्टीने इंधन आयातीवरील खर्च कमी करण्यास हातभार लागू शकतो. त्याचबरोबर कार्बन उत्सर्जनात घट होऊन भारतीय रेल्वे अधिक स्वच्छ आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेकडे वाटचाल करेल. भविष्यात देशात हरित हायड्रोजनचे उत्पादन आणि पुरवठा वाढला, तर ऊर्जा सुरक्षेलाही बळ मिळू शकते. शिवाय, हायड्रोजनसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासामुळे भारतीय उद्योग, संशोधन आणि स्वदेशी अभियांत्रिकी क्षेत्रालाही नवी संधी निर्माण होऊ शकते.

एकूणच काय, भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन ही भारतीय रेल्वेच्या तांत्रिक परिवर्तनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रकल्पातून स्वदेशी अभियांत्रिकी क्षमता, अत्याधुनिक ऊर्जा तंत्रज्ञान, सुरक्षित पायाभूत सुविधा आणि नवोन्मेषी रेल्वे व्यवस्थेची दिशा स्पष्ट होत आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ एका नव्या ट्रेनपुरता मर्यादित नसून, भविष्यात भारतीय रेल्वे कोणत्या दिशेने वाटचाल करणार आहे, याची झलकही यातून दिसते.

पुढील काळात हायड्रोजन तंत्रज्ञान अधिक किफायतशीर, विश्वासार्ह आणि व्यापक प्रमाणात उपलब्ध झाले, तर भारतीय रेल्वेत त्याचा वापरही वाढू शकतो. यामुळे भारतीय रेल्वे अधिक आत्मनिर्भर, तंत्रज्ञानसंपन्न आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकू शकते. त्यामुळे हा प्रकल्प केवळ एका नवीन रेल्वे सेवेपुरता मर्यादित नसून, विकसित भारताच्या आधुनिक, स्वच्छ आणि भविष्याभिमुख पायाभूत विकासाचे प्रतीक ठरू शकतो.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
321,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा