30 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
घरसंपादकीयगांधी घराण्याचा ‘किम जोंग’ अवतार उघड करणारे 'भोलानाथ' गेले...

गांधी घराण्याचा ‘किम जोंग’ अवतार उघड करणारे ‘भोलानाथ’ गेले…

भोलानाथ पांडे यांच्या निधनामुळे काँग्रेसच्या लोकशाही विरोधी कारनाम्याला मिळाला उजाळा!

Google News Follow

Related

स्वतंत्र भारतावर राज्य करणारे काँग्रेसी राज्यकर्ते आणि त्यांच्या लीला उत्तर कोरीयाचा हुकूमशहा किम जोंग उन यालाही मागे टाकणाऱ्या होत्या. हा देश आपल्या बापजाद्यांची मालमत्ता आहे, या तत्वावर त्यांचा अढळ विश्वास होता. नौदलाची जहाजं घेऊन शाही पिकनिक काढल्या जायच्या. नौदलाचे जवान एखाद्या वेटरसारखे शाही परिवार आणि त्यांच्या मित्रमंडळींसाठी राबायचे. शाही परिवाराशी निष्ठा दाखवण्यासाठी अशाच एका माथेफिरूने १९७८ मध्ये एअर इंडीयाचे विमान हायजॅक केले होते. ज्या गुन्ह्यासाठी आजन्म कारावासा ठोठावायला हवा, त्या विमान हायजॅकच्या गुन्ह्यासाठी गुन्हेगाराला अत्यंत मामुली शिक्षा झाली. इंदिरा गांधींवर निष्ठा व्यक्त करण्यासाठी बक्षीसही मिळाले. हा घटनाक्रम आठवण्याचे कारण १९७८ साली इंदीरा गांधी यांच्या सुटकेसाठी विमान हायजॅक करणारा काँग्रेस कार्यकर्ता भोलानाथ पांडे याचे काल निधन झाले.

गांधी-नेहरु परिवाराला हा देश म्हणजे आपल्या बापाचा माल आणि आपण या देशाचे अनभिषिक्त सम्राट असा गैरसमज जवाहरलाल नेहरुंच्या काळापासून होता. तो झिरपत झिरपत युवराज राहुल गांधी यांच्यापर्यंत आलेला आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा या देशावर दुसऱ्या एखाद्या पक्षाची सत्ता आली तेव्हा हा परिवार त्याच मग्रुरीत वावरला. ती मग्रुरी आजही कायम आहे. सोनिया गांधी या एका पक्षाच्या साध्या खासदार, तरीही देशाच्या पंतप्रधानांपेक्षा भव्य असे शासकीय निवासस्थान त्या गेली ३० वर्षे वापरतायत. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होऊन सुद्धा त्यांना किंवा त्यांच्या परिवारातील एकाही सदस्याला हात लावण्याची सत्ताधाऱ्यांची हिंमत होत नाही. ना देशाच्या प्रत्येक विषयांवर व्यक्त होणाऱ्या न्यायव्यवस्थेने ही धमक दाखवली आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात घडलेल्या अनेक कांडांकडे त्यांच्या दाहकतेच्या तुलनेत अगदीच सौम्यपणे पाहिले जाते. १९८४ मध्ये दिल्लीत सुमारे चार हजार शिखांचा बळी घेणाऱ्या हत्याकांडाचा म्होरक्या काँग्रेस नेता जगदीश टायटलर याच्या विरोधात आता कुठे कायदेशीर प्रक्रियेला गती आलेली आहे.

असाच एक किस्सा १९७८ चा. पार विस्मरणात गेलेला. आज त्याची आठवण होण्याचे कारण इतकेच की, या प्रसंगातील खलनायकाला देवाज्ञा झाल्याची बातमी आज वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली. निष्ठा व्यक्त करण्यासाठी दहशतीच्या मार्गाचा वापर झाला. सर्वसामान्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याला वेठीस धरण्यात आले. देशाच्या हवाई सुरक्षेचे तीन-तेरा वाजवण्यात आले. जनता पार्टीच्या सरकारला हास्यास्पद बनण्याचा प्रयत्न झाला. २० डिसेंबर १९७८ चा दिवस एरवी अन्य दिवसांप्रमाणे आणखी एक दिवस ठरला असता. परंतु भोलानाथ पांडे आणि देवेंद्र पांडे या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे हा दिवस अवघ्या देशाच्या लक्षात राहिला. एअर इंडीयाचे आयसी ४१० हे विमानाने लखनौहून दिल्लीला जाण्यासाठी उड्डाण केले. दिल्लीत दाखल होण्यासाठी १५ मिनिटे शिल्लक असताना. भोलानाथ पांडे आणि देवेंद्र पांडे हे कॉकपीटमध्ये शिरले. त्यांनी जाहीर केले की, हे विमान हायजॅक झाले आहे. परंतु आम्ही युवक काँग्रेसचे अहिंसक कार्यकर्ते असल्यामुळे कोणालाही अपाय करणार नाही.

