झारखंडमध्ये सुरू असलेल्या नक्षलविरोधी कारवाई दरम्यान सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. एका बड्या नक्षल नेत्याला ठार करण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले आहे. छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये मोठा माओवादी नेता नंबला केशव राव उर्फ बसवराजू याला ठार केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी कारवाईत हे मोठे यश मिळाले आहे. नक्षलवादी पप्पू लोहारा याचा खात्मा करण्यात आला आहे. त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. यासोबतच आणखी एका नक्षलवाद्याला ठार करण्यात आले आहे.
झारखंड जनमुक्ती परिषदेचा प्रमुख आणि १० लाख रुपयांचे बक्षीस असलेला वॉन्टेड नक्षलवादी पप्पू लोहारा हा शनिवार, २४ मे रोजी सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. या गटाचा आणखी एक वरिष्ठ नेता प्रभात गंजू, ज्याच्यावर पाच लाख रुपयांचे बक्षीस होते, तोही गोळीबारात ठार झाला. तर, या कारवाईदरम्यान बंदी घातलेल्या संघटनेचा सदस्य असल्याचा संशय असलेल्या तिसऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एक रायफल जप्त करण्यात आली आहे. तसेच झारखंडच्या लातेहार भागात अजूनही कोम्बिंग ऑपरेशन सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले, असे पलामूचे पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) वाय एस रमेश यांनी सांगितले. पोलिसांनी त्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. त्यांनी सांगितले की, लोहारा आणि त्याचे साथीदार जंगलात असल्याची गुप्त माहिती मिळताच, लातेहारचे पोलिस अधीक्षक कुमार गौरव यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या पथकाने शोध मोहीम सुरू केली. यावेळी माओवाद्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना पाहताच त्यांना लक्ष्य केले आणि गोळीबार केला, त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनीही प्रत्युत्तर दिले. या चकमकीत लोहारा आणि जेजेएमपीचा आणखी एक सदस्य प्रभात गंजू मारला गेला.
हे ही वाचा..
नाभवर नियमित तेल लावल्याने काय फायदा ?
एम्सच्या डॉक्टरसह दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह
केंद्र सरकारने नक्षलवाद संपवण्यासाठी मार्च २०२६ पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे, त्यामुळे सुरक्षा दलांनी अनेक राज्यांमध्ये नक्षलविरोधी कारवाया वाढवल्या आहेत. तसेच काही भागांमध्ये आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले असून २०२६ पर्यंत नक्षलवाद संपवणार असल्याचा वारंवार पुनरुच्चार देखील केला आहे.
