अंधेरीतील मरोळ परिसरात टेम्पो पार्क करताना झालेल्या दुर्दैवी अपघातात ४६ वर्षीय व्यक्तीचा स्वतःच्या मुलाकडूनच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुलाविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
रामदीन सुंदर यादव (४६) असे मृत व्यक्तीचे नाव असून, शुभम रामदीन यादव असे आरोपी मुलाचे नाव आहे. बुधवारी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास मरोल येथील मकवाना रोडवरील वसंत ओअॅसिस परिसरातील बीएमसीच्या पे अँड पार्कच्या बेसमेंटमध्ये हा अपघात घडला.
हे ही वाचा:
ट्रम्पनी मोदींचे कौतुक केल्याने संजय राऊतांचा थयथयाट
नांदेडमधून ४३ लाखांचा शस्त्रसाठा जप्त
चंद्रनाथ रथना मारण्यासाठी ओएलएक्सवरच्या गाडीचा नंबर हल्लेखोरांनी केला कॉपी
जायंट किलर सुवेंदू आता पश्चिम बंगालचे ‘अधिकारी’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्यातील हवालदार हेमकांत किनी हे सहकाऱ्यांसह गस्त घालत असताना वेस्ट कंट्रोल रूममधून अपघाताची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले असता एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत पडलेली आढळली. त्याच्या शेजारी एक तरुण बसलेला होता.
चौकशीदरम्यान त्या तरुणाने स्वतःची ओळख शुभम यादव अशी करून दिली आणि जखमी व्यक्ती आपले वडील रामदीन यादव असल्याचे सांगितले. पोलिसांनी तत्काळ रामदीन यांना कूपर रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शुभमने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो आणि त्याचे वडील सहार कार्गो येथून मालवाहतूक करून आल्यानंतर टेम्पो पार्क करण्यासाठी बेसमेंटमध्ये गेले होते. यावेळी रामदीन यादव हे टेम्पो पार्क करण्यासाठी मुलाला पुढे-मागे करण्याच्या सूचना देत होते.
दरम्यान, वाहन पार्क करताना शुभमचा पाय चुकून अॅक्सिलरेटरवर गेल्याने टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि वाहनाने रामदीन यादव यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर टेम्पो बंद पडला. शुभमने वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
या अपघातात रामदीन यादव यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर शुभमने मदतीसाठी आरडाओरड केली, मात्र पोलिस येईपर्यंत कोणीही मदतीला आले नाही, असेही समोर आले आहे.
या प्रकरणी हवालदार हेमकांत किनी यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी शुभम यादवविरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर शुभम प्रचंड मानसिक धक्क्यात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.







