पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांच्या नावाला मान्यता देण्यात आली आहे. कायदा मंत्रालयाने पुढील मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्तीसाठी अधिसूचना देखील जारी केली आहे. कायदा आणि न्याय मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना १९ फेब्रुवारी २०२५ पासून निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भारताच्या निवडणूक आयोगात मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करताना आनंद होत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवाशर्ती आणि पदाचा कालावधी) कायदा, २०२३ च्या कलम ४ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून ही नियुक्ती करण्यात आली आहे.
देशाचे २६ वे निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त झालेले ज्ञानेश कुमार १९८८ च्या बॅचचे केरळ कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आज १८ फेब्रुवारी रोजी निवृत्त होत आहेत, त्यांच्या निवृत्तीनंतर कुमार पदभार स्वीकारतील. ज्ञानेश कुमार २६ जानेवारी २०२९ पर्यंत पदावर राहतील. कुमार या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुका तसेच २०२६ मध्ये होणाऱ्या केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांचे निरीक्षण करतील. निवडणूक आयोगात येण्यापूर्वी, त्यांनी सरकारमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. संरक्षण मंत्रालय आणि गृह मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून काम केले आहे, तिथे त्यांनी अतिरिक्त सचिव म्हणूनही काम केले आहे.
राजीव कुमार यांच्या जागी ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्तपदाची सूत्रे सांभाळणार आहेत. राजीव कुमार १ सप्टेंबर २०२० रोजी निवडणूक आयुक्त म्हणून निवडणूक आयोगात रुजू झाले होते आणि १५ मे २०२२ रोजी त्यांनी भारताचे २५ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. राजीव कुमार यांनी त्यांच्या निरोप भाषणात लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी १.५ कोटी मतदान अधिकाऱ्यांचे आभार मानले. त्यांच्या कार्यकाळात, समावेशक निवडणुकीसाठी पीव्हीटीजी आणि तृतीयपंथी सारख्या उपेक्षित घटकांची नोंदणी करण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्यांनी युवा आणि शहरी मतदारांना प्रेरणा घेऊन निवडणूक प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. निवडणूक प्रक्रियेत तरुणांचा वाढता कल आणि शहरी उदासीनता दूर करण्यासाठी त्यांनी उच्चभ्रू समाजांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यासारखे नाविन्यपूर्ण उपाय अवलंबले आहेत असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
हे ही वाचा :
युवा लेखक म्हणून विवान कारुळकरला वर्ल्ड रेकॉर्ड्स विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट
केरळच्या पलक्कडमध्ये झळकले हमास, हिजबुल्ला दहशतवाद्यांचे पोस्टर्स
‘केजरीवाल, सिसोदिया आणि आतिशी यांनी उर्जा वाचवून ठेवावी, दररोज न्यायालयात जावे लागणार’
घरगुती वादातून पित्याने ३ महिन्याच्या मुलीला जमिनीवर आपटले
दुसऱ्या अधिसूचनेत, कायदा आणि न्याय मंत्रालयाने म्हटले आहे की, डॉ. विवेक जोशी यांची भारताच्या निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विवेक जोशी हे १९८९ च्या बॅचचे हरियाणा केडरचे आयएएस अधिकारी आहेत. निवड समितीच्या बैठकीनंतर काही तासांतच ही नियुक्ती करण्यात आली.