गोष्ट फार जुनी नाही. फक्त तीन वर्षांपूर्वीची आहे. पाकिस्तानचा एक मंत्री एहसान इक्बाल याने जनतेला सल्ला दिला होता. चहा थोडा कमी प्या. पाकिस्तानात चहा आयात करण्यासाठी ४०० दशलक्ष डॉलर खर्च करावे लागतात. चहा कमी केल्यास हा खर्चही कमी होईल, असे त्याने सांगितले होते. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची परीस्थिती आणखी बिकट आहे. चहा आयात करण्यासाठी तिजोरीत पैसे नाहीत, भारताने सिंधू जल करार स्थगित केल्यामुळे पाण्याचेही वांधे झालेत. पाकिस्तानींच्या चहावर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. २०२२ च्या पूरानंतर पाकिस्तानमध्ये कोवळ्या मुली विवाहाच्या नावाखाली विकण्याचे घाऊक प्रकार झाले होते. पाण्याच्या दुर्भीक्षामुळे पुन्हा तेच होण्याची शक्यता आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला. त्याचे झटके पाकिस्तानला बसू लागले आहेत. सिंधू, रावी आणि झेलम नदीतून येणारे पाणी गेल्या वर्षीच्या तुलनेत १३.३ टक्क्यांनी कमी झाले आहे. सिंधू खोऱ्यातून गेल्या वर्षी या काळात १४४०० क्युसेक्स पाणी पाकिस्तानला मिळाले होते. यंदा हे प्रमाण १२४५०० इतके कमी झालेले आहे. पाकिस्तानच्या खरीप शेतीवर याचा अत्यंत प्रतिकूल परीणाम झालेला आहे. तांदूळ आणि कापसाच्या पिकावर मोठा परीणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिकांना मिळणारे पाणी २१ टक्के कमी झालेले आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर विजय साजरा करणाऱ्या पाकिस्तानला पाणीबाणीमुळे भारतासमोर नाक रगडावे लागते आहे. भारताला धमक्या द्यायच्या की विनवण्या करायच्या या पेचात पाकिस्तानचे नेते सापडले आहेत. पानी रोका तो हम भारत की सांसे बंद कर देंगे, अशा पोकळ धमक्या वांरवार दिल्या तर भारत बघायलाही तयार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार सांगतायत की खून और पानी एक साथ नही बह सकता. त्यांच्या विधानांवरून स्पष्ट आहे, भारताला सिंधू कराराबाबत चर्चा करण्याची इच्छाच नाही. पाकिस्तानला ऑपरेश सिंदूरपेक्षा मोठा घाव, सिंधू जल करार स्थगित केल्यामुळे मिळाला आहे.
हे ही वाचा:
कडवट मेथी दाण्यांत लपलाय गोडवा
पहिला ग्रीन बॉण्ड बीएसईवर सूचीबद्ध
मीरा राजपूत ने शेअर केले सुंदर फोटो
हिंदू धर्माबाबत वादग्रस्त टिप्पणी : वजाहत खानला अटक
पाकिस्तानी जल मंत्रालयाचे सचिव सईद अली मुर्तजा यांनी पाणी विनवणी करण्यासाठी भारताच्या जलशक्ती मंत्रालयाला आजवर चार पत्र पाठवली आहेत. ही चारही पत्र जलशक्ती मंत्रालयाने परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठवली आहेत.
अमेरिका चीनकडून भिकेत मिळालेल्या पैशाने पाकिस्तानने पाणी साठवण्यासाठी धरणे बांधली असती तर कदाचित ही परीस्थिती ओढवली नसती. दहशतवादाने भारताला रक्तबंबाळ करणे आणि पाकिस्तानातील मीडिया सरकार नियंत्रित असल्यामुळे नेमका किती परिणाम झाला आहे हे उघड होत नाही. परंतु काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी अभिनेत्री हिना बयात यांनी मोहमद अली जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक व्हीडियो जारी केला होता. त्यात या म्हणतात की, विमानतळावरील टॉयलेटमध्ये पाणी नाही. त्यामुळे नमाजसाठी वजू करता येत नाही, टॉयलेटमध्ये जाता येत नाही. लहान मुलांचीही मोठी गैरसोय झालेली आहे. ही परिस्थिती आंतरराष्ट्रीय विमानतळावर असेल तर गल्लीबोळात काय परीस्थिती असेल विचार करा. ना पिण्यासाठी पाणी आहे, ना धुण्यासाठी.
पाकिस्तानचा जावई माफीया दाऊद इब्राहीम ज्या कराचीमध्ये राहतो. दाऊदच्या जीवावर पाकिस्तानातील अनेक राजकीय नेते आणि लष्कर शहा पोसले जात असल्यामुळे त्याच्यासाठी पाकिस्तानने शाही व्यवस्था केलेल्या आहेत. त्याच्या त्या कराचीत भीषण पाणी टंचाई आहे. अर्थात दाऊदसारख्या ड्रग्ज माफियाच्या आयुष्यात अशा गोष्टींमुळे फरक पडत नाही. तो पाकिस्तानसोडून दुबईत जाऊन राहील. जगातील कोणत्याही देशात जाईल. भारतातील अनेक नेते, अभिनेते आणि नट्या ज्याने पैसा फेकून नाचवल्या तो सगळ्या पाकिस्तानचे पाणी खासगी वापरासाठी एकटा विकत घेईल. प्रश्न आहे तिथल्या गरीबाचा. त्याच्यासाठी पाणी सुद्धा परवडणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तीन वर्षांपूर्वी एहसान इक्बाल यांनी जनतेला न मागता सल्ला दिला होता. चहा जरा कमी प्या. कदाचित पाकिस्तानचा एखादा मंत्री सद्यस्थितीत पाणी जरा कमी प्या असा सल्ला जनतेला देऊ शकतो.
