अमेरिकन शेअर बाजार ५ जून २०२६ रोजी, म्हणजे शुक्रवारी कोसळला. गुंतवणूकदारांचे १.३ ट्रिलियन डॉलरचे नुकसान झाले. अमेरिकी बाजारात एआयचा बुडबुडा फुटणार, अशी चर्चा बराच काळ सुरू होती. तो खरोखरच फुटायला शुरुवात झाली आहे का, असा प्रश्न शुक्रवारच्या गडगडाटानंतर निर्माण झाला आहे. बाजारातील घसरणीमागे अलीकडे अर्थकारण कमी आणि पडद्यामागील शक्तिशाली सूत्रधारांचा खेळ जास्त असतो. ताज्या घसरणीमागे असेच एखादे अतर्क्य कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एखादे वक्तव्य करतात. ते सकारात्मक असते तेव्हा शेअर बाजार वर जातो, नसते तेव्हा कोसळतो. शेअर बाजारातील या ट्रम्प फॅक्टरमुळे त्यांच्या निकटवर्तीय असलेल्या अनेकांचे भाग्य फळफळले आहे. बाजार उसळो वा कोसळो, हीच मंडळी पैसे कमावत आहेत. त्यामुळे शुक्रवारी कोसळलेल्या शेअर बाजारामागे काही आर्थिक कारण आहे की, असाच एखादा बिनचेहऱ्याचा अज्ञात सूत्रधार, याबाबत अनेकांच्या मनात गोंधळ आहे.



