मालेगावमध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी तब्बल १० लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. नाजीर अक्रम मोहम्मद अय्यूब अन्सारी आणि मोहम्मद जुबेर मोहम्मद अश्रफ अन्सारी अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही मोठी कारवाई मुंबई- आग्रा महामार्गावरील ए- वन सागर हॉटेलसमोर केली. या प्रकरणात मध्य प्रदेशातील दोन आरोपींना अटक करण्यात आली. या बनावट नोटांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारवाईत १० लाख रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
मालेगाव पोलिसांना बुधवारी गोपनीय माहिती मिळाली की, काही परप्रांतीय व्यक्ती बनावट चलनी नोटा विक्रीसाठी मुंबई- आग्रा महामार्गावर येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी ए- वन सागर हॉटेलजवळ सापळा रचला. या वेळी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. नाजीर अक्रम मोहम्मद अय्यूब अन्सारी (वय ३४, रा. मोमीनपुरा, बुरहानपूर, मध्य प्रदेश), मोहम्मद जुबेर मोहम्मद अश्रफ अन्सारी (वय ३३, रा. हरीरपुरा, बुरहानपूर, मध्य प्रदेश) अशी संशयितांची नावे आहेत.
हे ही वाचा:
अमेरिकेने भारतासोबत १० वर्षांच्या संरक्षण आराखड्यावर केली स्वाक्षरी
शाही पदवी काढून घेत प्रिन्स अँड्र्यू यांची राजघराण्यातून हकालपट्टी
“तुमचे अंतर्गत संघर्ष अफगाणिस्तानवर लादू नका!”
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींकडून आदरांजली
कारवाई दरम्यान पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून ५०० रुपयांच्या दोन हजार बनावट नोटा (एकूण किंमत १० लाख रुपये), दोन मोबाईल हँडसेट आणि एक सॅक असा मिळून १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी मोहम्मद जुबेर अन्सारी हा मौलाना असून मदरशांमध्ये शिक्षण देण्याचे कार्य करतो, अशी माहिती समोर येत आहे. बनावट नोटांच्या मागे कोणते नेटवर्क कार्यरत आहे आणि त्या कुठून आणल्या व कुठे विक्रीसाठी नेल्या जात होत्या, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या प्रकरणी भारतीय चलन कायदा तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १७९, १८० आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.







