वोटचोरीचे मढे खांद्यावर घेऊन ते चालू लागले… विरोधकांच्या वोटचोरीच्या आरोपाचे पोतेरे करणारे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केले. यानंतर खरे तर राहुल गांधी यांनी राख फासून इटलीत तोंड काळे केले पाहिजे. काँग्रेसच्या रामलीला मैदानावरील प्रोटेस्ट रॅलीची निवडणूक आयोगाने हवाच काढून घेतली आहे. इथे पुन्हा काँग्रेसच्या मदतीला इंडियन एक्सप्रेस आलेले आहे. त्यांनी प्रतिज्ञापत्रातील तथाकथित त्रुटीबाबत आणखी एक बातमी प्रसिद्ध केली आहे. परंतु एकूणच या घटनाक्रमाची टाइमलाइन लक्षात घेतली तर वोटचोरी ही बकवास आहे, ही बाब पुरेशी उघड होऊ शकते. एसआयआरबाबत काँग्रेस आणि त्यांच्या इकोसिस्टमने घेतलेले सगळेच आक्षेप हे बिनबुडाचे आहेत, याबाबत आता जनतेच्या मनात तरी शंका नाही. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात १५ महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही निवडणूक आयुक्तांच्या सहीने हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, याचिकाकर्त्यांची याचिका ही मुख्यत्वे एका बातमीवर आधारित आहे. या अर्धवट बातमीच्या आधारे वोटचोरी नावाचा पत्त्याचा बंगला बनवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, त्यांचा व्यवस्थित गेम झालेला आहे.



