मुखी ‘माऊली… माऊली…’चा अखंड जयघोष, कपाळी बुक्का, गळ्यात तुळशीची माळ आणि हृदयात विठुरायाच्या भेटीची आस… अशा भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील अत्यंत श्रद्धेचा ‘नीरा स्नान’ सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला. माऊलींच्या पादुकांना नीरा नदीच्या पवित्र तीर्थात स्नान घालण्यात येताच हजारो वारकऱ्यांनी केलेल्या जयघोषाने अवघा परिसर भक्तिरंगात न्हाऊन निघाला.
‘ज्ञानोबा माऊली तुकाराम…’, ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल…’ या नामघोषाने नीरा नदीचा काठ दुमदुमून गेला. माऊलींच्या पादुकांच्या पवित्र स्नानाचा अनुपम सोहळा डोळ्यांत साठवण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. माऊलींच्या पादुकांचे दर्शन होताच अनेक वारकऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या निनादात प्रत्येक वारकरी जणू विठ्ठलभक्तीत तल्लीन झाला होता.
पालखी सोहळा सकाळी साडेसहा वाजता रामायणकार मारुती वाल्मिक यांच्या वाल्हानगरीतून नीरेकडे मार्गस्थ झाला. सकाळी आठ वाजता न्याहारीसाठी पिंपरे (खुर्द) येथील अहिल्याबाई होळकर विहिरीजवळ विसावा घेण्यात आला. पिंपरे आणि पिसुर्टी ग्रामस्थांनी माऊलींच्या पालखीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले. ग्रामीण भागातील महिला आणि ग्रामस्थांनी भाकरी, वांग्याच्या चटण्या, खरडा आणि ताज्या रानभाज्यांचा प्रेमळ नैवेद्य वारकऱ्यांसाठी आणला होता. ‘वारकरी म्हणजे आपला पाहुणा आणि माऊलींचा भक्त’ या भावनेतून ग्रामस्थांनी केलेल्या आदरातिथ्याने वारकऱ्यांची मने जिंकली.
अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर पालखी सोहळा दुपारच्या भोजनासाठी नीरेकडे मार्गस्थ झाला. नीरा नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात माऊलींच्या पालखीचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ आणि हजारो भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
दुपारी पालखी सोहळा नीरा नदीकाठावरील नयनरम्य विसावास्थळी पोहोचला आणि वारकऱ्यांना प्रतीक्षा असलेला माऊलींच्या पादुकांचा ‘नीरा स्नान’ सोहळा सुरू झाला. ब्रिटिशकालीन जुन्या पुलाजवळ नीरा नदीच्या पवित्र पात्रात माऊलींच्या पादुकांना भक्तिभावाने स्नान घालण्यात आले. मानाचे दोन अश्व, भगव्या पताका आणि फुलांनी सजलेला माऊलींचा रथ यामुळे सोहळ्याला विलक्षण तेज प्राप्त झाले होते.
हेही वाचा :
नवी मुंबई विमानतळावरून पहिले आंतरराष्ट्रीय विमान अबूधाबीला रवाना
कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाची संवेदनशील माहिती डार्क वेबवर?
बंगालमधील सरकार बदलल्यामुळे तस्लिमा नसरिन १९ वर्षांनी कोलकात्यात येणार
पुतिन यांना अण्वस्त्र वापरण्यापासून पंतप्रधान मोदींनी रोखले!







