ऑनलाइन लोन ॲपच्या माध्यमातून नागरिकांना ब्लॅकमेल करून खंडणी उकळणाऱ्या एका टोळीला मुंबई गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. या टोळीने एका तक्रारदाराला १८ विविध लोन ॲपच्या माध्यमातून ७ लाख ५ हजार ५७० रुपये कर्ज घेण्यास भाग पाडून त्यांची मानसिक छळवणूक केली होती. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना ३० मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तक्रारदाराने २५ मे २०२५ रोजी एका ऑनलाइन लोन ॲपद्वारे २२,०५० रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज घेताना आरोपींनी एपीके (APK) फाईलद्वारे तक्रारदाराच्या मोबाईलमधील डेटाचा एक्सेस मिळवला होता. कर्जाची परतफेड करूनही आरोपींनी तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकांना फोन करून त्रास देण्यास सुरुवात केली. व्यावसायिक ठिकाणी फोन करून बदनामी करण्याची धमकी देऊन तक्रारदाराला इतर ॲप्सवरून कर्ज घेण्यास आणि व्याजाची परतफेड करण्यास भाग पाडले.
हे ही वाचा:
गोरेगावात रोटीवर थुंकून ग्राहकांना जेवण वाढले…
केरळमध्ये ईडीच्या छाप्यानंतर मोठा तणाव
‘न्यू नागपूर’ प्रकल्पांसाठी ₹६३७ कोटींच्या मुद्रांक शुल्काला माफी
मीरा रोडमध्ये बोकडांच्या शेडला ‘वराहपूजना’ने उत्तर
कर्जाची पूर्ण परतफेड करूनही आरोपींनी ‘वन टाइम सेटलमेंट’च्या नावाखाली आणखी पैशांची मागणी केली आणि तक्रारदार, त्यांचे मित्र व कार्यालयातील सहकाऱ्यांना फोन व मेसेज करून त्यांची नाहक बदनामी केली.
सततच्या छळामुळे तक्रारदाराची मानसिक स्थिती खालावली होती. या पार्श्वभूमीवर, २५ मे २०२६ रोजी गुन्हे शाखेने सापळा रचून खंडणीची रक्कम घेण्यासाठी आलेल्या सहा आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. या टोळीचा मुख्य सूत्रधार कोण, याचा तपास सुरू आहे. तसेच, या टोळीने अन्य अनेक नागरिकांची अशाच प्रकारे फसवणूक केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्ण कान्त उपाध्याय आणि पोलीस उप-आयुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात कक्ष-२ चे प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, प्रशांत गावडे आणि त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
