प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगवेगळे वळण मिळत असून या प्रकरणात अनेक संशयितांना अटकही झाली आहे. मात्र, अद्याप यातून काहीही निष्कर्ष निघालेला नाही. आसाम पोलिसांनी शुक्रवारी दिवंगत गायक झुबीन गर्ग यांच्या दोन वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यांना (पीएसओ) अटक केली आहे. बराच काळ गर्ग यांचे पीएसओ म्हणून नियुक्त केलेले नंदेश्वर बोरा आणि परेश वैश्य यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यानंतर त्यांना गुवाहाटी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी (सीजेएम) न्यायालयात हजर करण्यात आले. आर्थिक अनियमितता उघडकीस आल्यानंतर या आठवड्याच्या सुरुवातीला दोघांनाही निलंबित करण्यात आले होते.
माहितीनुसार, गेल्या चार ते पाच वर्षांत पीएसओंनी १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे व्यवहार नोंदवले आहेत, ज्यामध्ये बोराच्या खात्यात ७० लाख रुपये आणि वैश्यच्या खात्यात ४० लाख रुपये असल्याचे दिसून आले. झुबीन गर्ग यांनी त्यांच्या दोन्ही बँक खात्यांचा वापर गरीब आणि गरजूंमध्ये पैसे वाटण्यासाठी केला होता. सध्या सुरू असलेल्या चौकशीचा भाग म्हणून या व्यवहारांची चौकशी सुरू आहे. झुबीन गर्ग यांच्या पत्नी गरिमा यांनी आधी सांगितले होते की हा निधी सामाजिक कार्यासाठी होता. बंदी घातलेल्या अतिरेकी गट उल्फाने दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीनंतर आसाम पोलिसांनी नियुक्त केलेले हे पीएसओ जवळजवळ १० वर्षे झुबीन यांच्यासोबत होते.
गायक झुबीन गर्ग यांच्या सिंगापूरमध्ये झालेल्या गूढ मृत्यूला तीन आठवडे उलटले. या प्रकरणात सात जणांना अटक करूनही अद्याप सत्य उजेडात आलेले नाही. बुधवारी, सीआयडीने झुबीन यांचा चुलत भाऊ संदीपन गर्ग, जो आसाम पोलिसात उच्चपदस्थ अधिकारी आहे, याला अटक केली. गर्ग यांच्या मृत्यूच्या दिवशी संदीपन सिंगापूरमधील यॉट पार्टीमध्ये उपस्थित असल्याचे वृत्त आहे. यापूर्वी, चौकशीचा भाग म्हणून व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा, कार्यक्रमाचे आयोजक महंता, बँडमेट शेखर ज्योती गोस्वामी आणि संगीतकार अमृतप्रव महंता या चार जणांना ताब्यात घेण्यात आले होते.
हे ही वाचा :
पंतप्रधान मोदींशी बोलण्यासाठी नेतन्याहू यांनी गाझा शांतता करारावरील सुरक्षा बैठक थांबवली
तालिबानचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर असताना पाकचा काबुलवर हवाई हल्ला
झिशान सिद्दीकींना धमकी देणाराचं रिंकू सिंगकडे मागत होता ५ कोटी!
हनीट्रॅपचा सापळा! कोल्हापूरचे अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांना अडकविण्याचा प्रयत्न!
गर्ग यांच्या मृत्यूच्या सभोवतालच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी विशेष डीजीपी मुन्ना प्रसाद गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली १० सदस्यांची एसआयटी स्थापन केली होती. जर एसआयटीने ठोस प्रकरण सादर केले नाही तर सीबीआय चौकशीचे आश्वासन सर्मा यांनी दिले आहे.







