केरळच्या पालक्काड जिल्ह्यातील एका फिटनेस सेंटरने स्वतःला ‘इस्लामिक-अनुकूल जिम’ (Islam-friendly) म्हणून संबोधल्याच्या घोषणेमुळे वाद निर्माण झाला आहे. अनेकजण या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. पुथुनागरम येथील जिमने एक प्रमोशनल व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर हा वाद सुरू झाला, ज्यामध्ये मालक नवाज मुथू टी याने सांगितले की, ही सुविधा मोठ्या आवाजातील संगीताशिवाय चालवली जाईल आणि पुरुष व महिलांसाठी व्यायामाच्या वेगवेगळ्या वेळा आणि जागा असतील. त्याने असेही सांगितले की, प्रशिक्षकांना वेगळे ठेवले जाईल.
“आम्ही एक इस्लाम-अनुकूल जिम सुरू करत आहोत आणि मला विश्वास आहे की, केरळमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच जिम असेल. इच्छुक कोणीही माझ्याशी संपर्क साधू शकतात आणि या सुविधेला भेट देऊ शकतात,” असे नवाझ यांनी व्हिडिओमध्ये सांगितले. त्यांनी पुढे असेही सांगितले की, ही जिम काही नवीन उपक्रम नसून, सुमारे १५ वर्षांपासून कार्यरत असलेले एक जुने फिटनेस सेंटर आहे, ज्याचे सध्या नूतनीकरण सुरू आहे.
संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, त्या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी हा उपक्रम केवळ मुस्लिमांसाठीच असेल का, असा प्रश्न उपस्थित केला. टीकेनंतर, मूळ प्रचारात्मक व्हिडिओ काढून टाकण्यात आला आणि एका नवीन क्लिपमध्ये नवाज याने सांगितले की ही सुविधा सर्व धर्मांच्या लोकांसाठी खुली आहे आणि ती केवळ मुस्लिमांसाठी असलेली व्यायामशाळा नव्हती. “बरेच लोक म्हणतात की ही मुस्लिमांची जिम आहे किंवा फक्त मुस्लिमांसाठीच असलेली जिम आहे. मी तसे म्हणत नाही. मी कधीही असे म्हटलेले नाही की ही फक्त मुस्लिमांसाठी असलेली जिम आहे,” असे स्पष्टीकरण त्याने दिले आहे.
प्रकल्पामागील कल्पना स्पष्ट करताना नवाज म्हणाला की, ‘इस्लामिक-अनुकूल’ ही संज्ञा कोण सामील होऊ शकते यावरील निर्बंधांऐवजी विशिष्ट कार्यपद्धतींशी संबंधित आहे. “इस्लामिक-अनुकूल व्यायामशाळेच्या बाबतीत, महिला आणि पुरुषांनी एकत्र व्यायाम करू नये. महिलांसाठी वेगळी वेळ आणि वेगळी जागा असावी. पुरुषांसाठीही वेगळी वेळ असावी. मोठ्या आवाजातील संगीत नसावे,” असे तो म्हणाला. नवाज पुढे म्हणाला की, जे लोक अशा नियमांचे काटेकोरपणे पालन करतात, त्यापैकी बरेच जण सध्या जिममध्ये जाणे टाळतात, कारण त्यांना मिश्र व्यायामाच्या जागा किंवा मोठ्या आवाजातील संगीतामुळे अस्वस्थ वाटते.
हे ही वाचा:
भारत-बांगलादेश सीमेवर दक्षिण त्रिपुरात ३४ किलो गांजा जप्त
बिहारच्या रुग्णालयात आग; चार जण दगावले
आग पाहून घटनास्थळावरून पळ आणि अग्निसुरक्षा ना हरकत प्रमाणपत्र न मिळाल्याचे कबूल
सरकारी रोख्यांमधील परदेशी गुंतवणूकदारांना भांडवली नफा करात सूट देणार
“बरेच मुस्लिम इस्लामी तत्त्वांनुसार जगतात. ते संगीत ऐकत नाहीत. त्यांच्यासाठी व्यायामशाळा नाही. जेव्हा तुम्ही व्यायामशाळेत जाता, तेव्हा संगीत बंद करणे शक्य नसते. अशा काही महिला आहेत ज्यांना मिश्र वातावरणात व्यायाम करणे गैरसोयीचे वाटते. हे असे लोक आहेत ज्यांना आतापर्यंत व्यायामशाळांमध्ये प्रवेश मिळू शकला नाही,” असे तो म्हणाला. तसेच आपण मुस्लीम असल्याने अनेक लोक अशा कारणांमुळे व्यायामशाळेत जात नसल्याचे माहित आहे असे तो पुढे म्हणाला.







