राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. वैभव गेहलोत यांची सोमवार, ३० ऑक्टोबर रोजी ईडीकडून चौकशी करण्यात आली. वैभव गेहलोत हे मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. वैभव यांच्यावर ‘फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्ट’च्या (फेमा) उल्लंघनाचा आरोप आहे.
राजस्थानमधील पेपर लीक प्रकरणी नुकतेच ईडीने प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांच्या घरावर छापा टाकला होता. तर, यासोबतच ईडीने फेमा प्रकरणी वैभव गेहलोत यांना समन्स बजावले होते. वैभव गहलोत यांच्या कंपनीवर शेल कंपन्यांच्या माध्यमातून करोडो रुपये मॉरिशसला पाठवल्याचा आरोप आहे. याबाबत भाजप खासदार किरोडीलाल मीणा यांनी ईडीमध्ये तक्रार दाखल केली होती.
वैभव गेहलोत यांनी मॉरिशसच्या एका कंपनीच्या माध्यमातून हॉटेलमध्ये गुंतवणूक केल्याचा आरोप किरोडीलाल मीणा यांनी केला होता. तसेच, याप्रकरणी वैभव गेहलोत यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर काँग्रेसने भाजपावर टीका केली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्व भाजपा करत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
हे ही वाचा:
ललित पाटील प्रकरणात ससूनमधील कैदी रुग्ण समितीच्या अध्यक्षांचा राजीनामा
आंध्र प्रदेशात दोन रेल्वेगाड्या धडकल्या, १४ ठार
केरळमधील बॉम्बस्फोटमालिकेचा २० सदस्य करणार तपास
आमदार अपात्रतेप्रकरणी दोन महिन्यांत निकाल द्या!
दरम्यान, दिल्लीत ईडीसमोर हजेरीनंतर वैभव गेहलोत म्हणाले की, “फेमा प्रकरणात ईडीने प्रश्न विचारले आणि मी सांगितले की, माझा आणि माझ्या कुटुंबाचा फेमाशी काहीही संबंध नाही. आम्ही कोणताही परदेशी व्यवहार केला नसल्याचे वैभव यांनी सांगितले.”