भारत द्वेषाने पछाडलेला पाकिस्तान भारताला बरबाद कऱण्यासाठी इतका वेडापिसा झाला की, त्याने आपल्या पायावरच कुऱ्हाड मारून घेतली. देशाची भरभराट आणि विकास करणे या तर दूरच्या गोष्टी झाल्या. वेळेत तिथे पाऊस पडला नाही तर पाण्यासाठी मारामारी होईल अशी परिस्थिती आहे. म्हणजे आधी उपासमारीची समस्या आहेत. त्यात आता पाण्याच्या दुर्भीक्षाची भर पडणार आहे.
अलिकडेच जाहीर झालेल्या वर्ल्ड बँकेच्या अहवालात पाकिस्तानात गरीबी रेषेखालील लोकांची संख्या ४४.७ टक्के झाली आहे. आत्यंतिक गरीबीत असलेल्या लोकांचा टक्का २०१७ मध्ये फक्त ४.९ होता. २०२१ मध्ये हा टक्का सुमारे तिप्पट म्हणजे १६.६ इतका झाला. याचा अर्थ हे असे लोक आहेत ज्यांना दोन वेळचे जेवण मिळणे कठीण आहे. ज्यांची उपासमार होते आहे. भारतात ही संख्या २०१७ मध्ये २७.१ होती आता २०२१ पर्यंत ती केवळ ५.३ टक्के इतकी राहीलेली आहे. म्हणजे पाकिस्तानमध्ये १६.६ टक्के असे लोक आहेत, ज्यांना जेवण परवडत नाही. त्यांना विकतचे पाणी किंवा वीज काय परवडणार. औषधोपचार, पक्के घर या तर चैनीच्या गोष्टी झाल्या.
२०२२ मध्ये पाकिस्तानात मोठा पूर आला होता. प्रचंड मोठी हानी झाली होती. त्यावेळी सर्वस्व बर्बाद झालेल्या लोकांनी आपल्या अल्पवयीन मुलींचा विवाह करून आपले अस्तित्व टीकवण्याचा प्रयत्न केला होता. वराच्या कुटुंबियांकडून मोठी रक्कम घ्यायची आणि आपली कोवळी मुलगी त्याला द्यायची, किंवा विकायची असे तुम्ही म्हणू शकता. अल्पवयीन मुलगी, दुप्पट तिप्पट वयाचा वर हे चित्र तिथे सर्रास दिसत होते. जगभरातील मीडियाने याची दखल घेतली. जगात लाज गेली तरी ताठ मानेने विजय जल्लोष कऱणे हा पाकिस्तानी नेत्यांचा स्वभाव आहे. २०२२ ची परीस्थिती पुन्हा पाकिस्तानवर आलेली आहे. तेव्हा पूर आला होता, आता पाणीबाणी आहे. पुन्हा १२-१५ वर्षांच्या मुलींची विवाहाच्या नावाखाली घाऊक विक्री सुरू होणार अशी शक्यता आहे.
पाणी समस्या बिकट झाली आहे. ही भारताची युद्धखोरी आहे, आम्ही अणूबॉम्बचा वापर करू या धमक्यांना भारत भीक घालत नाही. पाकिस्तानची आणखी एक समस्या आहे. त्यांच्या तिजोरीत खडखडाट झाला की वर्ल्ड बँक किंवा आयएमएफ पाकिस्तानच्या मदतीला तात्काळ धावून येते. अमेरीका विशेष लक्ष घालून पाकिस्तानला कर्ज मिळेल याची व्यवस्था करतात. परंतु पाकिस्तानची तहान भागवण्याचे काम ना वर्ल्ड बँक करू शकत ना आयएमएफ. पाकिस्तानच्या शेतीला लागणारे ८० टक्के पाणी सिंधू खोऱ्यातूनच येते. लाहोर, कराची सारखी शहरेही याच पाण्यावर तहान भागवतात. सिंधू करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या मंगला, तरबेला धरणाची पातळी प्रचंड खालावली आहे.
सिंधू करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानच्या अस्तित्वालाच चूड लागली आहे. धरणात पाणी नाही, त्यामुळे जलविद्युत प्रकल्प सुद्धा अडचणीत आले आहेत. हायड्रो पावरचे प्रमाण ३३ टक्के घटले आहे. ३७ ते ४० डीग्री सेल्सिअसचा कडक उन्हाळा, त्यात पाणी नाही. वीज नाही. अशी परिस्थिती. इस्लामाबाद, लाहोर, कराची सारख्या शहरात १०-१२ तास लोड शेडींग होते आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण १५-१६ तासांचे आहे. पाकिस्तानमध्ये ही परीस्थिती असेल तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये काय परिस्थिती असेल याची कल्पना करा.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
