32 C
Mumbai
Wednesday, March 11, 2026
घरधर्म संस्कृतीवारकरी संप्रदायाचे कार्य देशभरात पोहोचवणारे संतश्रेष्ठ नामदेव

वारकरी संप्रदायाचे कार्य देशभरात पोहोचवणारे संतश्रेष्ठ नामदेव

संत नामदेवांनी अवघा भारत पादाक्रांत करत समाजप्रबोधन केले

Google News Follow

Related

    भारताच्या सांस्कृतिक इतिहासात भक्ति परंपरेतील एक मध्यवर्ती व्यक्तिमत्त्व म्हणजे संत शिरोमणी नामदेव. आधुनिक भारतातील मराठीच नव्हे तर हिंदी भाषक क्षेत्रांतही सार्वजनिक जीवनावर संत नामदेव यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. प्रादेशिक वैशिष्ट्ये, राष्ट्रीयता आणि पंथनिरपेक्षता यांचे अद्भूत सामंजस्य त्यांच्या ठायी दिसून येते. भारतात धार्मिक परंपरांनी आपल्या गौरवशाली भूतकाळाचे जतन करण्यात किती महत्त्वाची भूमिका निभावली आहे, हे संत नामदेवांच्या चरित्रातून दिसून येते. कार्तिक शुक्ल एकादशी (यावर्षी रविवार, २ नोव्हेंबर) या दिवशी नामदेव महाराजांची जयंती साजरी केली जात आहे.
अल्पचरित्रसंत नामदेव यांचा जन्म कार्तिक शुद्ध एकादशी विक्रम संवत १३२७ मध्ये सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथे झाला. दामाशेटी हे त्यांच्या वडिलांचे तर गोणाई हे आईचे नाव. नामदेवकृत म्हणून मानले जाणारे एक ‘आत्मचरित्र’ नामदेवांच्या संकलित गाथेत अंतर्भूत आहे. त्यात “गोणाई दामाशेटी झाले पाणिग्रहण । संसारी असोन नरसीगावी।।” असा निर्देश सापडतो. शिंपीकाम हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय असला तरी संत नामदेवांचे मन त्यात रमत नसे. त्यांच्या कुटुंबात विठ्ठलभक्तीचे वातावरण होते. नामदेवांनाही लहानपणापासूनच विठ्ठलभक्तीची ओढ लागली. एकदा विठ्ठलासाठी नैवेद्य घेऊन देवळात गेलेले नामदेव देव नैवेद्य खाईना, म्हणून त्याच्या पायांवर डोके आपटून प्राण द्यावयास निघाले आणि भक्तवत्सल देवाने त्यांची ही भक्ती पाहून नैवेद्य आनंदाने खाल्ला, अशी आख्यायिका सांगितली जाते.त्यांचा विवाह राजाई यांच्याशी झाला. त्यांना नारायण, महादेव, गोविंद आणि विठ्ठल असे चार पुत्र आणि लिंबाई नावाची मुलगी होती. मात्र त्यांचे मन केवळ विट्ठलाची भक्ती करण्यात लीन होई. दिवस-रात्र ते विठ्ठलाचे नामस्मरण करत असत. एक वेळ अशी आली, की नामदेवांचा प्रत्येक श्वास विठोबाच्या नावासरशी होत असे.

संत नामदेव हे २० वर्षांचे असताना संत ज्ञानेश्वर यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांची भेट घ्यायला स्वतः ज्ञानेश्वर पंढरपूरला आले होते. चंद्रभागा नदीच्या काठी त्यांचे भजन ऐकून ज्ञानेश्वर एवढे प्रभावित झाले की ते त्यांच्या सोबतीला थांबले. ते ज्ञानदेवादी संतांबरोबर तीर्थयात्रेला गेले. स्वतः नामदेवांनी वर्णन केल्याप्रमाणे –

नामयाचे भेटी ज्ञानदेव आले । लोटांगण घातलें नामदेवें ॥१॥ देऊनि आलिंगन प्रीती पडिभरें । पूजिलें आदरे यथाविधी ॥२॥

संत नामदेव हे परमेश्वराच्या सगुण स्वरूप विठ्ठलाचे उपासक होते, तर ज्ञानेश्वर हे निर्गुण रूपाचे. नामदेवांच्या दृष्टीने पंढरपूर सोडून जाणे हे मृत्यूसमान होते, मात्र ज्ञानेश्वरांनी खूप आग्रह केल्यामुळे सर्व संत मंडळींसोबत ते यात्रेला निघाले. औंढा नागनाथ येथील संत विसोबा यांना त्यांनी गुरू मानले. विसोबा खेचर यांनी त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला आणि सर्वव्यापी परमेश्वराचे ज्ञान त्यांना घडविले. त्यानंतर त्यांची विठ्ठलभक्ती सर्वव्यापक झाली.

