आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वसर्मा यांनी काँग्रेसचे लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई यांच्यावर पाकिस्तान कनेक्शन संदर्भात एसआयटीचा अहवाल उघड केला आहे. गेल्या वर्षी त्यांनी एसआयटीची घोषणा केली होती. तपासात समोर आलेली माहिती त्यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत उघड केली. ही माहिती गंभीर स्वरुपाची आहे. हिमंता यांच्या आरोपावरून एक गोष्ट स्पष्ट आहे, त्यांचे आरोप फक्त गौरव गोगोई यांच्यापुरते मर्यादीत नसून ते यूपीए सरकारच्या काळातील सर्वशक्तीमान व्यक्तिकडे म्हणजेच थेट सोनिया गांधी यांच्याकडे बोट दाखवतायत.
हिंमंता हे एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत, गौरव गोगोई यांनी २०१३ च्या पाकिस्तान भेटीत आयबीचे काही संवेदनशील अहवाल पाकिस्तानला दिले असा आरोप त्यांनी केला आहे. गौरव हे आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे चिरंजीव आहेत. एका मुख्यमंत्र्याचा मुलगा पैशासाठी हे करणार नाही ही बाब उघड आहे, मग पाकिस्तानला ही मदत कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली आणि का कऱण्यात आली या प्रश्नाची उत्तरे देशाला मिळायला पाहीजेत.
गौरव गोगोई २०१३ मध्ये खासदार किंवा काँग्रेसचे पदाधिकारी नव्हते. परंतु गांधी परिवाराशी जवळीक ही खासदारकी किंवा काँग्रेसच्या पदापेक्षा कितीतरी शक्तीशाली बाब आहे. राहुल गांधी आपल्या लाडक्या कुत्र्या इतके महत्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना देत नाहीत, याचा अनुभव स्वत: हिमंता यांनी घेतला आहे. हिमंता गौरव गोगोई यांच्यावर आय़बीचे अहवाल पाकिस्तानला देऊ केल्याचा आरोप करत असतील तर ते थेट केंद्र सरकारशी संबंधित काही शक्तीशाली लोकांबाबत संकेत देतायत. गोगोई हे राहुल गांधी यांचे निकटवर्ती आहेत, हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. यूपीएच्या कार्यकाळात सोनिया गांधी या सुपर प्रायमिनिस्टर होत्या हेही सर्वश्रुत आहे.
पाकिस्तान भेटीवरून हिमंता यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात गौरव गोगोई यांच्यावर पहीला आरोप केला होता. गोगोई पाकिस्तानाच्या गृहखात्याच्या निमंत्रणावरून पाकिस्तानात गेले होते. त्यांचा व्हीसा लाहोरपर्यंत मर्यादीत असताना पाकिस्तान सरकारने त्यांना व्हीसा इस्लामाबाद, कराचीपर्यंत वाढवून दिला. त्यांनी या दहा दिवसांच्या भेटीबाबत प्रचंड गोपनीयता बाळगली. पाकिस्तानात ते ट्रेनिंग घेण्यासाठी गेले होते, हे हिमंता यांनी केलेले आरोप आहेत. खासदार झाल्यानंतर त्यांनी संसदेत भारताची रडार, पाणबुड्या, लष्करी सज्जता, अणू इंधन आदी अत्यंत संवेदनशील विषयांबाबत संसदेत प्रश्न विचारले होते, याकडेही त्यांनी गेल्या वर्षी लक्ष वेधले होते.
आसाममध्ये होणाऱ्या यंदाच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंमता हे आरोप करत आहेत, यात निव्वळ राजकारण असल्याचा दावा गोगोई यांनी केला आहे. मी पाकिस्तानात गेलो होतो तेव्हा मी खासदार नव्हतो, काँग्रेसचा नेताही नव्हतो, ही भेट वैयक्तिक होती, मी माझ्या पत्नीला भेटायला गेलो होतो हा त्यांचा खुलासा आहे.
