दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवणाऱ्या “व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल”चे आता विदेशातील संबंध समोर येत आहेत. तपासात आता उघड झाले आहे की, तीन कथित परदेशी हँडलर्सपैकी एकाने अल- फलाह येथून अटक केलेल्या डॉ. मुझम्मिल अहमद गनई याला एन्क्रिप्टेड ऍप्सद्वारे बॉम्ब बनवण्याचे व्हिडीओ पाठवले होते. हे तब्बल ४२ व्हिडीओ होते. डॉ. मुझम्मिल हा तोच व्यक्ती आहे ज्याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली होती आणि तो दिल्ली स्फोटातील सूत्रधार उमर नबीचा सहकारी आहे.
आतापर्यंत दिल्ली प्रकरणात तीन परदेशी हँडलर्सची नावे समोर आली आहेत, ज्यांची ओळख हंजुल्लाह, निसार आणि उकासा अशी आहे. तथापि, असे मानले जाते की ही नावे खोटी असू शकतात आणि त्यांची खरी ओळख वेगळी असू शकते. यातील हंजुल्लाहने बॉम्ब बनवण्याच्या तंत्रांचे प्रात्यक्षिक दाखवणारे ४० हून अधिक व्हिडिओ डॉ. मुझम्मिल याला पाठवले होते. डॉ. मुझम्मिलने स्फोटके गोळा केली होती आणि ती त्याच्या घरात लपवली होती.
दिल्ली बॉम्बस्फोटांपूर्वी डॉ. मुझम्मिल याला अटक करण्यात आली होती, ज्यामध्ये ३५० किलो अमोनियम नायट्रेटसह २,५०० किलो स्फोटके सापडली होती. २०२२ मध्ये डॉ. मुझम्मिल शेख गनाई, डॉ. मुझफ्फर राधेर आणि डॉ. उमर उन नबी यांची तुर्कीमध्ये एका सीरियन दहशतवाद्याशी ओळख झाली होती. या भेटीत पाकिस्तानी हँडलर्सनी महत्त्वाची भूमिका बजावली.
हे ही वाचा:
“पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तानात रासायनिक शस्त्रे डागली”
जगातील प्रत्येक पाच आयफोनपैकी एक आयफोन तयार होतो भारतात
“बेंगळुरूच्या रहदारीतून प्रवास करण्यापेक्षा अंतराळात प्रवास करणे सोपे”
भारताचे अन्नधान्य उत्पादनाची गरुडझेप
डॉ. मुझम्मिल, डॉ. आदिल अहमद राथेर, शाहीन सईद आणि मुफ्ती इरफान अहमद यांना एक दिवस आधी ताब्यात घेतल्यानंतर, एनआयए आता त्यांचे परदेशी संबंध उघड करण्याचा प्रयत्न करेल. तपास संस्थांनी असेही उघड केले आहे की डॉ. शाहीन जैश-ए-मोहम्मदच्या महिला शाखेशी संबंधित होती. दहशतवादी डॉक्टरांच्या एका मॉड्यूलने १० नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटात १४ जणांचा मृत्यू झाला आणि काही जण जखमी झाले. मृतांमध्ये आत्मघाती बॉम्बर उमर नबीचाही समावेश होता.







