उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जामाफीच्या मुद्द्यावरून त्यांनी केलेलं विधान चर्चेच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यांच्यावर टीका होताच त्यांनी विधानाबद्दल स्पष्टीकरण देऊन माफी मागितली आहे.
मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर फडणवीस सरकारमध्ये सहकार मंत्रीपदाची जबाबदारी आहे. बाबासाहेब पाटील हे जळगावमध्ये एका जाहीर सभेमध्ये बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जामाफीच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधान केलं. त्यांनी भाषणात शेतकऱ्यांच्या कर्जाचा मुद्दा मांडताना म्हटले की, “लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे. आम्हाला निवडून यायचंय म्हणून आम्ही तुम्हाला निवडणुकीत काहीही आश्वासनं देतो. लोकांनी ठरवलं पाहिजे की आपल्याला काय मागायचं आहे,” असं बाबासाहेब पाटील म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “एखाद्या गावात निवडणुकीत एक नेता गेला आणि लोकांनी सांगितलं की आम्हाला गावात नदीत आणून देईल त्याला आम्ही मतदान करणार. काय मागावं हे तुम्ही ठरवायला हवं. त्यामुळे मागणाऱ्यांनी काय मागायचं ते ठरवायचं. निवडणुकीत आम्हाला निवडून यायचंय म्हणून आम्ही आश्वासनं देतो. सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे,” असं बाबासाहेब पाटील म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर टीका केली जात आहे.
हे ही वाचा :
झुबीन गर्ग मृत्यू: एक कोटींचे व्यवहार उघड होताच पीएसओंना अटक
पंतप्रधान मोदींशी बोलण्यासाठी नेतन्याहू यांनी गाझा शांतता करारावरील सुरक्षा बैठक थांबवली
तालिबानचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर असताना पाकचा काबुलवर हवाई हल्ला
झिशान सिद्दीकींना धमकी देणाराचं रिंकू सिंगकडे मागत होता ५ कोटी!
दरम्यान, विधानावरून वाद निर्माण होताच बाबासाहेब पाटील यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, “जळगावात एका बँकेच्या उद्घाटनासाठी गेलो असताना ग्रामीण भागात आर्थिक व्यवस्था मजबूत करण्यासंदर्भात मुद्दा मांडला. अर्बन बँक किंवा पतसंस्थेनेही या शेतकऱ्यांना कर्ज द्यावं. पण अशा काही योजना कर्जमाफीत बसत नाहीत एवढाच म्हणण्याचा उद्देश होता. माझ्या विधानामुळे भावना दुखावल्या असतील, तर त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो,” असं स्पष्टीकरण बाबासाहेब पाटील यांनी दिले आहे.







