कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका प्रकरणात काहीसा दिलासा मिळाला आहे. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. नाशिक सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. माणिकराव कोकाटे यांच्यावर ३० वर्षांपूर्वी सदनिका लाटल्याचा आरोप होता. त्याच संदर्भातील प्रकरण न्यायलयात सुरू होते. न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा आणि दंड ठोठावला होता. या संदर्भात कोकाटे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळाला असून खालच्या कोर्टाने दिलेल्या दोन वर्षाच्या शिक्षेला जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शिक्षेला स्थगिती दिल्याने कोकाटे यांची आमदारकी सध्या धोक्यात नसणार आहे. कमी उत्पन्न दाखवून सरकारच्या १० टक्के कोट्यातून घर घेतल्याने कनिष्ठ न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला सुनील कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा आणि ५०,००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती.
हे ही वाचा..
विपश्यनेसाठी जाताना केजारीवालांच्या ताफ्यात दोन-दोन कोटींच्या गाड्या!
२ एप्रिलचा अल्टिमेटम; भारतासह अनेक देशांवर परस्पर शुल्क लादण्याचा इशारा
प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ
१९९५- १९९७ च्या दरम्यानचे हे प्रकरण असून माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात त्या सदनिका घेतल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी त्यांचे उत्पन्न कमी असल्याचे दाखवून दुसरे घर नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर शासनाकडून माणिकराव कोकाटे यांना सदनिका मिळाल्या होत्या. मात्र अधिकाऱ्यांनी यासंदर्भात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात एकूण चार जणांचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने उर्वरित दोघांना कोणतेही शिक्षा सुनावलेली नसल्याची माहिती समोर आली आहे.