छत्तीसगडमधील दहशतवादविरोधी पथकाने (ATS) रायपूर आणि भिलाई येथून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही दोन्ही अल्पवयीन मुले दहशतवादी संघटना इसिस (ISIS) हँडलर्सच्या थेट संपर्कात होते. या मुलांना ऑनलाइन माध्यमातून कट्टरपंथी सामग्रीद्वारे भडकावले जात असल्याचे उघडकीस आले आहे. १० वी आणि ११ वीत शिकणारे हे दोन्ही उच्च माध्यमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत.
माहितीनुसार, दोन्ही अल्पवयीन मुलांनी इसिस हँडलर्सना “ऑपरेशन सिंदूर” संबंधित नकाशाची एक क्लिपिंग पाठवली होती. एटीएसने त्यांच्यावर अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज (प्रिव्हेन्शन) ॲक्ट (UAPA), १९६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सखोल चौकशी सुरू आहे. अल्पवयीन मुलांचे कुटुंब तपास यंत्रणांना सहकार्य करत असल्याची माहिती आहे.
एटीएस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आक्षेपार्ह सोशल मीडियावरील तक्रारीनंतर हे प्रकरण समोर आले. अधिकाऱ्यांना इसिसशी जोडलेला एक गोपनीय इंस्टाग्राम ग्रुप आढळला. यावर पाकिस्तानी हँडलर्स कट्टरपंथी सामग्री अपलोड करत होते. हे दोन भारतीय अल्पवयीन मुले या ग्रुपमध्ये सक्रिय सहभागी होते. गेल्या दीड वर्षांपासून एटीएसने या अल्पवयीन मुलांवर लक्ष ठेवले होते. डिजिटल देखरेख टाळण्यासाठी पाकिस्तानी हँडलर्स वारंवार ग्रुप्स बदलत होते. ग्रुपमध्ये जास्त ट्रॅफिक आढळले किंवा यंत्रणांची पाळत असल्याचा संशय आला, तर तो ग्रुप अचानक डिलीट केला जात असे. या अल्पवयीन मुलांना “डिजिटल मॉड्यूल”द्वारे प्रशिक्षण दिले जात होते.
हे ही वाचा:
“राष्ट्राच्या हितासाठी एकमेकांना सहकार्य करा!” शशी थरूर यांनी कोणाला दिला सल्ला?
काँग्रेसचा यू टर्न! ‘मारहाण’ करणाऱ्या पक्षांसोबत जुळवून घेण्याचे संकेत
मुर्शिदाबादला बाबरी मशीद बांधण्याचा तृणमूल आमदाराचा दावा
कोचमध्ये शिजवले नूडल्स, रेल्वे प्रशासनाच्या संतापाला उकळी
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या काळात, पाकिस्तानी हँडलर्सनी अल्पवयीन मुलांशी संपर्क वाढवला. हँडलर्सनी मुलांना हवाई हल्ल्यांच्या नकाशांच्या क्लिपिंग्स भारतीय वृत्तवाहिन्यांकडून मिळवून पाकिस्तानला पाठवण्याची सूचना केल्या होत्या. दशतवाद्यांनी अल्पवयीन मुलांना कट्टरपंथी बनवण्याची प्रक्रिया काळजीपूर्वक आखली होती. सुरुवातीला मुलांना सौम्य धार्मिक सामग्री दाखवून लक्ष्य केले गेले. कालांतराने, त्यांना हिंसक व्हिडिओ, कट्टरपंथी संदेश आणि जिहादी ऑडिओ क्लिप्स दाखवल्या गेल्या. सोशल मीडियाव्यतिरिक्त, गेमिंग प्लॅटफॉर्मचाही भरतीसाठी वापर करण्यात आला.