पंजाबचा प्रवास

देशभर तीर्थयात्रा केल्यानंतर संत नामदेव पंजाबमध्ये आले आणि तिथे त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. झांज आणि एकतारी घेऊन ते मधुर स्वरात भजन गात असत. पंजाबमधील संत नामदेवांचे कार्य एवढे महत्त्वाचे आहे, की पंजाबच्या संत परंपरेत त्यांना प्रथम संताचा मान दिला जातो. त्यांनी पंजाबमध्ये २० वर्षे वास्तव्य केले. तेथील लोकांचा विश्वास आहे, की त्यांनी तिथेच देहत्याग केला. अमृतसरपासून जवळच असलेल्या घुमाण येथे बाबा नामदेव किंवा भगत नामदेव यांचा गुरुद्वारा आजही उभा आहे. त्यांच्या शिष्यांना नामदेवियाँ असे म्हटले जाते. इतकेच नाही तर शिखांचा पवित्र अशा गुरु ग्रंथ साहिब यामध्ये त्यांचे ६१ पद आणि ३ श्लोक हे १८ रागांमध्ये संकलित आहेत.

संत नामदेवांनी पंजाबमध्ये श्री गुरु नानकदेव यांच्या सुमारे २०० वर्षे आधी निर्गुण उपासनेचे प्रतिपादन केले. उत्तर भारतात भक्ति चळवळीची संत परंपरा सुरू करणारे ते पहिले संत होत.

संत नामदेवांचा संदेश

संत नामदेवांचे मन भक्तिभावनेने भजन करण्यातच रममाण होत असे. त्यांच्या दृष्टीने विट्ठल, शिव, विष्णू आणि पांडुरंग हे सर्व एकच आहेत. सर्व जीवांमध्ये एकच आत्मा आहे. त्यामुळे जातीचा विचार खोटा आहे.संत नामदेव यांनी जातीपातींचा कटाक्षाने धिक्कार केला असून भक्तिभावनेला आवाहन केले आहे. रामनाम भजण्याचा त्यांनी उपदेश केला आहे :

नामाचा महिमा नेणेची पैं ब्रह्मा । म्हणोनियां कर्मा अनुसरला ॥१॥
नाम हेंचि कर्म नाम हेंचि धर्म । केशव हेंचि वर्म सांगितलें ॥२॥
नाम शुद्ध स्नान नाम शुद्ध संध्या । नामाविणें वेद आणिक नाहीं ॥३॥
करितां आचमन केशव नारायण । करिती उच्चारण आधीं हेंचि ॥४॥
लग्नाचिये काळीं म्हणती सावधान । लक्ष्मीनारायण चिंतन करा ॥५॥
देहाचिये अंती प्रायश्चित्त देती । शेवटीं वदविती रामनाम ॥६॥
ऐसिया नामापरतें नाहीं सार । गिरिजेसी शंकर उपदेशी ॥७॥
करिती पितृश्राद्ध कर्म आचरती । शेवटीं म्हणती एको विष्णु ॥८॥
नामें होय गति नामें होय मुक्ति । नामयाचे चित्तीं रामनाम ॥९॥

हे ही वाचा:

आयुष्मान कार्ड साखळीचा पर्दाफाश; ३०० हून अधिक ओळखपत्रे जप्त!

ब्रिटनमध्ये रेल्वेत अनेकांना भोसकले, २ अटकेत

चांगली झोप येण्यासाठी ‘आल्याचे पाणी’ उपयुक्त

सत्याचा मोर्चा ही जनतेची दिशाभूल

श्री गुरु नानकदेव यांनी पंजाबच्या भूमीवर पुढच्या काळात जो उपदेश दिला त्यातील महत्त्वाचा भाग संत नामदेवांच्या तत्त्वज्ञानातूनच आलेला आहे. श्री गुरु नानक देव यांच्या आधी २०० वर्षे संत नामदेवांनी पंजाबमध्ये शीख गुरूंच्या भक्ति-शक्ती जागृतीसाठी सामाजिक समन्वयाची व्यापक भूमिका तयार करून ठेवली होती.

संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी शौरसेनी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजी की मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहिबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथांतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे. त्यांच्या कीर्तनांत अनेक चांगल्या ग्रंथांचा उल्लेख असे. यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’- अशी त्यांची योग्यता होती. ’नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.

वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे वारकरी संप्रदायाचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात. पंजाबातील ‘शबदकीर्तन’ व महाराष्ट्रातील ‘वारकरी कीर्तन’ यांत विलक्षण साम्य आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवांनी त्यांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास, लढ्विष्णूस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवाची मंदिरे उभारलेली आहेत. `संत शिरोमणी’ असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.

