उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मॉर्फ (संपादित) केलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी एका युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने पंतप्रधान मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या पायांना स्पर्श करत असल्याचे दाखवणारा बनावट फोटो फेसबुकवर पोस्ट केल्याचा आरोप आहे. या पोस्टमुळे परिसरात तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख सुलेमान हुसेन (किंवा सुलेमान खान) अशी झाली असून तो देहरादून जिल्ह्यातील त्युनी परिसरातील रहिवासी आहे. स्थानिक भाजप पदाधिकारी नीरज शर्मा यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, आरोपीने फेसबुकवर आक्षेपार्ह मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केला आणि तो व्हॉट्सअपवरही प्रसारित केल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर स्थानिक हिंदुत्ववादी संघटना रुद्रसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. आंदोलनानंतर पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा करून आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
देहरादून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १९७ (राष्ट्रीय एकात्मतेविरोधी कृत्यांशी संबंधित तरतूद) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, सोशल मीडियावरील पोस्टची फॉरेन्सिक आणि डिजिटल तपासणीही करण्यात येत आहे.
हे ही वाचा:
राम मंदिर गैरव्यवहार प्रकरणी २० जणांना जिल्हा सोडण्यास बंदी
कीव्हवर रशियाचे क्षेपणास्त्र हल्ले!
“जम्मू-काश्मीर भारताचाच”; ढाक्यात चुकीच्या नकाशावर भारताचा आक्षेप
आईच्या हत्येप्रकरणी नवे वळण; वडिलांच्या मृत्यूबाबतही मुलीवर आरोप
दरम्यान, सोशल मीडियावर असा दावा करण्यात आला की आरोपी पंतप्रधान आवास योजनेच्या घरात राहत होता. मात्र, या दाव्याची पोलिस किंवा प्रशासनाने अधिकृत पुष्टी केलेली नाही. त्यामुळे या दाव्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेनंतर सोशल मीडियावरील आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्टविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला असून, डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.







