कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील सत्तासंघर्षाचा वाद अद्याप शमलेला नसून याच पार्श्वभूमीवर मंगळवार, २६ मे रोजी दिल्लीत होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार सोमवारी (२५ मे) सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. पक्षश्रेष्ठींनी त्यांना चर्चेसाठी बोलावले असून, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. बैठकीत राहुल गांधी देखील उपस्थित राहणार आहेत.
माहितीनुसार, कर्नाटकातील नेतृत्वबदल, सरकारची कामगिरी आणि २०२८ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वीची संघटनात्मक रणनीती यावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. पुढील निवडणुकांपूर्वी प्रशासनिक रचना आणि राजकीय संतुलनात काही बदल करणे आवश्यक असल्याचे पक्ष नेतृत्वाला वाटत आहे. कॉंग्रेसकडे सध्या तीन पर्याय असून पहिला पर्याय म्हणजे मुख्यमंत्री न बदलता मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करणे. या पर्यायाअंतर्गत सामाजिक आणि राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. सूत्रांच्या मते, “अहिंदा” (AHINDA) प्रतिनिधित्व अधिक मजबूत करणे, कमी प्रभावी मंत्र्यांना वगळणे आणि सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मंत्रिमंडळ पुनर्रचना केली जाऊ शकते. कन्नड राजकारणात AHINDA म्हणजे अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि दलित समाजाच्या राजकीय आघाडीला दिलेले नाव असून, ती सिद्धरामय्या यांची प्रमुख राजकीय रणनीती मानली जाते. या फेरबदलात डीके शिवकुमार यांच्या सूचनांनाही महत्त्व दिले जाऊ शकते, जेणेकरून हा निर्णय एकतर्फी वाटणार नाही.
दुसरा आणि सर्वाधिक संवेदनशील पर्याय म्हणजे मुख्यमंत्रीपदात बदल करणे. २०२३ मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा पक्षात दीर्घकाळापासून सुरू आहे. डीके शिवकुमार समर्थक आमदार सातत्याने त्यांना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी करत आहेत. या पर्यायाअंतर्गत डीके शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती होऊ शकते, तर सिद्धरामय्या यांना राज्यसभेत पाठवण्याचा विचार केला जाऊ शकतो. मात्र, असा निर्णय घेतल्यास दोन्ही गटांमध्ये नवीन सत्तासंतुलन निर्माण करावे लागेल आणि मोठ्या मंत्रिमंडळ फेरबदलाचीही आवश्यकता भासू शकते.
तिसरा आणि तुलनेने कमी शक्यता असलेला पर्याय म्हणजे स्वतः मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे येणे. सूत्रांचे म्हणणे आहे की, सिद्धरामय्या आणि शिवकुमार गटांमध्ये सहमती न झाल्यास खर्गे यांना सर्वमान्य चेहरा म्हणून पुढे आणले जाऊ शकते. मात्र, असे झाल्यास काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वात मोठे बदल करावे लागतील आणि राहुल गांधींसह वरिष्ठ नेतृत्वाला नवी रणनीती आखावी लागेल.
हे ही वाचा:
पाकिस्तानातील सत्ता लष्कराच्या हाती? ट्रम्प यांच्या पोस्टने वेधले लक्ष
अमेरिकेकडून IRGC च्या नौका आणि क्षेपणास्त्र तळांवर हल्ले
सीएनजी दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ
बंदी घातलेल्या जमात-ए-इस्लामीशी संबंधित दहशतवादी निधी प्रकरणात छापेमारी
या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तीन राज्यसभा जागा आणि नऊ विधान परिषद जागांसाठी निवडणुका होणार आहेत. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ८ जून आहे. उमेदवार निवडीच्या प्रक्रियेतही पक्षांतर्गत गटबाजी आणि राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून कर्नाटक काँग्रेसमध्ये सत्तासंघर्ष सातत्याने वाढत आहे. राज्य सरकारने आपला अर्धा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर नेतृत्वबदलाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. मात्र, डीके शिवकुमार यांनी या विषयावर सार्वजनिकरित्या संयमित भूमिका घेतली आहे. त्यांनी अनेकदा, वेळच या प्रश्नांची उत्तरे देईल, असे म्हटले आहे. दरम्यान, केरळमध्ये काँग्रेसच्या सत्तेत पुनरागमनानंतर कर्नाटक काँग्रेसमध्येही राजकीय पुनर्संतुलन आणि भविष्यातील रणनीतीबाबत चर्चा अधिक तीव्र झाल्या आहेत.