राष्ट्रीय एकात्मतेचे आधुनिक प्रणेते

संत ज्ञानेश्वरांचेच समकालीन असलेले आणि आपल्या कार्याने वेगळा ठसा उमटविणारे संत नामदेव यांचे संत परंपरेत आगळे स्थान आहे. संत नामदेवांनी उभा भारत पायाखाली घालत प्रवास करून समाजप्रबोधन आणि जनजागृतीची व्यापक चळवळ उभी केली. त्यांनी भक्तिगीते आणि अभंगांची रचना करून आपल्या कृती तसेच आचरणातून समता आणि भक्तीची शिकवण दिली. एवढेच नाही तर महाराष्ट्रापासून पंजाबपर्यंत लोकांना देश आणि देवभक्तीच्या एका सूत्रात बांधले. त्या अर्थाने ते राष्ट्रीय एकात्मतेचे आधुनिक प्रणेते ठरतात.

अर्धशतकाहून अधिक अशा भक्तिमय कालखंडात संत नामदेवांनी भारतभर अनेक पदयात्रा केल्या. दक्षिणेतील श्री शैलशिखर, अरुणाचलम, चिदंबरम्, विष्णुकांची, रामेश्वर आदी ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. त्यांच्या प्रभावामुळे दक्षिणेतील दर्जी ही जात स्वतःला नामदेव म्हणवून घेऊ लागली, तर भूसागर आणि मल्ला ह्या जातींनी ‘नामदेव’ हे आपल्या जातीचे एक पर्यायी नाव म्हणून स्वीकारले. गुजरात, सौराष्ट्र, सिंधु प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब आणि हिमाचल प्रदेश येथेही नामदेवांचे वास्तव्य झाले होते.

विशेषतः पंजाबातील त्यांच्या वास्तव्याची व कार्याची जाणीव आजही ठळकपणे मिळते. ‘नामदेवजी की मुखबानी’ म्हणून प्रसिद्ध असलेली नामदेवांची हिंदी भाषेतील ६१ पदे शिखांच्या ग्रंथसाहिब या धर्मग्रंथात समाविष्ट करण्यात आलेली आहेत. नामदेवांची सुमारे सव्वाशे हिंदी पदेही आता उपलब्ध आहेत. विष्णुस्वामी, बहोरदास किंवा बोहरदास, जाल्लो, लध्धा, केसो कलंधर किंवा कलधारी ह्यांसारखे अनेक शिष्य नामदेवांना पंजाबात मिळाले. त्यांपैकी जाल्लो किंवा जाल्हण सुतारासारखे काही शिष्य नामदेवांसोबत पंढरपूरला आले. केसो कलधारी ह्याने भावलपूर संस्थानात वारकरी संप्रदायाची ध्वजा फडकविली. तेथे ‘कलधारिकी गद्दी’ ह्या नावाने प्रसिद्ध असलेला त्याचा आश्रम तसेच समाधीही आहे.

गुरदासपूर जिल्ह्यातील घुमाण गावी असलेले मंदिर (गुरुद्वारा बाबा नामदेवजी) प्रसिद्ध आहे. नामदेवांचे शिष्य बोहरदास यांनी हे मंदिर उभारले, असे म्हणतात. काही वर्षांपूर्वी तेथे मराठी साहित्य संमेलन झाले होते. तेव्हा संत नामदेवांचा तिथे किती प्रभाव आहे, हे दिसून आले होते. प्रतिवर्षी माघ शुद्ध द्वितीयेस येथे मोठी यात्रा भरते. राजस्थान आणि उत्तर प्रदेशातही नामदेवांची मंदिरे आहेत. उत्तरेतील रैदास (रविदास किंवा रोहिदास), धना, रज्ज.ब, तुलसीदास, पीपा, रामानंद, कबीर या संतांनी नामदेवांचा आदराने उल्लेख केलेला आहे. प्रसिद्ध गुजराती संत नरसी मेहतांनीही आपल्या काव्यातून नामदेवांचा निर्देश अनेकदा केलेला आहे. संत मीराबाईंनी आपल्या एका कवनात देवाने नामदेवांच्या घराचे छप्पर शाकारले, असा उल्लेख केला आहे.

संत नामदेवांचा देशभ्रमण काळ हा बहुतेक परकीय आक्रमकांचा होता. त्या आक्रमणाविरुद्ध स्वजागृतीचे काम त्यांनी आध्यात्मिक कृतींच्या माध्यमातून केले. एक प्रकारे निद्रीस्त समाजाला जागृत करण्याचे कामच त्यांनी केले. पुढे महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये परकीय राजवटींविरुद्ध यशस्वी लढे उभारले गेले, हे येथे उल्लेखनीय. म्हणूनच संत नामदेवांच्या कार्याला भक्तीमार्गापुरते मर्यादीत करणे योग्य ठरणार नाही. राष्ट्रीय एकात्मता आणि स्वत्व जागृती या संदर्भातही त्यांच्या कामाचे मोल होण्याची गरज आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा