दक्षिण कोलकाता येथील एका लॉ कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची गंभीर घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुरुवारी (२६ जून) तीन आरोपींना अटक केली आहे, ज्यात दोन विद्यार्थी आणि एक माजी विद्यार्थी आहे. आरोपींमध्ये प्रमुख नाव मोनोजित मिश्रा आहे, जो एकेकाळी कॉलेजमध्ये तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) युवा शाखेचे अध्यक्ष होता आणि सध्या अलीपूर कोर्टात वकील म्हणून काम करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी संध्याकाळी ७:३० ते ८:५० च्या दरम्यान कॉलेजच्या आवारात असलेल्या गार्ड रूममध्ये ही घटना घडली. पीडितेने आरोप केला आहे की, मोनोजित मिश्रा तिला जबरदस्तीने गार्ड रूममध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला, तर इतर दोन आरोपी बाहेर गार्ड म्हणून उभे राहिले आणि त्याला गुन्ह्यात मदत केली. पोलिसांनी कॉलेज गार्ड रूम सील केली आहे आणि तिन्ही आरोपींचे मोबाईल फोन जप्त केले आहेत.
दरम्यान, या घटनेवर भाजपाने संताप व्यक्त करत सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपने मुख्य आरोपी मोनोजित मिश्रा याचे अनेक तृणमूल नेत्यांसोबतचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये खासदार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांचा समावेश आहे.
दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) या घटनेची दखल घेतली आणि कोलकाता पोलिस आयुक्तांना पत्र लिहून तीव्र चिंता व्यक्त केली आणि तात्काळ चौकशीचे निर्देश दिले. पॅनेलने तीन दिवसांत सविस्तर कारवाई अहवाल मागितला आहे.
