देशातील नैऋत्य मान्सूनने जुलैच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम किनारपट्टीवर जोरदार हजेरी लावली असली, तरी पुढील दोन आठवड्यांत पश्चिम आणि दक्षिण भारतात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे. या कालावधीत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असून त्याचा खरीप हंगामातील पेरणीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भारताच्या सुमारे ४ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेत मान्सूनचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. देशातील वार्षिक पर्जन्यमानापैकी सुमारे ७० टक्के पाऊस नैऋत्य मान्सूनमधून मिळतो. तसेच देशातील जवळपास ५० टक्के शेती अजूनही पावसावर अवलंबून आहे आणि जवळपास निम्मी लोकसंख्या शेतीवर उपजीविका करते. त्यामुळे मान्सूनमधील कोणताही खंड थेट कृषी उत्पादन, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि महागाईवर परिणाम करू शकतो.
हे ही वाचा:
मेसीच्या जादुई पासवर अर्जेंटिनाची कमाल!
चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का! जीडीपी वाढ ४.३% वर घसरली
होर्मुझ सामुद्रधुनीत भारतीय खलाशांच्या नियुक्तीवर तात्पुरती बंदी
यंदा जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा ३९.८ टक्के कमी पाऊस झाला. जुलैच्या पहिल्या आठ दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे देशातील एकूण पावसाची तूट १५.२ टक्क्यांपर्यंत कमी झाली होती. मात्र आता मान्सून ‘ब्रेक’ अवस्थेत जाण्याची शक्यता असल्याने ही तूट पुन्हा वाढू शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप पेरणीचाही वेग मंदावला आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ५ जुलैपर्यंत केवळ ३५ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली असून, ती गेल्या वर्षीच्या तुलनेत २१ टक्क्यांनी कमी आहे. तांदूळ, कापूस, सोयाबीन आणि मका या प्रमुख पिकांच्या पेरणीवर त्याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे.
हवामान विभागाच्या मते, पुढील पंधरवड्यात मॅडन-ज्युलियन ऑसिलेशन (MJO) ही हवामान प्रणाली मान्सूनसाठी अनुकूल राहण्याची शक्यता कमी आहे. तसेच या काळात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचीही शक्यता कमी असल्याने पावसाचा जोर मर्यादित राहू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांना कमी पाण्यात येणारी आणि कमी कालावधीत तयार होणारी पिके, जसे की मका, बाजरी आणि मूग, यांची लागवड करण्याचा सल्ला दिला आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, नुकत्याच झालेल्या पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली असली, तरी त्यानंतर लगेचच दीर्घ कोरडा कालावधी राहिल्यास पिकांच्या उगवणीवर आणि वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
मान्सूनची पुढील वाटचाल आता भारतीय शेतीसाठी निर्णायक ठरणार आहे. पुढील काही दिवसांत पावसाने पुन्हा जोर धरल्यास खरीप पेरणीला गती मिळू शकते. मात्र कोरडे वातावरण कायम राहिल्यास कृषी उत्पादन, ग्रामीण उत्पन्न आणि अन्नधान्याच्या किमतींवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.