हे दोघे इंदिरा गांधी जिंदाबाद, संजय गांधी जिंदाबाद अशा घोषणा देत होते. इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्या विरोधात जनता पार्टीने दाखल केलेले सगळे गुन्हे मागे घ्यावे, इंदिरा गांधी यांची सुटका करावी आणि पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी होती. या विमानात १३२ प्रवासी होते. त्यात जनता पार्टीच्या सरकारमध्ये मंत्री असलेले धरमबीर सिन्हा आणि ए.के.सेन हे दोन माजी मंत्रीही होते. खेळण्यातील गन दाखवून या दोघांनी वैमानिक एम.एन.भट्टीवाल यांना धमकावले. हे विमान नेपाळच्या दिशेने नेण्यास सांगितले. वैमानिकाने नकार दिला. तेव्हा बांगलादेशच्या दिशेने वळवण्याचे आदेश या दोघांनी दिले. त्यालाही वैमानिकाने नकार दिला. अखेर हे विमान वाराणसीला उतरवण्यात आले. या दोघांनी शरणागती पत्करली. त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली. छुटपुट सजा होऊन मामला रफादफा करण्यात आला.

हे ही वाचा:

पुतळा दुर्घटनेप्रकरणी फरार जयदीप आपटेविरोधात लूक आउट नोटीस

इस्लामिक सेंटर हॅम्बर्गचा माजी प्रमुख जर्मनमधून हद्दपार

अंबाबाईच्या दर्शनाला प्रथमच आल्या राष्ट्रपती !

पंतप्रधान मोदी उद्यापासून ब्रुनेई-सिंगापूर दौऱ्यावर !

ही घटना म्हणजे दहशतवादी कारवाईच होती. अशा गुन्ह्यांसाठी आजन्म कारावासासारखी कठोर शिक्षा ठोठावण्यात येते कारण, विमानातील प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार होता. देशाच्या हवाई सुरक्षेचाही या दोघांनी खेळखंडोबा केला होता. तरीही या दोघांची स्वस्तात सुटका झाली. पुढे या दोघांना उत्तर प्रदेशातून विधानसभेची उमेदवारीही देण्यात आली. एका निवडणुकीत भोलानाथ पांडे विजयी झाले. परंतु त्यानंतर ते कधीही निवडणूक जिंकू शकले नाहीत. परंतु गांधी परिवारातील सदस्यांचे ते निकटवर्तीय राहीले. काँग्रेसमध्ये त्यांचा दबदबा अनेक वर्षे कायम होता.

जनता पार्टीचे सरकार पुढे आपल्या कर्माने कोसळले असले तरी ते जनतेने निवडून दिले होते. लोकशाही मार्गाने मोरारजी देसाई देशाचे पंतप्रधान झाले होते. इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीच्या विरोधात जनतेने मतपेटीद्वारे केलेला हा उठाव होता. हुकूमशाही राजवटीला एका मोठ्या जनआंदोलनाद्वारे धुळीस मिळवण्यात आले होते. जनतेने देशात पहिल्या गैर काँग्रेसी सरकारला ऐतिहासिक कौल दिला होता. अशा सरकारच्या पंतप्रधानांचा राजीनामा मागण्यासाठी काँग्रेसचा एक कार्यकर्ता विमानाचे अपहरण करतो आणि काँग्रेस नेतृत्व विधानसभेचे तिकीट देऊन त्यांला खांद्यावर घेतात, ही घटना बोलकी आहे.

काँग्रेसचे युवराज राहुल गांधी लोकशाही वाचवण्याची भाषा करतायत. संविधान वाचवण्यासाठी जणू युद्ध पुकारत असल्याचा आव आणतायत. प्रत्यक्षात घटना पायदळी तुडवणे आणि लोकशाहीच्या गळ्याला नख लावणे ही त्यांच्या खानदानाची परंपरा राहिलेली आहे. १९७८ म्हणजे फार जुनी गोष्ट नाही. फक्त ४६ वर्षांपूर्वीची घटना. राहुल गांधी त्यावेळी आठ वर्षांचे होते. घटना त्यांच्या कानावर निश्चितपणे आलेली असेल. लोकशाहीसाठी गळा काढण्याआधी त्यांनी आपल्या परिवाराने केलेल्या लोकशाही विरोधी कारनाम्यांसाठी देशाची माफी मागण्याची गरज आहे. भोलानाथ पांडे यांच्या निधनामुळे काँग्रेसने घडवलेल्या आणखी एक लोकशाही विरोधी कारनाम्याला उजाळा मिळाला आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा