आम आदमी पक्षाचे (आप) पंजाबमधील नेते अनोख मित्तल आणि त्यांची पत्नी मानवी उर्फ लिप्सी यांच्यावर दरोडेखोरांनी हल्ला केल्याचे वृत्त होते. शिवाय दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात पत्नी लिप्सीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, या खोट्याचा आता पर्दाफार्श झाला असून पत्नीची हत्या करण्यासाठी कंत्राटी हल्लेखोरांना पैसे दिल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी आता लुधियाना पोलिसांनी अनोख मित्तल आणि त्याच्या साथीदारासह सहा जणांना अटक केली आहे, तर एक जण फरार आहे.
आप नेते अनोख मित्तल यांनी त्यांच्या पत्नीची दरोड्यादरम्यान हत्या झाल्याचा दावा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, लुधियाना पोलिसांनी सोमवारी त्यांना आणि त्यांच्या मैत्रिणीला अटक केली आहे. ही हत्या करण्यासाठी कंत्राटी हल्लेखोर नियुक्त केल्याचा आरोप करण्यात येत आहे. लुधियाना पोलिसांनी केलेल्या तपासात ही बाब उघड झाली आहे.
१४ फेब्रुवारी रोजी रात्री अनोख मित्तल आणि त्यांची पत्नी लिप्सी यांच्यावर काही अज्ञातांनी हल्ला केला. यावेळी पत्नीवर तलवारीने वार केले, तर अनोख यांना गुंगीचे औषध देण्यात आले. यावेळी त्यांच्याकडील दागिने आणि गाडी घेऊन हे हल्लेखोर पसार झाले. पुढे या दोघांना रुग्णालयात दाखल केलं असता लिप्सी यांचा मृत्यू झाला, तर अनोखवर उपचार करण्यात आले. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाल्याचा खोटा जबाब अनोख यांनी पोलिसांसमोर दिला.
लुधियानाचे पोलिस आयुक्त कुलदीप सिंग चहल यांनी सांगितले की, अनोख आणि त्याच्या प्रेयसीने त्याची पत्नी लिप्सी, जिला मानवी म्हणूनही ओळखले जाते, हिची हत्या करण्यासाठी कंत्राटी हल्लेखोर नेमले होते असे पोलिसांना आढळले. हत्येसाठी कंत्राटी किलर्सना अडीच लाख रुपये देण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यांनी आधीच ५०,००० रुपये आगाऊ दिले होते तर, उर्वरित २ लाख रुपये गुन्हा झाल्यानंतर देण्याचे ठरले होते, अशी माहिती चहल यांनी दिली आहे.
पोलिस तपासात पुढे असे दिसून आले की, अनोख याने त्याच्या पत्नीला मारण्याचा हा पहिलाच प्रयत्न नव्हता. मित्तलने याआधी दोन वेळा तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यामागील हेतू त्याचे विवाहबाह्य संबंध होते, जे त्याच्या पत्नीच्या लक्षात आले होते. हे संबंध उघडकीस येण्याच्या भीतीनेचं त्याने तिच्या हत्येचा कट रचला होता. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केले असून आणखी पुरावे गोळा केले जात आहेत. तसेच अनोख याची जोडीदार गुन्ह्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित नसली तरी, ती नियोजन आणि कटात सक्रियपणे सहभागी असल्याचे मानले जाते आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत अनोख मित्तल याच्यासह अमृतपाल सिंग उर्फ बल्ली (वय २६ वर्षे), गुरदीप सिंग (वय २५ वर्षे), सोनू (वय २४ वर्षे) आणि सागरदीप उर्फ तेजी (वय ३० वर्षे) या चौघांना अटक केली आहे. त्याशिवाय गुरप्रीत सिंग उर्फ गोपी हा आरोपी अद्याप फरार आहे.
हे ही वाचा :
३० वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी जोडप्यासह त्यांच्या मुलाला अटक
नोकरीची संधी देत टेस्लाकडून भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना
कॅनडातील टोरंटो विमानतळावर विमान उलटले; १८ प्रवासी जखमी
ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती
रविवारी, अनोख मित्तल याने पोलिसांना सांगितले होते की, तो आणि त्याची पत्नी १५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एका रेस्टॉरंटमधून जेवण करून घरी परतत असताना त्याने डेहलोन परिसरातील रुरका रोडजवळ आराम करण्यासाठी गाडी थांबवली तेव्हा दुसऱ्या वाहनातील पाच- सहा जणांनी त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. त्याला बेशुद्ध करण्यात आले. पुढे २० मिनिटांनी जेव्हा शुद्ध आली तेव्हा त्याने त्याच्या पत्नीला रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडलेले पाहिले. रुग्णालयात नेल्यानंतर तिचा मृत्यू झाला असे त्याने सांगितले. हल्लेखोरांनी त्यांची कार आणि त्यांच्या पत्नीचे दागिने चोरल्याचेही त्यांनी सांगितले.