राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा धमकीचा ईमेल पाठविणाऱ्या दोन जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोघेही एकमेकांचे मित्र असून त्यातील एक जण दुसऱ्याला मैत्रिणीच्या मृत्यू बाबत सतत मानसिक त्रास देत होता म्हणून मित्राला अडकविण्यासाठी त्याच्या मोबाईलमधून उपमुख्यमंत्री शिंदे यांना मारण्याची धमकीचे ईमेल केल्याचे उघडकीस आले आहे.
मंगेश वायळ आणि अभय शिंगणे असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथे राहणारे आहेत. मंगेश आणि अभय दोघे मित्र असून अभयच्या मैत्रिणीचा काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. या मृत्यूवरून मंगेश हा अभयला सतत त्रास देत होता.
अखेर मंगेशला मोठ्या प्रकरणात अडकविण्यासाठी अभयने योजना आखली. त्याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाला त्यांच्यासह बॉम्बने उडविण्याची धमकीचा ईमेल तयार करून तो मेल मंगेश याच्या मोबाईल फोनमधील ईमेल वरून मुंबईतील विविध पोलीस ठाणे आणि मंत्रालयाच्या मेल आयडी वर पाठवून दिला होता.
हे ही वाचा:
संभल हिंसाचार : १२ पैकी ६ प्रकरणात आरोपपत्र दाखल
मंत्री कुलदीप धालीवाल २० महिन्यांपासून बिन खात्याचे मंत्री !
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी
या धमकीच्या ईमेल प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखा आणि सायबर सेलने ईमेलचा आयपी अड्रेस शोधून बुलढाणा येथून मंगेश वायाळ याला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत अभय शिंगणे याचे नाव समोर येताच त्याला देखील बुलढाणा येथून ताब्यात घेऊन मुंबईत आणले गेले. या दोघांना या गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली असता अभयने मंगेशला अडकविण्यासाठी त्याच्या मोबाईलवरून मेल पाठविल्याचे कबूल केले. मंगेश हा अभयच्या घरी आला होता, व त्याने स्वतःच मोबाईल चार्ज करण्यासाठी अभयच्या घरातील इलेक्टिक बोर्ड मध्ये लावला होता, त्यावेळी अभयने हे कृत्य केले अशी माहिती चौकशीत समोर आली आहे.