मुंबई – परदेशात नोकरीचे आमिष दाखवून भारतीय नागरिकांना सायबर गुलामगिरीच्या जाळ्यात ओढणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी मुंबईसह देशभरात तब्बल ९ ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली आहे. या कारवाईत लखनऊमधून एका मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून, अनेक महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
सीबीआयच्या तपासात समोर आल्यानुसार, हे रॅकेट लोकांना दक्षिण-पूर्व आशियाई देश, विशेषतः म्यानमार आणि कंबोडियामध्ये उच्च पगाराचे आमिष दाखवून पाठवत असे. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर लोकांचे पासपोर्ट जप्त केले जात असत. त्यानंतर त्यांना ‘स्कॅम कंपाउंड’मध्ये डांबून सायबर फसवणूक (Cyber Fraud) करण्यास भाग पाडले जात होते. काम करण्यास नकार दिल्यास त्यांना शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागत होता. सुटकेसाठी त्यांच्या कुटुंबीयांकडून खंडणी उकळल्याचेही प्रकार समोर आले आहेत.
हे ही वाचा:
सेन्सेक्स घसरला, पण निफ्टी २४,३०० च्या वर कायम
पाणीहाटीमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर फेकले कच्चे बॉम्ब
होर्मुझ सामुद्रधुनीवरून अमेरिका-इराण संघर्ष तीव्र
दहशतवादाचा पराभव करण्याचा भारताचा निर्धार
देशभरात ९ ठिकाण मुंबई, दिल्ली, लखनऊ, काशीपुर, तसेच उत्तर प्रदेशातील गोंडा आणि सहारनपूर येथे ही कारवाई करण्यात आली.
छापेमारी दरम्यान अनेक मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
या प्रकरणात झालेल्या आर्थिक व्यवहारांची, विशेषतः क्रिप्टोकरन्सीच्या (Cryptocurrency) माध्यमातून झालेल्या देवाणघेवाणीची कसून चौकशी सुरू आहे.
लखनऊमधून अटक करण्यात आलेल्या व्यक्तीवर या रॅकेटसाठी तरुणांना परदेशात पाठवण्याचे आणि भरती करण्याचे मुख्य आरोप आहेत. सीबीआय आता या टोळीशी संबंधित इतर साथीदारांचा शोध घेत असून, आगामी काळात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.







