अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे नेते व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनसोबतचे युद्ध थांबवले नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी बुधवारी (१३ ऑगस्ट) सांगितले की, जर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन शुक्रवारच्या शिखर परिषदेनंतर युक्रेन युद्ध थांबवण्यास सहमत झाले नाहीत तर त्याचे ‘खूप गंभीर परिणाम’ भोगावे लागतील. शुक्रवारी, १५ ऑगस्ट रोजी दोनही नेते युक्रेन युद्ध थांबवण्यावर चर्चा करण्यासाठी अमेरिकेतील अलास्का येथे भेटणार आहेत. या काळात रशिया आणि युक्रेनमध्ये जमिनीच्या देवाणघेवाणीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे, जी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी फेटाळून लावली आहे.
बुधवारी ट्रम्प यांनी युरोपीय नेत्यांसोबत एक व्हर्च्युअल बैठक घेतली. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या बैठकीबद्दल सांगितले की, ट्रम्प यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले की अलास्कामध्ये होणाऱ्या अमेरिका-रशिया शिखर परिषदेत अमेरिका युद्धबंदीची इच्छा बाळगते. या बैठकीत युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की देखील उपस्थित होते.
“जर पहिली बैठक यशस्वी झाली, तर आपण लवकरच दुसरी बैठक घेऊ,” असे ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले. युक्रेनमधील संघर्ष हा बायडेन प्रशासनाच्या धोरणांचा परिणाम असल्याचेही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे. ते म्हणाले, “हे बायडेन यांचे काम आहे, हे माझे काम नाही. त्यांनी आम्हाला या गोष्टीत अडकवले. जर मी राष्ट्रपती असतो तर हे युद्ध कधीच घडले नसते. मी ते दुरुस्त करण्यासाठी येथे आहे.” त्यांनी जागतिक संघर्षांवरील त्यांच्या कामगिरीवर भर देत असा दावा केला की, “जर आपण अनेक जीव वाचवू शकलो तर ती खूप मोठी गोष्ट असेल. गेल्या सहा महिन्यांत मी पाच युद्धे थांबवली आहेत.”
हे ही वाचा :
स्वातंत्र्य दिन २०२५: निमंत्रण पत्रिकांवर ‘ऑपरेशन सिंदूर’चा लोगो आणि ‘चिनाब पुला’ची झलक!
३५ लाख रुपयांचे बक्षीस असलेले दोन नक्षली ठार!
पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवादरम्यान अंदाधुंद गोळीबार, ३ जणांचा मृत्यू!







