दक्षिण फिलिपिन्समध्ये सोमवार, ८ जून रोजी सकाळी झालेल्या ७.८ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपानंतर इंडोनेशिया आणि जपानने त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. इंडोनेशियाच्या हवामान, हवामानशास्त्र आणि भूभौतिकी संस्थेने (BMKG) पूर्वोत्तर इंडोनेशियातील किनारी भागांसाठी प्राथमिक त्सुनामीचा इशारा दिला आहे.
फिलिपिन्सच्या ज्वालामुखी व भूकंपशास्त्र संस्थेच्या माहितीनुसार, हा भूकंप सोमवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार ७.३७ वाजता झाला. भूकंपाची तीव्रता ७.८ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असून त्याचे केंद्र समुद्रात, मिंडानाओ बेटावरील सारंगानी प्रांतातील माआसिम शहराच्या किनाऱ्यापासून सुमारे ३२ किलोमीटर नैऋत्येस होते. भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली ३३ किलोमीटर खोलीवर होता. संस्थेने नऊ किनारी प्रांतांसाठी त्सुनामीचा इशारा जारी करत नागरिकांना तातडीने उंच ठिकाणी स्थलांतर करण्याचे किंवा समुद्रकिनाऱ्यापासून दूर जाण्याचे आवाहन केले आहे.
त्सुनामीच्या पहिल्या लाटा सोमवारी सकाळीच किनाऱ्यावर पोहोचू शकतात आणि त्याचा परिणाम अनेक तास जाणवू शकतो, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, भूकंपामुळे काही इमारतींचे नुकसान झाले असून अनेक भागांमध्ये वीजपुरवठाही खंडित झाला आहे. आसपासच्या प्रांतांमध्येही भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले.
सध्या इंडोनेशिया आणि फिलिपिन्समध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी किंवा गंभीर नुकसानीची माहिती समोर आलेली नसली, तरी भूकंपाच्या केंद्राजवळील भागांमध्ये जोरदार हादरे बसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा भूकंप मिंडानाओजवळील समुद्रात झाला. मिंडानाओ हे फिलिपिन्समधील दुसरे सर्वात मोठे बेट असून जगातील सर्वाधिक भूकंपीयदृष्ट्या सक्रिय प्रदेशांपैकी एक मानले जाते. फिलिपिन्स हा ‘रिंग ऑफ फायर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूकंपीय पट्ट्यात स्थित आहे. येथे अनेक टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांना भिडत असल्याने वारंवार भूकंप आणि ज्वालामुखी उद्रेक होत असतात.
हे ही वाचा:
पश्चिम आशियातील तणावाचा बाजाराला फटका; सेन्सेक्स-निफ्टीत १% पेक्षा जास्त घसरण
नीट पुनर्परीक्षा प्रक्रियेतील तज्ञ २१ जूनपर्यंत लॉकडाउनमध्ये!
… आणि ट्रम्प मुलाखतीदरम्यान संतापले; मायक्रोफोन काढला, निघून गेले!
इराणच्या हल्ल्यावर इस्रायलचे प्रत्युत्तर; राजधानीसह अनेक शहरांवर डागली क्षेपणास्त्रे
दरम्यान, जपानच्या हवामान खात्यानेही त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. फिलिपिन्समधील या शक्तिशाली भूकंपामुळे जपानच्या पूर्व पॅसिफिक किनारपट्टीवरील इबाराकी प्रांतापासून दक्षिणेकडील ओकिनावा बेटापर्यंतच्या किनारी भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.







