पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा (LeT) वरिष्ठ कमांडर आणि हाफिज सईदचा निकटवर्तीय इस्माईल अहमद याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अहवालांनुसार, त्याचा मृतदेह शुक्रवारी (८ मे) सापडला. या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये सक्रिय दहशतवादी संघटनांमधील अंतर्गत संघर्षाकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे. तसेच पाकिस्तान अमेरिकााशी संबंध सुधारत असताना आणि वर्ल्ड बँक तसेच आयएमएफकडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी FATF च्या अटी पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असल्याने अशा हत्या घडवल्या जात असल्याचे दावेही केले जात आहेत.
माहितीनुसार, इस्माईल अहमद हा खैबर पख्तूनख्वा भागातील लष्कर-ए-तैयबाच्या कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होता. तो संघटनेच्या कोर कमिटीचा सदस्य असल्याचे सांगितले जाते आणि जम्मू- काश्मीरसह भारताविरोधातील अनेक दहशतवादी कटांमध्ये त्याचा सहभाग होता. हे कारस्थान तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI च्या सूचनेनुसार करत असल्याचा आरोप आहे. मात्र, त्याच्या मृत्यूमागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. प्राथमिक माहितीनुसार हा मृत्यू रहस्यमय असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानकडून यासंदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
गेल्या काही महिन्यांत लष्कर-ए-तैयबाच्या अनेक वरिष्ठ कमांडरांच्या हत्या किंवा संशयास्पद मृत्यूच्या घटना समोर आल्या आहेत. मागील महिन्यात संघटनेचा आणखी एक वरिष्ठ कमांडर शेख युसुफ आफ्रिदी याची खैबर पख्तूनख्वामध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. अहवालांनुसार, आफ्रिदीवर अगदी जवळून हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोरांनी त्याच्यावर अनेक गोळ्या झाडल्या, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर हल्लेखोर डोंगराळ भागाकडे पळून गेले होते. हा देखील लक्ष्यित हल्ला असल्याचे मानले जात असून, यासाठी पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी सैन्याकडे संशयाने पाहिले जात होते.
हे ही वाचा:
सत्तास्थापनेसाठी DMK-AIADMK ला संधी दिल्यास TVK आमदारांचे राजीनामे?
पाकिस्तानी सैन्याकडून पाच बलुच नागरिकांचे अपहरण
छत्तीसगडमधील नक्षलमुक्त पोलमपल्लीमध्ये कायमस्वरूपी रेशन दुकान सुरू!
इराणकडून होर्मुझमध्ये चीनच्या जहाजावर हल्ला
याशिवाय मार्च महिन्यात लष्कर-ए-तैयबाचा कमांडर बिलाल आरिफ सलाफी याचीही पाकिस्तानातील मुरिदके येथील मरकज तैयबा परिसरात हत्या करण्यात आली होती. ईदच्या नमाजानंतर अज्ञात हल्लेखोरांनी प्रथम त्याच्यावर गोळीबार केला आणि नंतर चाकूने हल्ला केल्याचे सांगितले गेले. भारताने पाकिस्तानवर हाफिज सईद आणि त्याच्याशी संबंधित दहशतवादी नेटवर्कविरोधात कारवाई न केल्याचा आरोप सातत्याने केला आहे. मात्र आता जागतिक दबावामुळे पाकिस्तानलाच स्वतःच्या भूमीवरील दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी लागत असल्याचे बोलले जात आहे. तरीही पाकिस्तानी सैन्य या हत्या अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करत असल्याचा दावा केला जात असून, भविष्यात याच हत्या पाकिस्तानसाठी नवे संकट ठरू शकतात.







