“ज्ञानोबा-तुकाराम”च्या गजराने आणि “विठ्ठल… विठ्ठल…”च्या अखंड नामस्मरणाने अवघा महाराष्ट्र भक्तिरसात न्हाऊन निघत असताना, विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एसटी महामंडळाची यंत्रणा सज्ज झाली आहे. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी तब्बल ५ हजार ५०० विशेष बसेस रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यंदाची वारी अधिक सुकर, सुरक्षित आणि सुविधायुक्त करण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे.
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वारकऱ्यांनाही थेट विठुरायाच्या दर्शनासाठी जाण्याचा मार्ग अधिक सोपा होणार आहे. भाविकांनी आपल्या नजीकच्या एसटी आगारात संपर्क साधून या विशेष सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेत ‘नीट’ परीक्षा
केरळमध्ये शिगेला-निपाहचा दुहेरी धोका
आंतरराष्ट्रीय योग दिन: १७५ देशांचा पाठिंबा, अवघ्या ९० दिवसांत मान्यता; काय आहे गोष्ट?
दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो वारकरी पालख्यांसह पायी, रेल्वेने, खासगी वाहनांनी आणि एसटीने पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. ही प्रचंड गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने वाहतूक व्यवस्थापन, अतिरिक्त फेऱ्या, नियंत्रण कक्ष आणि प्रवासी सुविधांची भक्कम आखणी केली आहे. विठ्ठल भक्तांचा प्रवास कोणत्याही अडचणीशिवाय पार पडावा, यासाठी संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे.
विशेष म्हणजे या विशेष बस सेवेतही शासनाच्या सर्व प्रवासी सवलती कायम राहणार आहेत. ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे, तर ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे विठुरायाच्या दर्शनाचा प्रवास केवळ भक्तिमयच नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही दिलासादायक ठरणार आहे.
गेल्या वर्षी आषाढी यात्रेसाठी एसटीने ५ हजार २०० विशेष बसेस चालवून तब्बल २१ लाख २५ हजार भाविकांची सुरक्षित ने-आण केली होती. यंदा भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मागील वर्षाच्या तुलनेत अधिक मोठे आणि सक्षम नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाची वारी एसटीसाठीही एक मोठी सेवा मोहीम ठरणार आहे.
वारीदरम्यान रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चाने या कर्मचाऱ्यांसाठी चहा, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था केली असून सुमारे १३ हजार कर्मचारी या सुविधेचा लाभ घेणार आहेत. विठ्ठल भक्तांच्या सेवेत झोकून देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकादशीच्या दिवशी आणि त्यानंतरच्या परतीच्या प्रवासात होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एसटीचे ३६ हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक स्थानिक पोलीस प्रशासनासोबत समन्वय साधून काम करणार आहेत. त्यामुळे लाखो भाविकांच्या प्रवासाचे नियोजन अधिक प्रभावी होणार असून वाहतूक व्यवस्थेवरील ताणही कमी होणार आहे.
पंढरपूरमध्ये भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन चंद्रभागा, भीमा (देगाव), विठ्ठल कारखाना आणि पांडुरंग (आयटीआय महाविद्यालय) येथे चार तात्पुरती बस स्थानके उभारली जाणार आहेत. या ठिकाणी पिण्याचे पाणी, सुलभशौचालये, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटीने उभारलेली ही भव्य व्यवस्था म्हणजे केवळ वाहतूक सेवा नसून महाराष्ट्राच्या संतपरंपरेला आणि वारकरी संस्कृतीला वाहिलेली सेवा असल्याची भावना व्यक्त होत आहे. भक्ती, सेवा आणि व्यवस्थापनाचा संगम असलेली यंदाची आषाढी वारी अधिक संस्मरणीय आणि सुरळीत ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