हिमंता यांची पत्रकार परिषद सी ग्रेड सिनेमासारखी होती, असा दावा गोगोई यांनी केला आहे. असे क्षणभर गृहीत धरले की यात राजकारण आहे, तरी हिमंता यांनी केलेले अनेक आरोप असे आहेत जे हाती कागदपत्र नसताना केले असण्याची शक्यता नाही. हे आरोप बिनबुडाचे असते तर गोगोई यांनी हिमंतांना न्यायालयात खेचले असते. कारण त्यांच्याविरोधात कऱण्यात आलेले आरोप भ्रष्टाचाराचे नसून देशद्रोहाचे आहेत. गोगोई यांच्याविरोधात आसाममध्ये एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे.
गौरव हे तीन वेळा सलग खासदार आहे. तरीही त्यांची पत्नी एलिझाबेथ कोलबर्न आजही ब्रिटीश नागरीक आहे. तिला भारतीय नागरीकत्व घेण्याची गरज भासली नाही. ती धर्माने ख्रिस्ती आहे. ती पाकिस्तानातील लीड या एनजीओसाठी काम करत होती. ही एनजीओ जलवायू परिवर्तन या विषयासाठी काम करत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात या एनजीओचा आयएसआयशी संबंध आहे. अली तौकीर शेख हा पाकिस्तानच्या नियोजन आयोगाचा माजी सदस्य असून तो आयएसआयशी संबंधित आहे. इथे हिमंता अली तौकीर शेख याला आयएसआय़चा हॅण्डलर असल्याचे सुचवतायत. एलिझाबेझचे पाकिस्तानच्या बँकांमध्ये खाते आहे. लीड या एनजीओतील भारतातील प्रमुखांना बाजूला ठेवून एलिझाबेथ नियमितपणे अलीशी संपर्कात होती. हा अली य़ूपीएच्या कारकीर्दीत भारता अनेकदा आला होता. सोशल मीडियावर सतत भारतविरोधी नरेटीव्ह चालवत असूनही त्याला भारताचा व्हीसा देण्यात आला. गौरव गोगोईवर जेव्हा भारतात एफआयआर दाखल झाला तेव्हा अली तौकीरने एक्सवर टाकलेल्या सगळ्या पोस्ट हटवल्या. फॉरीन कॉण्ट्रीब्युशन रेग्युलेशन एक्टचे उल्लंघन करून पाकिस्तानातून एलिझाबेथ यांच्या खात्यात थेट पैसे येत होते. गोगोई दांपत्याला दोन मुले आहेत, त्या दोघांनी ब्रिटीश नागरीकत्व स्वीकारले आहे. दहा वर्ष वय असलेल्या मुलाबाबत सरकारी कागदपत्रात धर्माची माहिती देताना न्यूट्रल आणि सहा वर्षांच्या मुलीबाबत ती ख्रिस्ती असल्याची माहिती पालकांनी दिली असल्याची माहिती हिमंता यांनी दिली आहे.
एक नेता जो सार्वजनिक जीवनात हिंदू म्हणून मिरवतो, तो एका ब्रिटीश ख्रिस्ती तरुणीसोबत विवाह करतो इथपर्यंत ठिक आहे, परंतु मुलांना ब्रिटीश नागरीक का बनवतो, त्यांचे धर्मांतर का करतो, या प्रश्नांचे उत्तर गोगोई यांना द्यावेसे वाटत नाही. सोनिया गांधी यांचे निकटवर्ती असलेले अनेक नेते असे आहेत, जे फक्त नावापुरते हिंदू असून त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला आहे. गौरव गोगोई हे त्यातलेच एक आहेत काय? भारतविरोधी अली तौकीरला सतत भारतात येता आले, याचे कारण केंद्र सरकारची त्याला हरकत नव्हती. ही बाबही सामान्य नाही आणि सरळही नाही.
