मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे आणि जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारताने कच्च्या तेलासाठी पर्यायी देशांकडे मोर्चा वळवला असून व्हेनेझुएलाकडून होणाऱ्या तेल आयातीत मोठी वाढ झाली आहे. मे २०२६ मध्ये व्हेनेझुएला भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कच्चे तेल पुरवठादार ठरला आहे. रशिया आणि संयुक्त अरब अमिरातीनंतर आता व्हेनेझुएलाचे स्थान असून त्याने सौदी अरेबिया आणि अमेरिकेलाही मागे टाकले आहे.
भारतातील सर्वात मोठी खासगी रिफायनरी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने व्हेनेझुएलाच्या जड आणि स्वस्त कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू केली आहे. एप्रिल २०२६ मध्ये रिलायन्सने दररोज सुमारे २ लाख १९ हजार बॅरल तेलाची आयात केली होती. मे महिन्यात हा आकडा वाढून ३ लाख ५० हजार ते ४ लाख बॅरल प्रतिदिनपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुजरातमधील जामनगर रिफायनरीमध्ये जड दर्जाच्या तेलावर प्रक्रिया करण्याची क्षमता असल्यामुळे रिलायन्सला या आयातीचा मोठा फायदा होत आहे.
हे ही वाचा:
बंगालमधील गोळीबार, बॉम्बस्फोट प्रकरणातील ३ आरोपी देवनारमध्ये पकडले
इराण पुन्हा लष्करी ताकद उभी करतंय; ड्रोन उत्पादनाला वेग
मेलोनीने मेलोडी खाल्ली, राहुल गांधी का पिसाळले?
मोदींच्या ५ देशांच्या दौऱ्याने भारताला आर्थिक बूस्ट
अमेरिकेने व्हेनेझुएलावरील काही निर्बंध शिथिल केल्यानंतर भारतीय कंपन्यांसाठी तेल खरेदीचा मार्ग अधिक खुला झाला. त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजने थेट व्हेनेझुएलाच्या सरकारी तेल कंपनीकडून तेल खरेदी सुरू केली. एप्रिल महिन्यात रिलायन्सने तब्बल २० लाख बॅरल ‘मेरेय’ दर्जाचे जड तेल भारतात आयात केले होते. तुलनेने कमी दरात उपलब्ध होत असल्याने भारतीय रिफायनरी कंपन्यांचा खर्च कमी होत असून नफ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, इराण-इस्रायल तणाव आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील अस्थिरतेमुळे जागतिक तेल बाजारावर दबाव वाढला आहे. जगातील सुमारे २० टक्के तेलवाहतूक होर्मुझ सामुद्रधुनीतून होत असल्यामुळे या मार्गावरील कोणताही तणाव जागतिक बाजारासाठी धोकादायक मानला जातो. त्यामुळे भारताने केवळ मध्यपूर्वेवर अवलंबून न राहता रशिया, व्हेनेझुएला, ब्राझील, नायजेरिया आणि अमेरिकेसारख्या देशांकडूनही तेल आयात वाढवण्याचे धोरण स्वीकारले आहे.
एप्रिल २०२६ मध्ये भारताच्या एकूण कच्च्या तेल आयातीपैकी सुमारे ३५ टक्के हिस्सा रशियन तेलाचा होता. मात्र आता व्हेनेझुएलाकडून वाढणारी आयात भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाची मानली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, स्वस्त दरात मिळणारे व्हेनेझुएलाचे तेल भारतीय कंपन्यांसाठी फायदेशीर ठरत असून आगामी काळात भारत-व्हेनेझुएला ऊर्जा व्यापार आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे.







