राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्याकडील पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडल्याची माहिती समोर आली आहे. हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना आता हसन मुश्रीफ यांनी घेतलेल्या निर्णयामुळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
वाशिमचे पालकमंत्री म्हणून हसन मुश्रीफ यांची नेमणूक करण्यात आली होती, मात्र आता त्यांनी वाशिमचे पालकमंत्री पद सोडल्याची बातमी समोर आली आहे. सहावेळा आमदार राहिलेले हसन मुश्रीफ यांच्याकडे तीन आमदार असलेल्या वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं होतं. कोल्हापूरचे आमदार आणि मंत्री असलेले मुश्रीफ यांना ज्या जिल्ह्याच पालकमंत्री पद देण्यात आलं तो वाशिम जिल्हा बराच दूरचा आहे. कोल्हापूर ते वाशिम हा प्रवास जवळपास ६०० किलोमीटरचा आहे. त्यामुळे वाशिमचं पालकमंत्री पद मिळाल्यानंतर त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी मुश्रीफ यांचे प्रवासात जवळपास दोन दिवस जात होते. त्यामुळे कोल्हापूर या त्यांच्या मतदारसंघात त्यांना लक्ष देता येत नव्हतं. या कारणास्तव त्यांनी वाशिमचं पालकमंत्री पद सोडल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा :
२ एप्रिलचा अल्टिमेटम; भारतासह अनेक देशांवर परस्पर शुल्क लादण्याचा इशारा
प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ
लष्करी मदत थांबवताच ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास झेलेन्स्की तयार
बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी समाजवादी पक्षाच्या नेत्याला अटक!
वैद्यकीय शिक्षणमंत्री असलेल्या हसन मुश्रीफ यांनी वाशिमचे पालकमंत्री पद सोडण्याची इच्छा दर्शवली असून त्यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्याशी चर्चासुद्धा केली असल्याचे समजते. दरम्यान, राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री असलेले दत्ता मामा भरणे यांच्याकडे कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नाही, त्यामुळे वाशिमचे पालकमंत्री पदाची धुरा दत्ता मामा भरणे यांच्याकडे सोपवण्यात येऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.