हे ही वाचा:
गोवा विशेष: वाहन नोंदणीचे नियम कडक
२०२६-२७ मध्ये भारत जी २० देशांना मागे टाकत होणार नंबर १
“गोगोई यांनी पाकिस्तान गृहमंत्रालयाने दिलेले पत्र सार्वजनिक करावे”
दुचाकीच्या मोहापायी अनाथ तरुण बनला चोर
२०१३ मध्ये साधे खासदार नसलेले गोगोई दहा दिवस पाकिस्तानमध्ये जातात, आपण पत्नीला भेटायला गेलो होतो, असा दावा करतात. परंतु त्यांची पत्नी जर हिमंता यांच्या म्हणण्यानुसार २०१२ मध्ये भारतात परतली असेल तर मग ते पाकिस्तानात कशाला गेले? हा सवाल निर्माण होतोच.
हिंमंता यांनी केलेले आरोप जसे फक्त गौरव यांच्या पुरते मर्यादीत नाहीत, तसा हा तपास सुदधा फक्त आसाम पोलिसांपर्यंत मर्यादीत राखला जाऊ शकत नाही. हा एनआयएस आणि भारतीय गुप्तचर यंत्रणांशी संबंधित तपास आहे. त्यांच्या पातळीवरच यापैकी अनेक प्रश्नांची उकल होऊ शकेल. परंतु जी माहिती समोर येते आहे, त्यावरून असा अंदाज बांधणे शक्य आहे की, केंद्र सरकारमधील एखाद्या वजनदार व्यक्तिच्या इशाऱ्यावरून गौरव यांची पाकिस्तान भेट झाली होती.
यूपीए सरकारच्या काळात काँग्रेसचे अनेक नेते पाकिस्तानी सरकारच्या थेट संपर्कात होते. २००८ चा मुंबई हल्ला असो वा २०११ चा मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला. दहशतवादी हल्ले हे पाकिस्तान सरकार प्रायोजित असले तरी यूपीए सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते. हे नॉन स्टेट एक्टर्स आहेत, हा पाकिस्तानी खुलासा मान्य केला जात होता. देशहितापेक्षा मतांचे गणित यूपीएसाठी महत्वाचे होते, म्हणूनच २००८ च्या हल्ल्यानंतर डॉ.मनमोहन सिंह यांनी पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी लष्कराचा वापर टाळला कारण त्यांना यामुळे भारतात मुस्लीम विरोधी भावना वाढतील आणि त्याचा फायदा विरोधी पक्षांना होईल अशी भीती वाटत होती, असा स्पष्ट उल्लेख अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या ए प्रॉमिस्ड लॅण्ड या आत्मचरीत्रात केलेला आहे.
म्हणजे काँग्रेसने कायम भारतातील अल्पसंख्यकांचा संबंध पाकिस्तानशी जोडण्याचा प्रयत्न केला. मणिशंकर अय्यर यांच्यासारख्या नेत्यांच्या सतत होणाऱ्या पाकिस्तान भेटी आणि त्यांच्या तोंडी असलेली पाकिस्तानची स्तुती हा काँग्रेसच्या वोट बँक पॉलिटीक्सचा भाग होता. त्यामुळेच प्रश्न निर्माण होतो की, गौरव गोगोई हे २०१४ च्या निवडणुकीपूर्वी कोणाच्या सांगण्यावरून पाकिस्तानमध्ये गेले होते. तिथे जाऊन त्यांनी कोणाकोणाच्या भेटी घेतल्या.
अलिकडेच एप्स्टीन फाईल्समध्येही ही बाब उघड झाली आहे की, २०१४ च्या निवडणुकीपूर्वी सोनिया गांधी जेफ्री एपस्टीनच्या संपर्कात होत्या. निवडणूक जिंकण्याचे धडे घेत होत्या. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी सगळे परकीय संपर्क वापण्याचा त्यांचा प्रयत्न होता. याच प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांनी पाकिस्तानसोबत काही समझौता केला होता का? असे काय कारण होते, ज्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत पहील्यांदा लोकसभेत पोहोचलेल्या गौरव गोगोई यांना काँग्रेसने लोकसभेतील उपनेते पद बहाल केले. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देशाच्या जनतेला हवी आहेत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







