उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील राम मंदिरावर हल्ला करण्याचा कट रचल्याप्रकरणी आणि दहशतवादी संबंधांच्या प्रकरणात गुजरात एटीएस आणि फरिदाबाद एसटीएफने संयुक्त कारवाईत फरिदाबाद येथून १९ वर्षीय अब्दुल रहमान याला अटक केली होती. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या अब्दुल रहमानने चौकशीदरम्यान या प्रकरणाबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. २ मार्च रोजी हरियाणाच्या फरिदाबाद येथे छापा टाकून १९ वर्षीय अब्दुल रहमानला अटक करण्यात आली होती. तो अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टीनंटशी (AQIS) संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.
चौकशीदरम्यान, रहमानने सांगितले की, अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंटशी संबंधित मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू सुफियानकडून सूचना मिळाल्यानंतर तो ५ एप्रिल रोजी अयोध्येत हल्ला करण्याची योजना आखत होता. रहमान हा एका बंदी घातलेल्या ऍपद्वारे अबू सुफियानशी संपर्क साधत होता. यासंबंधीचे वृत्त ‘इंडिया टीव्ही न्यूज’ने दिले आहे.
माहितीनुसार, अबू सुफियानने त्याच्या हँडलरद्वारे फरीदाबादमधील एका खड्ड्यात दोन हँडग्रेनेड आणि डेटोनेटर्स लपवले होते, जे अब्दुल रहमानने मिळवून आपल्या ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान रहमानने उघड केले की त्याने नंतर पाली गावाजवळील एका पडक्या घरात ग्रेनेड लपवले होते. त्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ग्रेनेड जप्त केले आणि ताब्यात घेतले आहे. रहमानला ४ एप्रिल रोजी दोन्ही हातबॉम्ब घेऊन अयोध्येला येण्याच्या सूचना मिळाल्या होत्या. पण, योजना राबवण्यापूर्वीच, त्याला २ मार्च रोजी त्याला अटक करण्यात आली.
हेही वाचा..
मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये एफडीआय इक्विटी इनफ्लो १६५ अब्ज डॉलरवर
… म्हणून हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली
विपश्यनेसाठी जाताना केजारीवालांच्या ताफ्यात दोन-दोन कोटींच्या गाड्या!
अब्दुल रहमानने हे ही कबूल केले की, त्याला देशी बनावटीचे पिस्तूल कसे बनवायचे हे माहित आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोबाईल फोन जप्त केले असून त्यात धार्मिक स्थळांच्या रेकीचे व्हिडिओ आणि विशिष्ट धर्माला भडकावणारे साहित्य होते. तपासात असे दिसून आले की, फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील धार्मिक सामग्री पाहून रहमान कट्टरपंथी बनला आणि अखेर दहशतवादी नेटवर्कमध्ये सामील झाला. त्याच्याकडे सापडलेल्या अयोध्या कॅन्ट ते दिल्ली जंक्शन या रेल्वेच्या १ मार्चच्या तिकिटावरून त्याच्या प्रवासाची आणि हालचालींची पुष्टी झाली. हे खुलासे झाल्यानंतर तपास यंत्रणांकडून अधिक तपास केला जात आहे.







