माजी पंतप्रधान इम्रान खान यांची न्यायालयाच्या आदेशाने सुटका झाली असली तरी, त्यांना पुन्हा अटक होण्याची भीती वाटत आहे. ‘पोलिसांनी माझ्या लाहोरमधील घराला वेढा घातला आहे आणि त्यांना लवकरच अटक केली जाईल,’ अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. पंजाब सरकारने त्यांना लष्करावरील हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या समर्थकांना त्यांच्या ताब्यात देण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर खान यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.निमलष्करी दलाने ९ मे रोजी भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी इम्रान यांना अटक केली. या आरोपांचा इम्रान यांनी इन्कार केला आहे. मात्र त्यांच्या अटकेच्या वृत्तानंतर समर्थकांनी देशभरातील विविध ठिकाणी जाळपोळ, लुटालूट केली.
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी खान यांची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले. परंतु बुधवारी पंजाब सरकारने त्याच्या अटकेनंतर दंगलीसाठी हव्या असलेल्या समर्थकांना आश्रय दिल्याचा आरोप केला. तसेच, त्यांना ताब्यात घेण्यासाठी किंवा पोलिस कारवाईला सामोरे जाण्यासाठी २४ तासांची मुदत दिली होती. इस्लामाबादच्या उच्च न्यायालयाने इम्रान यांना ३१ मेपर्यंत जामीन मंजूर केला आहे. मात्र तरीही इम्रान यांनी अटक होण्याची शक्यता व्यक्त करत ‘माझ्या पुढच्या अटकेपूर्वी कदाचित माझे शेवटचे ट्वीट’ असे भाकीत करत व्हिडीओद्वारे निवेदन केले आहे.
हे ही वाचा:
सिद्धरामय्या यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा; शिवकुमार उपमुख्यमंत्री
हत्या करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना ३३ वर्षांनंतर अटक
पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत ‘बेस्ट’ मदतीला धावणार
देशमुखांना अडचणीत आणण्यासाठी परमबीर सिंह यांना आणले कोणी?
त्यांत त्यांनी त्यांचे विरोधक त्यांच्यात आणि लष्करात पुन्हा भांडण सुरू करण्यासाठी बाहेर आले असून त्यामुळे मोठे पडसाद उमटतील, असे म्हटले आहे. त्यांनी हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील न्यायिक आयोगाची मागणी केली.बुधवारी पंजाब प्रांतीय सरकारचे प्रवक्ते अमीर मीर यांनी इम्रान यांच्या घरी ४०हून अधिक संशयित लपले असल्याचा दावा केला. हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत तीन हजार ४०० संशयितांना अटक करण्यात आली असून आणखी छापे टाकण्याचे नियोजन आहे, असे मीर यांनी सांगितले. मात्र त्यांनी इम्रान यांच्या अटकेच्या दाव्याचे खंडन केले. खान यांचे सहकारी इफ्तिखार दुर्रानी यांनी हा दावा फेटाळून लावला.
लष्करप्रमुखांकडून दंगलखोरांना न्याय मिळवून देण्याचे वचन
हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘९ मे रोजी संपूर्ण देशाला मान खाली घालण्यास जबाबदार असलेल्या दंगलखोरांना योग्य ती शिक्षा केली जाईल. अशा प्रकारे कट रचणे हे अतिशय दु:खद असून यापुढे कोणालाही असे कृत्य करू दिले जाणार नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले. कोणालाही आमचे शहीद आणि त्यांच्या स्मारकांचा अनादर करू दिला जाणार नाही. ते प्रेरणा आणि अभिमानाचे स्रोत आहेत,’ असा इशारा त्यांनी दिला आहे.







